स्वप्नपूर्ती
चांदण्या रात्रितले ते स्वप्न मम साकारले ।
प्रीतीचे मंदीर ह्रदयी भव्य तू आकारले ॥१॥
पाहता नयनी तुझ्या मी भान माझे हरपले ।
दृष्टीने तव भाळले अन मी न माझी राहिले ॥२॥
विरुन गेले तत्क्षणी ते शब्द मम ओठातले ।
प्रीतीची सरिता बहे मग बांध नच मी घातले ॥३॥
अंतरीचे भाव माझ्या प्रीतीने तव जाणिले ।
हस्तस्पर्शातून सारे अंग अंग शहारले ॥४॥
प्रेमभावे जवळ सरुनी स्कंधी तव मी विसावले ।
भाग्य माझे कंठी मम या तन्मणी तू बांधले ॥५॥