१२, धुळ्याच्या तुरुंगात - १
-----------------------------------------------------------------
सेनानी सानेगुरुजी - राजा मंगळवेढेकर - अनुक्रमणिका
>-----------------------------------------------------------------
१२, धुळ्याच्या तुरुंगात - १
गांधीजी लंडन येथील गोलमेज परिषद फसल्यानंतर २८ डिसेंबर १९३१ रोजी भारतात परत आले. मुंबईत उतरताच त्यांनी लोकांना लढ्यासाठी सावध राहण्याची सूचना दिली. करबंदीचा आदेश दिला. वातावरण प्रक्षुब्ध झाले. ४ जानेवारी १९३२ रोजी सकाळी गांधींना अटक झाली, विनोबांनाही जळगावला अटक झाली. त्यांना धुळे तुरुंगात पाठवण्यात आले.
गुरुजी मात्र पोलिसांच्या तडाख्यात लवकर सापडले नाहीत. शक्यतो लवकर अटक करून घ्यायची नाही, असेच त्यांनी ठरवले होते. गांधीजींच्या अटकेचा निषेध करण्यासाठी त्यांनी अंमळनेरला सभा घेतली. सभा खूपच धामधुमीची झाली. गुरुजींचे भाषण फारच स्फूर्तिदायक झाले. लोकांनी लढ्यासाठी भराभर पैसे दिले. एका गरीब गुजराती बाईने हातातली. पाटली काढून दिली.
गुरुजींना सभा संपताच अटक करण्याची तयारी पोलिसांनी केली होती, पण गर्दीत घुसून गुरुजी पसार झाले. पारोळ्याला आले. एरंडोलला पोहोचले. ८-१० दिवासंनी पुन्हा गुरुजींनी गुप्तपणे येऊन अंमळनेरला वाळवंटात सभा घेतली. प्रचंड सभा झाली. या वेळी मात्र पोलिसांनी फारच सावध राहून बंदोबस्त कडक ठेवला होता. त्यामुळे त्यांनी सभा संपताच गुरुजींना अटक केली. दुसऱ्या दिवशी खटल्याचे नाटक झाले आणि १७ जानेवारी १९३२ रोजी गुरुजींना दोन वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली.
गुरुजंनाही धुळे तुरुंगातच पाठविण्यात आले. विनोबाजी तिथे होतेच. इतरही पुढारी, खेड्यातील कार्यकर्ते, मुले, स्त्रिया आदी सत्याग्रही होते. गुरुजींनी तुरुंगात आल्यावर विनोबांच्या चक्की पथकात आपले नाव नोंदवले. त्यांच्या वाट्याला जे काहो २५-३० पौंड घान्य दळण्याचे येई ते धान्य ते अतिशय वेगाने दळून टाकीत. या कामात गुरुजींचे जोडीदार थकून जात. दळण एकदा सुरू झाले म्हणजे त्यांचा हात गिरणीतील यंत्राप्रमाणे सारखा फिरत राही. विनोबा म्हणायचे, 'गुरुजी, तुमची पंजाब मेल आहे.' धुळ्याच्या तुरुंगात असताना गुरुजी 'कडी बरॅक'मध्ये होते, तर विनोबाजी 'बार कोठा'मध्ये होते. दळताना गुरुजी आपल्याबरोबर असावेत असे सर्वच तरुण सत्याग्रहींना वाटे, दळताना गुरुजी गाणीही म्हणायचे -
निवडावे तण शेती करावी राखण ।
निवडावे खडे तेचि दळण नोझे पडे ।
गुरुजी स्वत:च्या कोट्याचे दळण दळतच, पण ज्या कुणाचे बाकी राहिले असेल त्याचेही दळून देत असत आणि ते केवळ सत्याग्रही राजबंद्यांचेच नव्हे, तर इतर गुन्हेगार कैद्यांनाही दळू लागायचे. एकदा त्यांना थोडे बरे नव्हते. सोबती म्हणाले,
“गुरुजी, आज नका दळायला येऊ. आम्ही दळून टाकतो.” पण त्यांनी ऐकले नाही. म्हणाले, “मी काय इथे आयतें बसून खायला आलो आहे काय?”
चक्कीवर दळताना घाम यायचा, अंग चिकचिकून जायचे अशा वेळी जर गार वाऱ्याची झुळूक आली तर किती बरे वाटायचे. गुरुजी आनंदून म्हणायचे, “आईचा वारा आला रे आला!”
जेलच्या अन्नासंबंधीच्या जेव्हा सत्याग्रहींच्या तक्रारी बाढू लागल्या, तेव्हा साऱ्या जेलचा स्वयंपाक विनोबांनी आपल्या हाती घेतला. त्यांनी स्वयंपाकघरात ठाण मांडल्याचे पाहून गुरुजींसारखे लोकही त्यांना येऊन मिळाले. त्या वेळी धुळे जेलचे
वरण फारच प्रख्यात झाले होते.
धुळे जेलची सर्वांनाच सर्वोत्तम अशी निरंतरची जर कोणती अपूर्व देणगी मिळाली असेल तर ती म्हणजे विनोबाजींची 'गीता-प्रवचने', तुरुंगातील सहकाऱ्यांनी विनोबांना त्यांच्या 'गीताध्ययना'चा लाभ मिळावा, अशी विनंती केली आणि विनोबांनी ती मान्य केली. दर रविवारी एक याप्रमाणे ही प्रवचने देण्याचे ठरले.
त्यानुसार २१ फेब्रुवारी १९३२च्या रविवारी विनोबांचे पहिले प्रवचन झाले. गीतेची अठरा प्रवचने १९ जून १९३२ शेजी समाप्त झाली, या वेळो श्रोत्यांत गुरुजी होतेच. पण केवळ त्यांनी श्रवणभक्तीच केली नाही, तर ती सर्व प्रवचने यांनी शब्दश: टिपून घेतली. दिवसा ऐकलेली व भरभर लिहून घेतलेली प्रवचने गुरुजी रात्री बसून परत लिहून काढीत असत. गुरुजींसारखा सिद्धहस्त लेखक त्या वेळी तिथे उपस्थित होता म्हणूनच केवळ विनोबांची तो प्रवचने वाऱ्यावर न जाता
अक्षरबद्ध झाली आणि पुढे ती काही त्यांच्या 'काँग्रेस' नामक साप्ताहिकातून व नंतर पुस्तकरूपाने सर्वांना उपलब्ध झाली. पुढे तर सर्व भारतीय भाषांमधून ही प्रवचने अनुवादित झाली असून इंग्रजीतही 'Talkson Gita' या नावाने ती उपलब्ध
आहेत. विनोबांनीच म्हटले आहे, “गीता प्रवचने हे आता भारतीय जनतेचे पुस्तक.” त्या वेळची आठवण गुरुजी सांगतात, “ती अपूर्व मेजवानी होती. अमृतधारा स्त्रवत होती. गीता म्हणजे विनोबाजींचा प्राण. ते म्हणायचे, 'आईच्या दुधावर मी
पोसलो आहे, त्यापेक्षा गीतेच्या दुधावरच मी अधिक पोसलो आहे. मी नेहमी गीता-समुद्रातच डुंबत असतो.' गीता विनोबाजींच्या रोमरोमी आहे. गीतेवर प्रवचने देताना ते तन्मय होत.”
-----------------------------------------------------------------
सेनानी सानेगुरुजी - राजा मंगळवेढेकर - अनुक्रमणिका
>-----------------------------------------------------------------