मनाचे श्लोक १५१-१६०

Parent Category: मराठी संस्कृती Category: मनाचे श्लोक Written by सौ. शुभांगी रानडे

खरे शोधिता शोधिता शोधताहे ।
मना बोधिता बोधिता बोधताहे ॥

परी सर्वही सज्जनाचेनि योगे ।
बरा निश्चयो पाविजे सानुरागे ॥१५१॥

बहूता परी कूसरी तत्वझाडा ।
परी पाहिजे अंतरी तो निवाडा ॥

मना सार साचार तें वेगळे रे ।
समस्तांमधे येक ते आगळे रे ॥१५२॥

नव्हे पिंडज्ञाने नव्हे तत्वज्ञानें ।
समाधान कांही नव्हे तानमानें ॥

नव्हे योगयागे नव्हे भोगत्यागें ।
समाधान ते सज्जनाचेनि योगें ॥१५३॥

महावाक्य तत्वादिकें पंचकर्णे ।
खुणे पाविजे संतसंगें विवर्णे ॥

द्वितीयासि संकेत जो दाविजेतो ।
तया सांडुनी चंद्रमास भाविजेतो ॥१५४॥
दिसेना जनी तेचि शोधूनि पाहे ।
बरे पाहता गूज तेथेचि आहे ॥

करी घेउ जाता कदा आढळेना ।
जनी सर्व कोंदाटले तें कळेना ॥१५५॥
म्हणे जाणता तो जनी मूर्ख पाहे ।
अतर्कासि तर्की असा कोण आहे ॥

जनी मीपणे पाहता पाहवेना ।
तया लक्षिता वेगळे राहवेना ॥१५६॥
बहू शास्त्र धुंडाळिता वाड आहे ।
जया निश्चयो येक तोही न साहे ॥

मती भांडती शास्त्रबोधे विरोधे ।
गती खुंटती ज्ञानबोधे प्रबोधे ॥१५७॥
श्रुती न्याय मीमांसके तर्कशास्त्रे ।
स्मृती वेद वेदांतवाक्ये विचित्रे ॥

स्वये शेष मौनावला स्थिर पाहे ।
मना सर्व जाणीव सांडून राहे ॥१५८॥

जेणे मक्षिका भक्षिली जाणिवेची ।
तया भोजनाची रूची प्राप्त कैंची ॥
अहंभाव ज्या मानसींचा विरेना न ।
तया ज्ञान हे अन्न पोटी जिरेना ॥१५९॥

नको रे मना वाद हा खेदकारी ।
नको रे मना भेद नाना विकारी ॥
नको रे मना सीकऊ पूढिलांसी ।
अहंभाव जो राहिला तूजपासी ॥१६०॥

Hits: 574
X

Right Click

No right click