मनाचे श्लोक १४१-१५०
म्हणे दास सायास त्याचे करावे ।
जनी जाणता पाय त्याचे धरावे ॥
गुरूअंजनेवीण ते आकळेना ।
जुने ठेवणे मीपणे ते कळेना ॥१४१॥
कळेना कळेना कळेना ढळेना ।
ढळे नाढळे संशयोही ढळेना ॥
गळेना गळेना अहंता गळेना ।
बळे आकळेना मिळेना मिळेना ॥१४२॥
अविद्यागुणे मानवा ऊमजेना ।
भ्रमे चूकले हीत ते आकळेना ॥
परीक्षेविणे बांधले दृढ नाणे ।
परी सत्य मिथ्या असे कोण जाणे ॥१४३॥
जगीं पाहता साच ते काय आहे ।
अती आदरे सत्य शोधूनि पाहे ॥
पुढे पाहतां पाहतां देव जोडे ।
भ्रम भ्रांतिं अज्ञान हे सर्व मोडे ॥१४४॥
सदा विषयो चिंतिता जीव जाला ।
अहंभाव अज्ञान जन्मासी आला ॥
विवेके सदा सस्वरूपी भरावे ।
जिवा ऊमगी जन्म नाही स्वभावे ॥१४५॥
दिसे लोचनी ते नसे कल्पकोडी ।
अकस्मात आकारले काळ मोडी ॥
पुढे सर्व जाईल कांही न राहे ।
मना संत आनंत शोधूनि पाहे ॥१४६॥
फुटेना तुटेना चळेना ढळेना ।
सदा संचले मीपणे ते कळेना ॥
तया एकरूपासि दूजे न साहे ।
मना संत आनंत शोधूनि पाहे ॥१४७॥
निराकार आधार ब्रह्मादिकांचा ।
जया सांगता सीणली वेदवाचा ॥
विवेके तदाकार हो्ऊनि राहे ।
मना संत आनंत शोधूनि पाहे ॥१४८॥
जगी पाहता चर्मचक्षी न लक्षे ।
जगी पाहता ज्ञानचक्षी न रक्षे ॥
जगी पाहता पाहणे जात आहे ।
मना संत आनंत शोधूनि पाहे ॥१४९॥
नसे पीत ना श्वेत ना शाम कांही ।
नसे व्यक्त अव्यक्त ना नीळ नाही ॥
म्हणे दास विश्वासता मुक्ति लाहे ।
मना संत आनंत शोधूनि पा