दारू - समाज अधोगतीचे कारण
महात्मा गांधी यांनी भारतीय समाजाचे निरीक्षण करून काही महत्वाच्या चळवळी सुरू केल्या होत्या. त्यातील ‘दारुबंदी’ ही सर्वात महत्वाची चळवळ होती. स्वातंत्र्यलढ्य़ाच्या काळात असहकार, सविनय कायदेभंग, मिठाचा सत्याग्रह, स्वदेशीचा वापर इत्यादी चळवळींचा प्रभाव जनमानसावर पडला. मात्र दारुबंदी हा विषय मात्र गांधी तत्वज्ञानाचा एक भाग बनला व सच्चे गांधीवादी सोडता इतरांनी तो फारसा गांभीर्याने घेतला नाही. आतातर सध्याच्या नव्या पाश्चिमात्य संस्कृतीच्या लोंढ्यात दारूला विलक्षन प्रतिष्ठा प्राप्त झालेली आहे.
सरकारनेदेखील दारुबंदी खाते निर्माण केले खरे मात्र त्याच्याकडे उत्पनाची बाब म्हणून पाहिले. दारू दुकानाचा परवाना, दारू पिण्याचा परवाना, विदेशी दारूवर कर इत्यादी मार्गाने पैसे मिळविणे हेच महत्वाचे कार्य या खात्याकडे राहिले.
दारुच्या व्यसनामुळे भ्रामक सुखाची चटक लागते. सर्व दुःखांचा विसर पडतो. पैशाचा व तब्बेतीचा नाश होतो आहे याचे भान रहात नाही. कर्जात दिवसेदिवस अधिकाधिक बुडण्याची पाळी येते. कौटुंबिक स्वास्थ्य संपते.त्याच्या आशा-आकांक्षांचा चक्काचूर होतो. आर्थिक विषमता, जाती धर्माची विषमता, शोषण करणारी सरंजामशाही वृत्ती याविरुद्ध आवाज उठविण्याचे बळ राहत नाही. एवढेच नाही तर पैशाच्या लोभाने याविरुद्ध लढणार्या समाजसेवकांना नेस्तनाबूत करण्याच्या कार्यात धनदांडग्यांना मदत करण्यात कमीपणा वाटत नाही.
जग हे गरीब माणसाच्या बाबतीत फार क्रूर असते. श्रीमंताचे हजार गुन्हेही समाज चालवून घेतो. मात्र गरिबाचा एक गुन्हा समाजाच्या रोषाचे कारण बनतो. केवळ श्रीमंतच नव्हे तर त्याच्यासारखे गरीब लोकही अशा गुन्हेगाराला शिक्षा देण्यास अग्रेसर असतात. आपण त्यातले नाही हे त्यांना समाजाला दाखवून द्यायचे असते. या शिक्षेमुळे त्याची गुन्हेगारी संपेल अशी त्यांची कल्पना असते. मात्र गुन्हेगारीचा शिक्का त्याच्यावर बसल्यावर सारे जग त्याचे कडे तुच्छतेने गुन्हेगार म्हणूनच बघते.
यासाठी गरीब माणसाने जास्तीत जास्त संयम व सहनशीलता दाखविण्याची गरज असते. पण एवढी विवेकशक्ती त्यांच्या अंगात नसते. संताप, उलट उत्तर, मारामारी यासारख्या त्याच्या प्रतिक्रिया आगीत तेल ओततात. पूर्वीचा आरोप त्यामुळे अधिक दृढ होतो. पोलीसही हात धुवून मागे लागतात. त्याच्या कडून पैसे उकळण्याचे प्रयत्न होतात. साहजिकच सर्व बाजूने कात्रीत सापडलेली ती व्यक्ती पुन्हा गुन्हा करण्यास प्रवृत्त होते.
गरिबी, दुःख, अगतिकता, नैराश्य यापासून सुटका मिळविण्यासाठी गरीब माणूस दारूला जवळ करतो खरे. पण एकदा दारूची सवय लागली की ती त्याला गुलाम बनवते. अशा दारूच्या नशेत उसने अवसान येऊन गुन्हा घडतो. गुन्हा करणार्याला त्याची शुद्ध नसते. नंतर फार उशीर झालेला असतो. गुन्ह्याचे दुष्ट चक्र त्याच्यामागे लागते व तो व त्याचे कुटुंब रसातळाला जाते.
श्रीमंतांनी दारू पिण्यास हरकत नाही असे माझे म्हणणे अजिबात नाही. दारूने सर्वांचेच नुकसान होते. मात्र शिक्षण, नोकरी, पैसा यामुळे त्यांच्यावर गरीबांइतके संकट कोसळत नाही. माझ्या अगदी जवळचे नातेवाईक यांचा सोन्यासारखा संसार दारूमुळे उध्वस्त होऊन त्यांना आपला जीव गमवावा लागला हे उदाहरण माझ्या डोळ्यापुढे आहे. त्याचप्रमाणे प्रतिष्ठेपायी वा बिझिनेसच्यानावाखाली सुरू केलेल्या दारूपार्ट्यांपासून वेळीच सावध होऊन पासून सुटका करून आपला संसार व व्यवसाय सावरल्याचीही उदाहरणे माझ्या माहितीत आहेत.
मात्र गरीब दारूच्या आहारी गेल्यावर परत सुधारला याचे उदाहरण मात्र दुर्दैवाने अजून माझ्या पाहण्यात आलेले नाही. यासाठी गरीब माणसाने तरी दारूपासून कटाक्षाने दूर राहिले पाहिजे. कोणी नातेवाईक वा मित्र दारूच्या आहारी गेला असेल तर त्याला वाळीत न टाकता सुधारण्याचा प्रयत्न केला पाहिजे.समाजात स्थैर्य व सुबत्ता यायची असेल तर दारूला दूर लोटले पाहिजे.
Hits: 157