बँकॉकची सफर भाग - २
थायलंड हा ब्रम्हप्रदेशाच्या दक्षिणेकडे समुद्रापर्यंत पसरलेला देश. बँकॉक ही त्याची राजधानी पूर्वी अयुधया (आयोध्याचे अपभृष्ठ नाव) येथे ही राजधानी होती. ब्रम्हदेशाच्या आक्रमणात ही राजधानी उध्वस्त झाल्याने बँकॉक येथे नवी राजधानी वसविण्यात आली. थायलंडची लोकसंख्या ५.५ कोटी तर बँकॉकची ५५ लाख. थायलंडचा उत्तरेकडील भाग डोंगराळ व मागासलेला आहे अजूनही तेथे हत्तींचे कळपच्या कळप लाकडी ओडक्यांची वाहतूक करण्यासाठी वापरले जातात. आता मात्र बँकॉक आधुनिकतेने नटले आहे. उत्तम रस्ते, सुबक देखण्या इमारती, वातानुकूलीत टॅक्सी व इतर अनेक प्रकारच्या परदेशी मोटार गाड्या, उंची हॉटेल आणि चैनीच्या वस्तूंची बाजारपेठ यामुळे बँकॉक पूर्णपणे युरोप अमेरिकेतील शहरासारखे वाटते. मात्र येथे जुन्या संस्कृतीची व धार्मिक परंपरांची काळजीपूर्वक जपणूक केल्याचे पदोपदी जाणवते. सर्वत्र बौद्ध धर्माचा पगडा असला तरी नक्षीकाम केलेली मंदिरे, सांस्कृतिक कार्यक्रमात वापरले जाणारे मुगुट, राम नावाच्या राजाला दिला जाणारा मान, हात जोडून नम्रपणे अभिवादन करण्याची पद्धत व थाई लोकांच्या चेहर्यावरील निष्पाप गोंडस भाव पाहिले की आपण पुरातन कालातील भारताच्या सुवर्णयुगातच वावरत आहोत असा भास होतो. एका बुद्धमंदिरात ५॥टन वजन असलेली अस्सल सोन्याची भव्य मूर्ती पाहिल्यावर तर हा समज अधिकच दृढ होतो.
थायलंडचे चलन `बाथ' सर्वसाधारणपणे २ बाथ म्हणजे एक रूपया असा हिशोब धरता येईल. थायलंडमधील मुख्य पीक भात. खाण्यामध्ये मात्र थाई लोक समुद्रातील मासे व इतर जलचरांचा भरपूर वापर करतात. येथील ७० टक्के लोक बुद्ध धर्मीय आहेत व धार्मिक परंपरांची जपणूक ते काळजीपूर्वक करतात. थायलंडमध्ये राम नावाचा राजा आहे व त्याच्या आज्ञेनुसार सर्व राज्यकारभार चालतो. मिसेस लेक सांगत होती आम्ही भोवतालची रहदारी पहात होतो विविध रंगी छपरे असणार्या देखण्या इमारती, नक्षीकाम केलेली देवळे व रेखीव रस्ते यामुळे आपण परदेशात आहोत हे क्षणोक्षणी जाणवत होते.
पेनुन्सुला हॉटेल या भव्य वातानुकुलित हॉटेलमध्ये आमची राहण्याची सोय केली होती. सर्व आधुनिक सोयीनीयुक्त असलेल्या प्रत्येक खोलीत डबल बेड, फ्रीज व छोटा `सोनी' टीव्ही होता. टीव्हीवर सकाळी ७ पासून रात्री २ पर्यंत १२ चॅनेलवर विविध कार्यक्रम चालू असायचे. भारतीय हिंदी सिनेमे इंग्लिश, थाई व चिनी चित्रपटांच्या व्हिडीओ फिल्म टीव्ही मधून दाखविण्याची सोय हॉटेलमध्ये केलेली होती. सकाळी कार्यक्रम सुरू व्हायचे तेच थायलंदच्या राजाचे गुणगानाने व त्याच्या दिनक्रमाचे दर्शन घडविले जायचे. नंतर बातम्या प्रथम थाई व नंतर इंग्लिश. त्यानंतर व्यायाम. संगीताच्या तालावर चालणारा कवायतीचा हा कार्यक्रम इतका आकर्षक असायचा की प्रत्येक प्रेक्षकाला त्या तालावर व्यायाम करण्याची प्रेरणा व्हावी.सध्या भारतातही टीव्हीवर असे प्रयोग चालू झाले आहेत. पण त्यात खूपच सुधारणा व्हावयास हवी असे येथील कार्यक्रम पाहून वाटले. प्लॅस्टिकच्या नाजुक फुलांचा फ्लॉवर पॉट शोभिवंत सिलिंग, डनलॉप गाद्या व वुलनची पांघरूणे, गार, गरम पाण्याच्या शॉवरची सोय यामुळे तेथे राहण्याचे सुख काही औरच होते. आंघोळीसाठी मात्र टब असल्याने फारच पंचाईत व्हायची भरलेल्या टबमध्ये बसून आंघोळ करणे न आवडल्याने टब रिकामा ठेवून शॉवरवरच आम्ही आंघोळ उरकून घेत असू. सकाळी ब्रेकफास्ट म्हणून टोस्ट, आम्लेट, संत्र्याचा रस मिळायचा. चहा पिणार्याचे मात्र जरा हालच व्हायचे. दूध पावडरचे व पिवळया रंगाचे, चहाही अगदी बेचव व फार महाग ८ - ९ रूपयाला एक कप. त्यामुळे चहा पिण्यापेक्षा संत्र्याचा रस घेणेच आम्ही पसंत केले.
हवा मुंबई, गोव्यासारखी पण त्यामानाने खूपच दमट व ऊनही जाणवण्यासारखे कडक. त्यामुळे बाहेर हिंडताना घामाची चिकचिक नकोशी वाटते. जेवणाखाणाचे बाबतीत नवख्या व त्यातून शाकाहारी माणसाची पंचाईत होते. कारण सर्व हॉटेलमधून `सी- फूड' समुद्रातील अन्न या नावाखाली विविध प्रकारचे मासे, झिंगे, आईस्टर, खेकडे व इतर कीटक तळून दर्शनी कपाटांत लावलेले असतात व त्यांचा उग्र दर्प नाकात भरतो त्यामुळे खाण्यावरची वासनाच उडते. सी-फूड हा थाई लोकांचा आवडीने आमच्या सर्व दौर्यात आम्ही हॉटेलमधून मुद्दाम भारतीय अन्नपदार्थांचे डबे घेऊन जायचो त्यामुळे आमचा तेथे निभाव लागला.