भक्तांच्या कल्याणा ... विज्ञानकथा
ब्रह्ममाया महाराजांची कीर्ती दिवसेंदिवस वाढत होती. त्यांचे चरित्र, त्यांनी आपल्या भक्तांच्या उद्धारासाठी केलेले कार्य व भक्तांना आलेले त्यांच्या अद्भुत शक्तीचे अनुभव यांची पुस्तके प्रचंड संख्येने विकली जात होती. भक्तांच्या सोयीसाठी महाराजांनी एक सार्वजनिक न्यास स्थापन केला होता व त्याद्वारे ग्रंथ प्रकाशन व देश विदेशातील धार्मिक स्थळांवर त्यांच्या विक्रीची व्यवस्था केली होती. ही पुस्तके म्हणजे भक्तांसाठी जीवन ज्ञानाचा एक अमूल्य ठेवा होता. महाराजांचे विविध आकारातील फोटो भाविक मोठ्या श्रद्धेने विकत घेत व देवघरात त्याची प्रतिष्ठापना करून त्यांच्या पवित्र ग्रंथांचे नियमित पारायण करीत. हे केल्यानंतर त्यांच्या जीवनातील सर्व क्लेशदायक गोष्टी नाहिशा होत असल्याचे दिव्य अनुभव भक्तांना येत होते. शारिरिक दुखणे असो, नातेसंबंधातील ताणतणाव, निराशा अपयश यांचे निरसन होऊन जीवनाकडे पाहण्याची त्यांची दृष्टी बदलत होती.
हे कसे होते याचे त्यांना आश्चर्यजनक कुतुहल असले तरी त्यामागचा कार्यकारणभाव फक्त महाराजांनाच ठाऊक होता. भक्ताकडील प्रत्येक त्यांच्या प्रत्येक फोटॊत महाराजांच्या सूक्ष्म देहाचा अधिवास होता. भक्त ज्यावेळी फोटोची पूजा करीत असे त्यावेळी त्याच्या मनाचा ताबा महाराज आपल्याकडे घेत असत व त्याद्वारे भक्ताच्या मनातील सर्व काळजीचे निराकरण करण्यासाठी योग्य त्या वैश्विक किरणांचा वापर करीत. कुटुंबातील अनेक संकटे ही पूर्व जन्माची फळे आहेत व ती अमलात आणण्यासाठी नेमलेल्या अनेक अतृप्त आत्म्यांचीच ही कारस्थाने आहेत हे माहीत असल्याने त्यांच्याशी संघर्ष करून भक्ताला सर्व व्याधीतून मुक्त करणे हे आपले कर्तव्य आहे अशी महाराजांची भावना होती.
कँन्सर, पोलिओ, व्यसनाधीनता, मानसिक आजार अशा अनेक रोगांवर प्रभावी उपायासाठी भक्तांना ते विविध मंत्रांचा जप करावयास सांगत. आणि त्याचा भक्तांना खूप फायदा होत असे याचे कारण म्हणजे विशिष्ठ शब्द उच्चारताना होणार्या ध्वनीलहरींचे त्यात योगदान आहे हे महाराजांनाच फक्त माहीत होते.
या अदृष्य शक्तीही महाराजांच्य़ा फोटोवर हल्ला चढवीत. सूक्ष जंतू वा बुरशीचे रूप घेऊन महाराजांची फोटॊतील प्रतिमा डागाळत. महाराजांची कार्यशक्तीही त्यामुळे क्षीण होत असे. आपल्या पीदा दूर होत असतानाच महाराजांच्या फोटोत होणारे बदल भक्तांना अचंबित करत. कधी फोटोतील डोळ्यात पाणी आल्याचा त्यांना भास होई. कधी फोटोतील महाराजांचा एरवी तेजःपुंज असणारा चेहर म्लान दिसे वा काळवंडे. काहीकाही ठिकाणी तर फोटोतील महाराजांचे शरीरच क्षतिग्रस्त होई.
महाराजांकडे हे फोटॊ पाठवून ते आपल्या शंका त्यांना विचारत. महाराज म्हणत ‘ अरे तुमचे दुःख दारिद्र्य दूर करायचे म्हणजे मला तुमच्या घरातील अदृष्य दुष्ट शक्तींशी सामना करावा लागतो. त्यात माझ्याही प्रतिमेची थोडीफार हानी होते.’ महाराज क्षतिग्रस्त फोटो घेऊन लगेच त्याला आपला नवा फोटो भक्ताला विनामूल्य देत. महाराजांनी एका मोठ्या दालनात असे सर्व फोटो संग्रहीत करून भक्तांसाठी मार्गदर्शक केंद्र आपल्या प्रासादरुपी मठात केले होते.
आपल्या अलौकीक ज्ञानाचा व अध्यात्म विद्येचा सार्या जगात प्रसार व्हावा या उदात्त हेतूने महाराजांनी अनेक ठिकाणी भक्तांच्या देणगीतून मोठे भक्तनिवास बांधले होते. अनेक समाजोपयोगी कार्ये या केंद्रांतर्फे केली जात. अनेक आपला वृद्धापकाळ अशा केंद्रात निःशुल्क सेवा करीत घालवत.
अंधश्रद्धा निर्मूलन संस्थेच्या लोकांना हे सारे थोतांड वाटे. महाराजांच्या चमत्काराविषयी ते काहीबाही बोलत. भक्तांना आव्हान देत व महाराजांचे अध्यात्मिक सामर्थ्य व कार्य याला विरोध करीत. त्यातील एक व्यक्ती महाराजांना भेटावयास आली. महाराजांनी त्याचे स्वागत केले व आपल्या भक्तांच्या अनुभवावरील आधारलेले प्रदर्शन दाखविण्याची आपल्या शिष्यास आज्ञा केली. शिष्याने ते प्रदर्शन तर दाखविलेच पण महाराजांच्या स्नानग्रहात भिंतीवर उठलेले चरेही दाखविले. तो म्हणाला महाराजांवर अदृष्य शक्तीचा कोठेही हल्ला होतो. त्याचा शस्त्राने प्रतिकार करताना भिंतीवर हे ओरखडे पडले आहेत. हे पाहूनही त्या अश्रद्ध व्यक्तीचे समाधान झाले नाही त्याने महाराजांच्या खोलीत जाऊन त्यांची भेट घेतली. महाराजांच्या खोलीत भीतीवर अनेक ठिकाणी भेगा पडल्या होत्या व तेथे पेन्सिलने काही तरी लिहिले होते. महाराज म्हणाले या खुणा म्हणजे पिशाच्च्यांनी माझ्यावर केलेल्या हल्ल्याचे प्रतीक आहेत. दिवसरात्र मला या दुष्ट शक्तींशी लढावे लागते तेव्हाच भक्तांना सुखशांतीचा लाभ होतो. महाराजांना त्या आगंतुक व्यक्तीने विचारले ‘ आपले व माझे वय जवळजवळ सारखेच आहे. मात्र आतापर्यंत मला कधीच कोणी पिशाच्च भेटले नाही हे कसे?’ महाराज हसले व म्हणाले ‘ मी भक्तांच्या संरक्षणासाठी झटतो आहे त्यामुळेच अध्यात्मिक शक्तीविरोधी दुष्ट शक्ति माझ्या्वर हल्ले करीत आहेत. तुम्ही कधी अध्यात्मिक शक्तीच्या संवर्धनासाठी काही केले नाही. तुमच्या वाट्याला त्या शक्ती कशाला जातील?.’ यावर तो गृहस्थ निरुत्तरच झाला.
महाराज अशा अज्ञ लोकांकडे दुर्लक्ष करीत व भक्तांच्या विश्वासाला तडा जाऊ नये म्हणून आपली अध्यात्म शक्ती खर्च करून माफक प्रमाणात चमत्कारही करीत. जरी विश्वरचना व त्याचे कार्य यांची माहिती फक्त त्या उंचीवर गेलेल्या श्रद्धाळू व्यक्तीसच होऊ शकते हे महाराजांना ठाऊक असले तरी काही वेळा त्यातील गुपिते आपल्या भक्तांना सांगण्याचा मोह त्यांना होत असे.
त्यांच्या एका प्रतिष्ठीत व सुशिक्षित भक्ताने नुकताच याबाबतीतील आपला प्रत्यक्ष अनुभव मला सांगितला.
‘‘महाराज एकदा असेच त्या भक्ताच्या गावी प्रवचनासाठी गेले असता आकाशात ढगांची गर्दी झाली. सभास्थानी पाऊस पडला तर काय होईल या कल्पनेने महाराजांचे स्थानिक भक्तगण घाबरून गेले. विश्रामगृहात आलेल्या भक्त गणांच्या चेहर्यावरील काळजीचा भाव महाराजांनी ओळखला. ते म्हणाले ‘कसला आवाज येत आहे.’ भक्त म्हणाले ‘महाराज ढगांचा गडगडाट चालू आहे.’ महाराज हसले ते म्हणाले ‘अरे तो गडगडाट नाही. मेघराज मला विचारत आहे की इंद्राच्या आज्ञेप्रमाणे मला येथे भरपूर पाऊस पाडायची आज्ञा आहे. आपले तर आज येथे प्रवचन आहे आता काय करायचे ? मी त्याला सांगितले अरे तुला सांगितलेले काम तू कर मी काय ते बघतो.’ महाराजांचा कार्यक्रम सुरू झाला. आणि जोरात पावसास सुरुवात झाली पण आश्चर्य म्हणजे महाराजांच्या प्रवचनाच्या जागी मात्र पावसाचा ठिपूसही पडला नाही.’’
एक ना दोन अशा अनेक विलक्षण गोष्टी आपल्याला त्यांच्या भक्तांच्याकडून ऎकायला मिळतात.
महाराजांनी आता आपल्या दिव्य ज्ञानाच्या प्रसारासाठी आधुनिक संपर्क माध्यमांचा उपयोग करण्यास सुरुवात केली आहे. साप्ताहिक, दूरदर्शन, वेबसाईट, फेसबुक, ट्वीटर आणि व्हाट्स अप च्या माध्यमातून ते जगभरातील थकल्या भाकल्यांचे, दुःखी कष्टी, निराशाग्रस्त व गरीबीने गांजलेल्याची ते सेवा करीत असून त्यांचे श्रद्धास्थान बनले आहेत.
त्यांचे हे अजरामर कार्य जनतेसमोर आणल्याबद्दल महाराजांची माझ्यावरही कृपादृष्टी वळेल असा मला विश्वास वाटतो.
--- डॉ. सु. वि. रानडे