देशमुख, चिंतामण द्वारकानाथ

Parent Category: मराठी उद्योग Category: स्वदेशी उद्योग प्रेरक Written by सौ. शुभांगी रानडे

देशमुख, चिंतामण द्वारकानाथ : (१४ जानेवरी १८९६ – ). भारताचे माजी अर्थमंत्री, श्रेष्ठ अर्थनीतिज्ञ व प्रथम श्रेणीचे प्रशासक. जन्म कुलाबा जिल्ह्यातील नाते या गावी कायस्थ प्रभू घराण्यात. त्यांचे वडील वकील होते. प्राथमिक शिक्षण नाते या गावी. वयाच्या अकराव्या वर्षी पहिले बक्षीस आणि पहिली शिष्यवृत्ती मिळविली तेव्हापासून चिंतामणरावांनी कधीही पहिला क्रमांक सोडला नाही. मुंबई येथे ‘आर्यन एज्युकेशन सोसायटी’ च्या माध्यमिक शाळेतून ते मॅट्रिकच्या परीक्षेमध्ये प्रथम श्रेणीत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले (१९१२). त्या वर्षापासून ठेवण्यात आलेली जगन्नाथ शंकरशेट शिष्यवृत्ती मिळविण्याचा पहिला मान त्यांना लाभला. एल्फिन्स्टन महाविद्यालयातून इंटरची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर ते इंग्लंडला गेले व केंब्रिजच्या ‘जीझस महाविद्यालया’ तून बी. ए झाले.

देशमुखांचा आत्मविश्वास जबर होता. भौतिकीच्या प्राध्यापकांच्या एका प्रतिकूल शेऱ्यामुळे देशमुखांनी तो विषय सोडून त्याऐवजी वनस्पतिविज्ञान हा विषय घेतला व या विषयातील विद्यापीठाचे बक्षीस मिळविले. त्यांच्याबरोबर बिरबल सहानी, रामानुजन, जी. सी. चतर्जी, मुकंदीलाल, जॉन मथाई यांसारखे पुढे प्रसिद्धिस आलेले सहाध्यायी होते. आय्. सी. एस्. परीक्षेत ते पहिले आले. पुढील काळात या परीक्षेत कोणीही भारतीय त्यांच्याइतके गुण मिळवू शकला नाही.

इंग्लंडमध्ये असतानाच रोझिना सिल्कॉक्स ह्या आंग्ल युवतीशी देशमुखांचा पहिला विवाह झाला (१९२०). त्यांना प्रिमरोझ नावाची एक कन्या असून ती इंग्लंडमध्येच स्थायिक झाली. त्यांची प्रथम पत्नी १९४९ साली मरण पावली. देशमुखांचा दुसरा विवाह १९५३ मध्ये सुप्रसिद्ध समाजसेविका व सर्वोच्च न्यायालयाच्या अधिवक्त्या डॉ. दुर्गाबाई यांच्याशी झाला. श्रीमती दुर्गाबाई (१५ जुलै १९०९– ) यांनी स्वातंत्र्य-आंदोलनात भाग घेतला होता. त्या आंध्र विद्यापीठाच्या एम्. ए. असून मद्रास विद्यापीठच्या कायद्याच्याही पदवीधर आहेत (१९४२). काही वर्षे त्यांनी मद्रास हायकोर्टात वकिलीही केली (१९४२–५२). १९४६ मध्ये त्या संविधान सभेत निवडून आल्या व सभेच्या अनेक महत्त्वाच्या समित्यांवर त्यांनी काम केले. भारतातील स्त्रीकल्याणविषयक सेवाकार्यात त्यांनी विशेष कामगिरी केली. मद्रासच्या ‘आंध्र विमेन्स असोसिएशन’ तसेच ‘आंध्र महिला सभा’ या संस्थांच्या त्या संस्थापिका-सदस्या आहेत, ‘अखिल भारतीय परिचारिका परिषद’ व ‘रेडक्रॉस सोसायटी’ यांच्या त्या सदस्या आहेत. ‘केंद्रीय समाज कल्याण मंडळा’ च्या अध्यक्षा (१९५३–६२), मुली व स्त्रिया यांच्या शिक्षणासंबंधी नेमलेल्या ‘राष्ट्रीय समिती’ च्या अध्यक्षा (१९५८–६१), ‘भारतीय लोकसंख्या परिषदे’ च्या कार्यकारी अध्यक्षा (१९६१–७२), संयुक्त राष्ट्रांच्या ‘सामाजिक संरक्षण समिती’ च्या व यूनेस्कोच्या ‘आंतरराष्ट्रीय निरक्षरता निर्मूलन समिती’ च्या सदस्या (१९६९–७२), अशी महत्त्वाची व जबाबदारीची पदे त्यांनी सांभळली आहेत. सोशल वेल्फेअर इन इंडिया या भारत सरकारच्या प्रकाशनाच्या संपादक-मंडळाच्या दुर्गाबाई अध्यक्षा असून, भारतीय नियोजन आयोगाद्वारा प्रकाशित झालेल्या एन्सायक्लोपीडिया ऑफ सोशल वर्क इन इंडिया ह्या विश्वकोशाच्या संकलनकार्याची धुरा त्यांनी सांभाळली, तेलुगू व इंग्रजी या दोन्ही भाषांतील एक अत्यंत प्रभावी वक्त्त्या म्हणून दुर्गाबाई प्रसिद्ध आहेत. त्यांना १९७५ मध्ये भारत सरकारने ‘पद्मविभूषण’ हा पुरस्कार देऊन गौरविले.

चिंतामणरावांनी पूर्वीच्या सेंट्रल प्रॉव्हिन्सेस व बेरार या प्रांतात उपआयुक्त, अवरसचिव, जमाबंदी अधिकारी (सेटलमेंट ऑफिसर) म्हणून कार्य केले (१९१९–३०) दुसऱ्या गोलमेज परिषदेस देशमुख एक सचिव म्हणून उपस्थित होते. त्या वेळी त्यांचा मालवीय, शास्त्री, सप्रू, जयकर, झाफरुल्लाखान, आंबेडकर, महात्मा गांधी इ. नेत्यांशी संबंध आला देशमुखांच्या कुशाग्र बुद्धिमत्तेने आणि उद्योगशीलतेने हे सर्व नेते प्रभावित झाले. १९३२-३९ या काळात ते सेंट्रल प्रॉव्हिन्सेस व बेरार या प्रांतिक सरकारात महसूल व वित्त खात्याचे सचिव होते याच काळात त्यांनी शिक्षण खात्याचे संयुक्त सचिव, वित्त खात्याचे आरोग्य व जमीनविषयक विशेष कार्याधिकारी, शत्रुराष्ट्राच्या मालमत्तेचे अभिरक्षक (एप्रिल–ऑक्टोबर १९३९) अशा विविध नात्यांनी कार्य केले. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मध्यवर्ती मंडळाचे सचिव १९३९–४१, उपअधिशासक (डेप्यूटी गव्हर्नर) १९४१–४३ व पुढे पहिले भारतीय अधिशासक (गव्हर्नर) १९४३–४९ जागतिक मुद्रा परिषदेस भारतीय प्रतिनिधी १९४४ आंतरराष्ट्रीय चलन निधी आणि जागतिक बँक यावर भारताचे अधिशासक १९४६–४९ भारतीय सांख्यिकीय संस्थेचे अध्यक्ष १९४५–६४ यूरोप व अमेरिका यांमधील भारत सरकारचे वित्तप्रतिनिधी १९४९–५० नियोजन आयोगाचे सभासद (१९५०–५६) आंतरराष्ट्रीय चलन निधी व जागतिक बँक यांचे अध्यक्ष १९५० अशा विविध प्रकारच्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या. १९५०–५६ या काळात चिंतामणराव भारत सरकारचे अर्थमंत्री होते. या पदावर असताना देशमुखांनी केलेली मोठी कार्ये म्हणजे ‘इंपीरियल बँके’ चे राष्ट्रीयीकरण ‘राष्ट्रीय विकास परिषदे’ ची (नॅशनल डेव्हलपमेंट कौन्सिल) स्थापना आणि आयुर्विमा उद्योगाचे राष्ट्रीयीकरण ही होत. आयुर्विमा उद्योगाचे राष्ट्रीयीकरण ही देशमुखांची सर्वांत म्हत्त्वपूर्ण कामगिरी मानली जाते. १९५६ मध्ये संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या समर्थनार्थ देशमुखांनी मंत्रिपदाचा सर्वप्रथम राजीनामा दिला. पुढे ‘विद्यापीठ अनुदान अयोगा’ चे अध्यक्ष (१९५६–६१) तसेच ‘राष्ट्रीय ग्रंथ संस्थे’ चे (नॅशनल बुक ट्रस्ट) अध्यक्ष (१९५७–६०) म्हणून त्यांनी कार्य केले. १९५२ मध्ये त्यांना केंब्रिजच्या जीझस महाविद्यालयाचे सन्माननीय अधिछात्र म्हणून गौरविण्यात आले. हैदराबाद येथील भारत सरकारच्या प्रशासकीय महाविद्यालयाचे ते अध्यक्ष (१९६०–६३) होते. यांशिवाय नवी दिल्ली येथील ‘इंडिया इंटरनॅशनल सेंटर’ चे अध्यक्ष (१९५९– ) दिल्ली विद्यापीठाचे कुलगुरू (१९६२–६७) संयुक्त राष्ट्रांच्या प्रशिक्षण व संशोधन संस्थेच्या विश्वस्त मंडळाचे सदस्य (१९६५–७०) व नंतर उपाध्यक्ष (१९६६–७०) भारत सरकारच्या ‘केंद्रीय संस्कृत मंडळा’ चे अध्यक्ष (१९६७–६८) त्याचप्रमाणे ‘भारतीय आर्थिक विकास संस्था’ (१९६५– ) सामाजिक विकास परिषद’ (कौन्सिल फॉर सोशल डेव्हलमेंट) (१९६६– ) भारतीय लोकसंख्या परिषद (पॉप्युलेशन कौन्सिल ऑफ इंडिया) (१९७०– ) यांची अध्यक्षपदेही त्यांनी सांभाळली.

देशमुखांना १९५९ साली रेमन मॅगसायसाय पुरस्कार मिळाला. लेस्टर (इंग्लंड), प्रिन्स्टन (अमेरिका), म्हैसूर आणि उस्मानिया विद्यापीठांनी चिंतामणरावांना एल्एल्. डी. ही सन्मान्य पदवी देऊन, तर कलकत्ता विद्यापाठाने डी. एस्‌सी. या पदवीने आणि अन्नमलई, अलाहाबाद, नागपूर, पंजाब व पुणे विद्यापीठांनी डी. लिट्. ही पदवी देऊन त्यांचा गौरव केला आहे. १९७५ मध्ये त्यांना भारत सरकारने पद्मविभूषण हा पुरस्कार देऊन गौरविले. चिंतामणरावांना सामाजिक कार्याची आवड आहे व बागकाम हा त्यांचा आवडता छंद आहे. त्यांचे वास्तव्य हैदराबाद येथे असते. चिंतामणरावांनी कालिदासाच्या मेघदूताचा मराठीमध्ये श्लोकबद्ध अनुवाद केलेला आहे (१९४४). ह्याशिवाय मद्रास विद्यापीठात चिंतामणरावांनी दिलेली तीन व्याख्याने सिटिझन्स ऑफ नो मीन कन्ट्री ह्या शीर्षकाने, त्याचप्रमाणे विविध विद्यापीठांच्या दीक्षान्तसमारंभप्रसंगी चिंतामणरावांनी वेळोवेळी केलेली भाषणेही (१९५६–६१) इन द पोर्टल्स ऑफ इंडियन युनिव्हर्सिटी व ऑन द थ्रेशोल्ड ऑफ इंडियाज सिटिझनहुड या शीर्षकांनी ग्रंथबद्ध झाली आहेत. महात्मा गांधींची सु. शंभर वचने गांधी सूक्तिमुक्तावली या शीर्षकाने चिंतामणरावांनी संस्कृतमध्ये श्लोकबद्ध केली आहेत. द कोर्स ऑफ माय लाइफ (१९७४) ह्या शीर्षकाने चिंतामणरावांनी आत्मचरित्र लिहिले आहे.

गद्रे. वि. रा.

Hits: 151
X

Right Click

No right click