१२, धुळ्याच्या तुरुंगात - २
-----------------------------------------------------------------
सेनानी सानेगुरुजी - राजा मंगळवेढेकर - अनुक्रमणिका
>-----------------------------------------------------------------
१२, धुळ्याच्या तुरुंगात - २
दररोज चक्कीचे काम संपले म्हणजे गुरुजी स्नान आटोपून विनोबांच्या कोठडीत जाऊन बसायचे. बोलायचे नाहीत. विनोबांकडे येणाऱ्यांचे बोलणे ऐकत रहायचे. वहीत टिपून ठेवायचे. संध्याकाळी गुरुजींच्या भोवती तरुणांचा वेढा असायचा. गुरुजी त्यांना काँग्रेसचा इतिहास सांगायचे. इतरही कितीतरी गोष्टी सांगायचे. कविता, गाणी म्हणून दाखवायचे. त्यांची मायेने विचारपूस करायचे. त्यामुळे प्रत्येकालाच गुरुजी हवेहवेसे वाटायचे.
काही मुले तर फार लहान होती. १४-१५ वयाचीच होती. त्यांना कापूस पिंजणे वगैरे कामे दिली होती. गुरुजी त्यांच्या 'छोकरा फाईल'मध्ये जाऊन त्यांनाही मदत करायचे. गोष्टी सांगायचे. पिंजणाऱ्या ध्वनीने रंगून जायचे नि नाचायलाही लागायचे कधी कधी. गुरुजींच्या जवळ रहायला मिळावे अशी सर्वांचीच इच्छा असे. मग एकेका बराकीत आठ आठ दिवस याप्रमाणे गुरुजींची वाटणी होई. गुरुजींच्या सानिध्यामुळे त्या लहानग्या मुलांना तुरुंगाचे खडतर जीवन सुसह्य होई.
तुरुंगात असले तरी बाहेरच्या चळवळीशीदेखील जमेल तसे अनुसंधान गुरुजी ठेवत होते. कोणी सुटला तर त्याच्याबरोबर पत्र-निरोप धाडून गुरुजी मार्गदर्शन करत होते. असेच एक आपले मित्र चंद्रोदय भट्टाचार्य यांना गुरुजींनी लिहिले होते.
त्यातील त्यांची तेजस्वी भावना व तीव्र तळमळ पाहण्यासारखी आहे. गुरुजी लिहितात :
“मी शाळेतील विद्यार्थ्यांना काय सांगणार? वल्लभभाईंच्या एका वाक्याची मी त्यांना आठवण करून देतो. मागच्या चळवळीच्या वेळेस वल्लभभाई मुंबईत म्हणाले, 'माझा मुलगा आज शाळा-कॉलेजात शिकत असता तर मी त्याला गोळी
घालून ठार केला असता. सर्वजण एकजात देशासाठी हा जो झगडा चालला आहे त्यासाठी उठून पुढे या! तुम्हा मुलांकडे, तुमच्या निर्मळ, उघड्या व उदार हृदयांकडे भारतमाता पहात आहे. अरे, शिकता काय? शिकून शिकून जे कर्तव्य करायचे,
ते तुम्हाला आज हाक मारीत आहे. गंगा आली असता घरात कसे रहावते? आगडोंब पेटला असता शाळेत कसे वाचवते? मैदानावर कसे खेळवते? घरी कसे खाववते?
अरे; पहा त्या उत्तर हिंदुस्थानाकडे, तो बंगाल पहा, कसा पेटला आहे! तो गुजरात पहा, कशा भगिनी शेकडोंनी तुरुंगात जात आहेत! तुम्हाला महाराष्ट्राचा अभिमान नाही का? महाराष्ट्राची मान वर धरता यावी म्हणून आता कोण पुढे येणार? तुम्हा तरुण मुलांवर सारी भिस्त आहे. ज्या राष्ट्रातील तरुणही म्हाताऱ्यासारखे वागतात, त्या राष्ट्राच्या उद्धाराची आशा नाही. आता परीक्षेचा विचार नको. घरादाराचा विचार नको. सारे मोह झडझडून जाळा. विलायती कपडे जाळा. झेंडे हाती घ्या आणि विजेसारखे तळपून उठा! सर्वत्र जे दुबळेपणाचे, भित्रेपणाचे, मेलेपणाचे वातावरण आहे ते बदलून प्रचंड तेज निर्माण करा! मी लहानसा जीव पण माझ्या हृदयाची तगमग होते. मी तुम्हाला माझे हृदय कसे उघडून दाखवू? उठा सारे, घ्या झेंडे, बना निर्भय आणि लाठीकाठी, तुरुंग, गोळी यासाठी या पुढे! हेच खरे शिक्षण!”
पुस्तकी शिक्षणापेक्षा जीवनस्पर्शी शिक्षण गुरुजींना प्रिय वाटे. राष्ट्र स्वातंत्र्यासाठी लढत असताना मुलांनी शालेय, पुस्तकी शिक्षणाचे स्तोम माजवू नये, तर राष्ट्रीय कर्तव्य करण्यास सिद्ध व्हावे. असे त्यांना वाटे, मुलामुलींनी लढा आता चालवावा! भारतमातेचा कलंक घालवावा!” असे एक गाणेही त्यांनी केले होते. मुलांच्या 'वानरसेना' गावोगावी काढाव्यात अशी त्यांची कल्पना होती. त्यासाठी त्यांनी केलेले गीत सर्वत्र म्हटले जाई -
वानर वानर हुय्या रे । वानर वानर हुप हुप हुप ॥ .
महात्मा गांधी आले राम
त्यांचे करूया चला काम
त्यांनी मारली आहे हाक
चला उठा लाख लाख
नका बसू गुपचुप । वानर वानर हुप हुप हुप ॥
अशाच एका गुरुजींच्या पत्रावरून मुंबईचा गव्हर्नर सर फ्रेडिक साइक्स हा त्या वेळी भुसावळला येणार होता म्हणून मुलांनी निदर्शने करण्याचे ठरविले. गुरुजींनी लिहिले होते, “जिल्ह्याची शान राखा. काळी निशाणे दाखवा. त्याला 'परत जा' म्हणून सांगा.” पोलिसांचा बंदोबस्त कडेकोट असतानाही गुरुजींच्या प्रेरणेने पेटलेल्या मुलांनी काळे झेंडे दाखवून 'साइक्स गो बॅक' अशा आरोळ्या ठोकल्या. मुलांना फटके बसले. उपवासही घडला. पण त्यांनी ते धैर्याने, निष्ठेने सोसले. गुरुजींना मुलांच्या या धैर्याचे फार फार कौतुक वाटले.
-----------------------------------------------------------------
सेनानी सानेगुरुजी - राजा मंगळवेढेकर - अनुक्रमणिका
>-----------------------------------------------------------------