धान्यापासून दारु
काही वर्षांपूर्वी कोल्हापूरमधील शिवाजी विद्यापिठात एम. टेक. पर्यावरण शास्त्राच्या विद्यार्थ्यांच्या औद्योगिक प्रशिक्षणाची परीक्षा घेण्यासाठी गेलो होतो. अनेक उद्योगधंद्यांतून बाहेर पडणार्या सांडपाण्याचे कसे शुद्धीकरण केले जाते याविषयी विद्यार्थ्यांनी आपले अनुभव सांगितले. प्रदूषण नियंत्रणाचे वास्तव किती विदारक आहे याची विद्यार्थ्यांना कल्पना आली हे पाहून मला समाधान वाटले.
त्यातल्या एका विद्यार्थ्याने धान्यापासून अल्कोहोल( दारू) बनविणार्या डिस्टीलरीच्या सांडपाण्यावरील प्रक्रियेविषयी माहिती सांगितली. धान्यापासून दारू बनविणार्या कारखान्यांना खास सवलत, गोडाऊनमध्ये लाखो टन धान्य कुजत आहे इत्यादी बातम्या ऎकल्या असल्याने माझे कुतुहल जागृत झाले. मी त्या विद्यार्थ्याला वापरल्या जाणार्या धान्याविषयी माहिती विचारली.
मका, तांदूळ व ज्वारी या धान्यांचा उपयोग दारु निर्मितीसाठी केला जातो. रोज असे १२७ टन धान्य वापरले जाते व वर्षातून ३०० दिवस ही डिस्टीलरी चालते हे मला कळल्यावर दरवर्षी एकूण ३८,१०० टन धान्य केवळ एका डिस्टिलरी उद्योगातून दारूत परिवर्तित होते हे लक्षात आले. शेतकर्याला प्रति किलो १५ रुपये मिळतात व धान्यबाजारापेक्षा जास्त भाव मिळाल्याने शेतकरी असे धान्य डिस्टिलरीस देतात असे सांगण्यात आले. माझा या गोष्टीवर विश्वास बसेना. साखर निर्मितीसाठी शेतकरी आपला ऊस देतो. त्याच्या सांडपाण्यापासून दारू के्ली जाते व त्यामुळे शेतकर्यांच्या उसाला जास्त भाव मिळतो हे मला माहीत होते. पण कोणीही शेतकरी वर्षभर घाम गाळून पिकविलेले सोन्यासारखे धान्य दारू निर्मितीसाठी द्यायला तयार होईल हे कसे शक्य आहे असा भाबडा प्रश्न माझ्या मनात आला.पण वस्तुस्थिती माझ्या कल्पनेविरुद्ध होती. आर्थिक फायदा हा एकमेव उद्देश सर्व नीतीतत्वांना पायदळी तुडवितो.हे मला जाणवले.
सामान्य नागरिकाला बाजारात कितीतरी जास्त दराने धान्य खरेदी करावे लागते. १५ रुपये दराने बाजारात धान्य मिळत नाही. मग व्यापार्यांच्यामुळे शेतकर्याला कमी पैसे मिळतात का ? का सर्व धान्य गोडावूनमध्ये खास कुजवून या कारखान्याला दिले जाते. का स्वस्त धान्य दुकानातून धान्य विकत घेण्याची ऎपत नसल्याने धान्य शिल्लक राहते व ते या कारखान्यांना पुरविले जाते. मला काहीच उलगडा होईना. मी त्या विद्यार्थ्याला गमतीने विचारले ’काय रे ? तू हा कारखाना का निवडलास ? तुझी तेथे शेती आहे का दारू विकण्याचा धंदा आहे?’ त्याच्या दृष्टीने तो फक्त सांडपाणी प्रदूषणाचा प्रश्न होता. माझ्या दृष्टीने त्याच्यामुळे होणार्या सर्वदूर प्रदूषणाचा प्रश्न होता.
कोरडवाहू शेतकर्यांची गरिबी दूर करण्याच्या उद्दात्त हेतूने हा डिस्टीलरी प्रकल्प सुरू करण्यात आला असे प्रवर्तक सांगत असतील. शासनही अशा दारिद्र्य निर्मूलनास मदत करणार्या प्रकल्पास सहानुभूतीने आर्थिक सवलती देत असेल. त्या प्रकल्पापासून भोवतालच्या परिसराचा कसा विकास झाला याचे रम्य चित्रण केले जात असेल. कदाचित महाविद्यालयात अभ्यासण्यात येणारा हा विषय शालेय स्तरावर आल्यावर धान्य बाजारात विकण्याऎवजी धान्यापासून दारू केल्यास किती जास्त फायदा होईल अशी गणिते अभ्यासक्रमात येतील. पण या प्रकल्पाद्वारे किती गरिबाच्या तोंडचा घास काढून त्यांना त्याऎवजी दारूचा ग्लास दिला जाईल व याचा समाजाच्या आर्थिक स्थितीवर व आरोग्यावर काय परिणाम होईल ही गणिते गुलदस्त्यात ठेवली जातील. कदाचित ती प्रत्यक्ष अनुभवण्यास मिळावीत असे शासनाला वाटत असेल.
आपल्याला रस्त्यात अनेक भिकारी भेटतात त्यांच्या हातात वाडगा असतो. कोणी कनवाळू गृहस्थ त्यात १ - २ रुपये टाकतो. त्यांना पोटाची खळगी भरण्यासाठी अन्न हवे असते. ब्रेडच्या तुकड्यासाठी देखील १-२ रुपये पुरत नाहीत.जे भीक मागत नाहीत व अर्धपोटी राहतात त्यांचे काय? पूर्वी धान्याची भीक अवश्य घातली जायची ॥ओम भवती भिक्षान् देही ॥ असे म्हणून साधुसंतांनीही अशा कृतीला धार्मिक पुण्याचे स्थान दिले होते. आता अशी भिक्षा मिळणे खेडेगावातही दुरापास्त झाले आहे. धान्याची वाट दारूकडे वळली तर समाजस्वास्थ्याचीही वाट लागल्याशिवाय राहणार नाही.
ही स्थिती फार दूर नाही. गल्लोगल्ली स्वस्त धान्य दुकानांऎवजी स्वस्त दारू दुकाने दिसू लागली आहेत. कोपर्याकोपर्यावर बेरोजगार तरुणांची टोळकी कोणत्यातरी पक्षाच्या आशीर्वादाने या दारूवर पोसली जात आहे. गुंडगिरी, दहशत या मार्गाने लोकशाहीतील सत्तास्थाने मिळविण्याचा सर्रास प्रयत्न होत आहे. खाजगि सावकारी तेजीत आहे. मटका, जुगार व लॉटरी यांना राजाश्रय लाभला आहे. या धंद्यातील यशस्वी उद्योजक व राजकीय नेते आपली साम्राज्ये उभारीत आहेत. सुजाण सामान्य माणूस मात्र या सर्व बदलांकडे हताश होऊन पहात आहे. त्यात बदल करण्याची शक्ती वा इच्छाच त्याच्यात उरलेली नाही.
डॉ. सु. वि. रानडे, ज्ञानदीप, सांगली
Hits: 162