बॅंकाकची सफर भाग - ३
येथील सर्व इमारती व गाड्या वातानुकूलित केलेल्या दिसल्या. आपल्याकडे वातानुकूलन व्यवस्था म्हणजे अप्रूप व अतिश्रीमंतीचे लक्षण वाटते . इमारतीसाठी पूर्ण काचेच्या खिडक्या, भिंतीना वालपेपर, जमिनीवर पूर्ण गालिचा, पाण्याचे कारंजे, फुलझाडे व किमती शोभेच्या वस्तू यांनी येथील हॉटेल्सच नव्हे तर साधी दुकाने, घरे व ऑफिसेसही सजवलेली असल्याने फार आलिशान वाटतात. येथील इमारतींचे बांधकाम करता वातानुकूलनाच्या दृष्टीकोनातून केलेले आढळते. वातानुकूलन यंत्रणादेखील अगदी सोपी वाटली. इमारतीच्या छतावर पाण्याची गोल टाकी असावी तशी ही यंत्रणा दिसते. वरच्या बाजूला जाळी व आत हवा वर खेचण्यासाठी पंखा बसविलेला असतो. इमारतीतील ऊष्ण हवा बाहेर टाकल्याने आतील तापमान कमी होते. मुंबईत अशाप्रकारे वातानुकूलन यंत्रे बसवायला खरे म्हणजे हरकत नसावी.
थायलंडमधील साखर, कागद व अल्कोहोल निर्मिती करणार्या अनेक कारखान्यांना आम्ही भॆटी दिल्या. त्या सर्व ठिकाणी विशेष जाणवलेली गोष्ट म्हणजे तेथील सर्वांचा, मॅनेजरपासून कामगारापर्यंत एकच गणवेश होता. प्रत्येकाच्या शर्टावर रंगीत फोटो असणारे आयडेंटिटी कार्ड होते. प्रत्येक कारखान्यात स्वागतकक्षाशेजारीच एक छोटा हॉल होता. त्यात सरकते फळे, स्लाईद प्रोजेक्टर व ओव्हरहेड प्रोजेक्टरची सोय होती. कारखान्याविषयी सर्व माहिती तेथे दिली जायची. एका ठिकाणी तर कारखान्याची व्हिडिओ फिल्म आम्हाला दाखविण्यात्त आली.
सर्वांची बोलण्याची पद्धत नम्र व अदबीची. थायलंडमधिल सर्व वास्तव्यात कोठेही गडबड, गोंधळ वा भांडण पहायला मिळाले नाही. हा विशेष खरोखरच आपण आत्मसात करावयास हवा. कारखान्यातील स्वच्छता व टापटीप वाखाणण्याजोगी होती. कारखान्यात, हॉटेल, ऑफिस, दुकाने या सर्व ठिकाणी आम्हाला स्त्रियांचे प्रमाण खूपच जास्त आढळले. त्यातही हे विशेष की स्त्रियाही सर्व कामे अतिशय सहजतेने व कुशलतेने करताना आढळली. अगदी टॅक्सी, बस वा ट्रकचे ड्रायव्हर, पोस्टमन, पोलीस यासारखी कामेही स्त्रिया करीत होत्या. ब्रह्मदेशाला स्त्रियांचा देश म्हणायचे. थायलंड ब्रह्मदेशाच्या जवळचा म्हणून असे असेल कदाचित. याबाबतीत तेथील लोकांना विचारले तेव्हा कळले की व्हिएटनामच्या लढाईपासून येथील बहुतेक पुरूष व मुले सैन्यात भरती होतात.
बॅंकाकमध्ये पहिले तीन दिवस कारखान्यांच्या भेटी देण्यात गेले. ५ मे रोजी थयलंडचा राश्ट्रीय दिवस ‘राज्यारोहण दिन’ अस्ल्याने सुट्टी होती. म्हणून त्या दिवशी बॅकाकमधील प्रेक्षणीय मंदिरे व अयुधयाची पुरातन राजधानी पाहिली. येथील देवळांमध्ये नक्षीकाम व सोनेरी रंगाचा वापर बराच केलेला आढळला. इमारतींची छपरे वेगवेगळ्या रंगांची, विशेष करून गडद जांभळ्या, निळ्या वा लाल रंगाची होती. त्यासाठी त्यात्या रंगांची कौले वापरली होती. एकावर एक पांगरुणे गेतल्यासारखी दोन किंवा तीन छपरांची रचना, मोर व अन्य काही नक्षीकामाचे नमुने या चपराम्वर लावलेले असल्याने थाई लोकांच्या कलात्मकतेचे दर्शन होत होते.
दिनांक ७ व ८ तारखांना चुलालुकॉंग विद्यापिठात चर्चासत्र झाले. आंतरराष्ट्रीय पर्यावरण संस्था, थायलंद्ड सरकारचे प्रतिनिधी, विद्यापिठातील प्राध्यापक आणि तेथील कारखान्यांचे जवळजवळ ५०-६० प्रतिनिधी व आम्ही ३२जण असे १०० लोक चर्चासत्रास उपस्थित होते.
प्रत्येक सत्रात एक थायलंडमधील तज्ञ व एक भारतीय तज्ञ अशा दोघांनी आपले शोध प्रबंध सादर केले. भारतीय व थाई तंत्रज्ञानाचा सापेक्षाने विचार झाल्याने या माहितीचा सर्वानाच लाभ झाला. नंतर थायलंड येथील प्रदूषण नियंत्रणाबाबत असणार्या कायद्यातील तरतुदी व व्यवस्था याविषयी उद्बोधक चर्चा झाली.
बॅंकाकमधील वास्तव्यानंतर आम्ही सिंगापूरला रवाना झालो. सिंगापूरमधील बाजार व प्रेक्षणीय स्थळे पाहून तेथील प्रगतीची कल्पना आली मात्र तेथे थायलंडमध्ये जो अनोखा नव्या जुन्याचा संगम झालेला अनुभवास आला त्याची सर आधुनिक सिंगापूरला आली नाही.
बॅंकाक-सिंगापूरची ट्रीप करून परत आलो व इतके दिवस झाले तरी बॅंकाकची सफर मनात जशीच्या तशी ताजी आहे. एकाचवेळी प्राचीन भारतातील सुवर्णयुगाचा काळ व भविष्यकाळातील प्रगत वैभवसंपन्न भारताचे दर्शन झाल्यासारखे मला वाटले. भविष्यात भारत प्रगत झाला तर त्याने थायलंडसारखी प्राचीन भारतातील सुवर्णयुगाची प्रतिसृष्टी पुढच्या पिढ्यांसाठी निर्माण करायला हवी.