११. स्वदेशीचे व्रत - २

Parent Category: मराठी पुस्तके Category: सेनानी साने गुरुजी Written by सौ. शुभांगी रानडे

-----------------------------------------------------------------
सेनानी सानेगुरुजी - राजा मंगळवेढेकर - अनुक्रमणिका
>-----------------------------------------------------------------

११. स्वदेशीचे व्रत - २

एकदा एक काम हाती घेतले म्हणजे त्यात सर्वस्वाने झिजायचे, कष्टायचे, हे तर गुरुजींचे ब्रीद! सूतयज्ञाच्या कामालाही ते असेच भिडले आणि गांधी जयंतीपर्यंत वीस लाखच नव्हे, तर त्याहूनही कितीतरी अधिक वार सूत अंमळनेर तालुक्‍याच्या
वतीने अर्पण करून त्यांनी आपला संकल्प सिद्धीस नेला. त्या वेळी ठिकठिकणी खादीभांडारे नव्हती. गुरुजी खादीचे गठ्ठे कधी खांद्यावर घेऊन तर कधी एखाद्या हातगाडीवर घालून खादी विक्रीसाठी अंमळनेर शहरातून आणि खेड्यापाड्यांतूनही फेरी काढीत असत. गुरुजी शाळेत नसले, तरी विद्यार्थ्यांचा गराडा त्यांच्याभोवती सदैव असेच. त्यांनाही गुरुजी या कामाला लावत असत. खादी-प्रचारासाठी गाणी म्हणत, घोषणा देत या मुलांसह फेरी काढत असत.

त्या काळात स्वदेशाबद्दल त्यांची भावना किती तीव्र असे हे त्यांनी त्या वेळी लिहिलेल्या अनेक गीतांमधून, लेखातून दिसून येते. असेच एक गीत -

हृदय जणु तुम्हा ते नसे
बंधु उपाशी लाखो तरीही

सुचती विलास कसे
परदेशी किती वस्तु घेता

बंधुस पास नसे

विनोबांनी गुरुजींना डांगरीच्या आश्रमात ठेवले होते. डांगरीच्या आश्रमात किंवा अंमळेनरच्या सूतशाळेत असले म्हणजे गुरुजी हातानेच स्वयंपाक करून जेवत असत. डांगरीच्या आश्रमात तर मातीचीच गाडगीमडकी होती. पण गुरुजींचे
कशावाचून काही अडत नसे. त्यांनी आपल्या गरजा अत्यंत थोड्या, आवश्यक तेवढ्याच ठेवलेल्या होत्या. कपडे, खाणेपिणे वगैरे बाबतीतला त्यांचा साघेपणा फारच होता. जेवणाच्या बाबतीत तर ते बेफिकीर होते म्हटले तरी चालेल. कधी स्वयंपाक करायचे, पण पुष्कळवेळा दौर्‍्यामुळे, कामामुळे वेळच नसायचा. अशा वेळी डाळ-चुरमुरे-फुटाणे-शेंगदाणे यावरच ते भागवीत असत. कुणाकडे गेले आणि त्यांनी 'गुरुजी जेवायला बसा' म्हटले की, 'जेवूनच आलो' असे ते दडपून सांगायचे. त्यांनीच एकदा म्हटले आहे, 'जेवणाच्या बाबत्तीत मी अनेक वेळा खोटे बोललो आहे.' गुरुजीचा स्वभावच अतिभिडस्त आणि संकोची होता. आपल्यामुळे दुसऱ्यांना एवढासाही त्रास होऊ नये, अशी त्यांची त्यामागची भावना असे.

२ ऑक्टोबर १९३१ रोजी गुरुजींनी गांधी जयंतीच्या दिवशी सूतयज्ञाचा संकल्प पूर्ण केला होताच, पण त्या दिवशी गांधीजींना अत्यंत प्रिय असा दुसराही एक कार्यक्रम गुरुजींनी अंमळनेरमध्ये आखला. तो म्हणजे सफाईचा. विद्यार्थ्यांची
त्यांनी पथके तयार केली. झाडू, खोरी, घमेली, कुदळी, फिनेल इत्यादी साधने जुळवली. गिरणीकामगारांच्या वस्तीतील संडास सफाई केली. मोऱ्या उपसल्या, फिनेल वगैरे टाकून स्वच्छ केल्या. एका चाळीतही असाच कार्यक्रम झाला. चाळीचे
मालक म्हणू लागले, "गुरुजी, हे काय?" गुरुजीनी उत्तर दिले, 'आज गांधी जयंती, लोक 'महात्मा गांधी की जय' म्हणत असतात. त्यांना गांधीजींचा सेवाधर्भ कळावा म्हणून मुद्दाम हा कार्यक्रम ठेवला.”

नंतर काही खेड्यांतूनही स्वच्छता पथके गेली. गुरुजींनी या सफाई कार्यक्रमासाठी गाणी, संवादही लिहिले होते. निरनिराळ्या विषयांवरची आकर्षक अशी पोस्टर्स पुढे ठेवून गुरुजी भाषणे देत असत. समाजशिक्षणाचे व्रतच त्यांनी अंगीकारलेले होते.

त्याच सुमारास पूर्व खानदेशात अतिवृष्टी झाली. त्यामुळे शेतकऱ्यांचे रानातले कपाशी, ज्वारी आदी पीक पार हातचे गेले. सगळीकडे चिंतेची परिस्थिती निर्माण झाली. आधीच दैन्य, दारिद्र्य त्यात ही आपत्ती. गुरुजींनी खेड्याकडे घाव घेतली.
ते एकेका गावात जायचे. लोकांना देवळात, चावडीत जमवायचे. सुरुवातील लोक सांगूनही यायचे नाहीत. गुरुजी मग चिडायचे, रागवायचे. त्यांना वाटायचे, 'एवढे आम्ही यांच्याकरता येतो. राबतो. पण यांना याचे काहीच वाटत नाही. भेटतही
नाहीत...'

पण लवकरच त्यांचा हा रागही ओसरे. मग अंतर्मुख होत ते म्हणायचे, 'चूक त्यांची नाही, आमचीच आहे. या आधी आम्ही त्यांना कधी भेटून त्यांची विचारपूस केली होती का? कधी त्यांना विश्वासात घेतले होते का? मग कसा त्यांचा एकदम
आमच्यावर विश्वास बसावा?'

गुरुजींनी चिकाटीने हे काम सुरू ठेवले. जवळ जवळ एकशेदहा खेड्यांतून ते गेले. शेतकऱ्यांना भेटले. पूर्वीचे पिकाचे मान, या सालची परिस्थिती या संबंधी आवश्यक ती माहिती गोळा केली. त्या आधारे कलेक्टरकडे अर्ज करून मदतीसाठी
लिहिले. एक वेगळ्या तऱ्हेचे काम या वेळी गुरुजींनी केले होते. त्यामुळे खानदेशातील खेड्यांचे आणि खेडूत जीवनाचेही अत्यंत जवळून दर्शन त्यांना घडले होते. ग्रामीण जीवनातील विविध प्रश्‍नही विविध तऱ्हेने पुढे आले होते. एक कार्यकर्ते म्हणून गुरुजींना हे लाभदायक असे शिक्षणच मिळाले होते. याचा उपयोग त्यांना पुढे पुष्कळच झाला.

१९३० सालच्या कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतलेल्या खानदेशातील सत्याग्रहींचे एक संमेलन असोदा येथे घेतले होते. या संमेलनाला अध्यक्ष म्हणून विनोबाजी आले होते. गुरुजींची आणि विनोबांची ही पहिली भेट. विनोबांचे संमेलनात फार सुंदर भाषण झाले. गुरुजींची या पहिल्या भेटीतच विनोबांवर भक्ती जडली. याच सुमारास विनोबांचा खानदेशात दौरा झाला होता. त्या वेळी गुरुजी त्यांच्याबरोबर होते. विनोबांच्या मुखातून नवविचार ऐकत होते; आत्मसात करत होते. गुरुजींनी पुढे 'विनोबाजी भावे' नावाचे छोटे चरित्रही लिहिले आहे. गुरुजी म्हणत असत, “विनोबांनी माझे वैचारिक पोषण फार मोठ्या प्रमाणावर केले आहे.” विनोबांच्या व्यक्तिमत्त्वाची आणि बुद्धिमत्तेची विलक्षण छाप गुरुजींवर या वेळी पडली होती आणि विनोबांच्या चित्तावरही गुरुजींच्या सौजन्यशील, सेवाभावी व भावनाशील चारित्र्याचा ठसा उमटल्याशिवाय राहिला नाही.

विनोबाही या वेळची आठवण सांगताना म्हणाले, “गुरुजी आणि मी खानदेशाच्या दौऱ्यात होतो. मोटरने चाललो होता. त्या वेळी गुरुजींनी आपली एक कविता मला म्हणून दाखविली होती. ती ऐकली आणि मी म्हणालो, 'गुरुजी, तुमची कविता आहे मराठी, पण वाटली बंगालीसारखी.' तेव्हा ते हसले आणि म्हणाले, “बरोबर आहे. तिचे बंगाली टोन आहेत.'

त्रिचनापल्लीस असताना गुरुजींनी काही कविता बंगाली चालीवर लिहिल्या होत्या. गुरुजींची आंतरभारती दृष्टी नि विनोबांची सूक्ष्म रसिकता यातून प्रकट होते.

-----------------------------------------------------------------
सेनानी सानेगुरुजी - राजा मंगळवेढेकर - अनुक्रमणिका
>-----------------------------------------------------------------

Hits: 131
X

Right Click

No right click