सार्वजनिक काका
सार्वजनिक काका (९ एप्रिल १८२८–२५ जुलै १८८०).:
महाराष्ट्रातील एकोणिसाव्या शतकातील एक निष्ठावान सामाजिक कार्यकर्ते. त्यांचे पूर्ण नाव गणेश वासुदेव जोशी पण सार्वजनिक काका या नावाने सुपरिचित. त्यांचा जन्म वासुदेव व सावित्रीबाई या दांपत्यापोटी सातारा येथे झाला. त्यांचे घराणे मूळचे कसबा संगमेश्वर, रत्नागिरीचे पण चरितार्थासाठी हे घराणे देशावर येऊन सातारला स्थायिक झाले. त्यांचे इंग्रजी सातवीपर्यंतचे शिक्षण सातारा येथे झाले.
सार्वजनिक काका नोकरीच्या निमित्ताने ते पुण्यात आले (१८४८) आणि न्यायालयात कारकून म्हणून रुजू झाले. अंतर्गत मतभेदांमुळे त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला (१८५६). नंतर त्यांनी वकिलीची परीक्षा दिली (१८६५) आणि पुण्यातच ते वकिली करू लागले. वकिलीच्या व्यवसायाबरोबरच त्यांनी सार्वजनिक कामात रस घेतला. अल्पावधीतच त्यांनी नावलौकिक मिळविला. क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांचे वकीलपत्र घेण्यास पुण्यातील कोणीही वकील पुढे येण्यास धजेना. अशा वेळी त्यांनी फडक्यांचे वकीलपत्र स्वीकारण्याचे धाडस दाखविले. ‘फडक्याला जसा फासावर चढवतील तसा मलाही चढवतील, यापेक्षा जास्त काही करणार नाहीत ना?’ असे निर्भय उद्गार त्यांनी यावेळी काढले होते.
सार्वजनिक काकांच्या समाजसेवेत सार्वजनिक सभेचा त्यांनी वाहिलेला कार्यभार व सभेचे स्थान महत्त्वाचे आहे. बॉम्बे असोसिएशनच्या धर्तीवर पुण्यात २ एप्रिल १८७० रोजी ‘सार्वजनिक सभे’ची स्थापना करण्यात आली. ही सनदशीर मार्गाने काम करणारी एक प्रमुख राजकीय संस्था होती. तिचे मुख्य सूत्रधार व पहिले चिटणीस गणेश जोशी होते आणि औंध संस्थानाधिपती श्रीनिवासराव पंतप्रतिनिधी अध्यक्ष होते. प्रथम या संस्थेचा उद्देश केवळ पर्वती संस्थानच्या कारभारातील गोंधळ सरकारदरबारी मांडणे, एवढाच मर्यादित होता पण लवकरच संस्थेला सामाजिक व राजकीय असे व्यापक स्वरूप प्राप्त झाले. पुढे न्यायमूर्ती म. गो. रानडे यांच्या सहभागामुळे राष्ट्रीय पातळीवर तिचे नाव झाले (१८७१). सभेचे राजकारण हे सनदशीर व इंग्रजांच्या मदतीनेच होणार होते. जोशी आणि रानडे यांनी मिळून आर्थिक, औद्योगिक आणि राजकीय स्वरुपांची अनेक कामे हातात घेतली आणि जनतेला जागृत व संघटित करण्याचे मौलिक काम केले. शिवाय जनतेची गाऱ्हाणी व अडचणी सरकारदरबारी मांडण्याचे प्रयत्न या संस्थेमार्फत सार्वजनिक काकांनी केले.
न्यायमूर्ती रानडे यांच्याशी सल्लामसलत करून सार्वजनिक काकांनी १८७२ मध्ये स्वदेशी चळवळीचा श्रीगणेशा केला. लो. टिळक, म. गांधी यांच्या कितीतरी वर्षे अगोदर त्यांनी स्वदेशीची चळवळ सुरू केली होती. १२ जानेवारी १८७२ रोजी त्यांनी खादी वापरण्याची शपथ घेतली व ती आयुष्यभर पाळली. खादीचा वापर व त्यासाठी जाणीवपूर्वक प्रचार व प्रसार करणारे सार्वजनिक काका हे पहिले द्रष्टे देशभक्त होत. एवढेच नव्हे तर खादीचा पोशाख करून ते १८७७ च्या दिल्ली दरबारात गेले. या दरबारात इंग्लंडची सम्राज्ञी व्हिक्टोरिया हिला ‘हिंदुस्थानची सम्राज्ञी’ हा किताब बहाल करण्यात येणार होता. त्यावेळी सार्वजनिक सभेने मानपत्र अर्पण करण्यासाठी सार्वजनिक काकांना प्रतिनिधी म्हणून पाठविले होते. या मानपत्रात सभेने हिंदी लोकांना ब्रिटिश राष्ट्राबरोबरीचा राजकीय व सामाजिक दर्जा द्यावा, तसेच स्वावलंबी बनविणारे शिक्षण व राजकीय हक्क द्यावेत, अशा मागण्या नोंदविल्या होत्या. याशिवाय ब्रिटिश पार्लमेंटमध्ये हिंदी जनतेचे प्रतिनिधी असावेत, अशीही मागणी एका स्वतंत्र अर्जाने केली होती. त्यांनी ‘देशी व्यापारोत्तेजक मंडळ’ या संस्थेची स्थापना करून शाई, साबण, मेणबत्त्या, छत्र्या इ. स्वदेशी वस्तूंचे उत्पादन करण्यास प्रोत्साहन दिले. त्यासाठी स्वतः आर्थिक झीज सोसली. त्या मालाच्या विक्रीसाठी सहकारी तत्त्वावर पुणे, सातारा, नागपूर, मुंबई, सुरत आदी ठिकाणी दुकाने काढण्यास लोकांना प्रोत्साहित केले. स्वदेशी वस्तूंची प्रदर्शने भरविली, व्याख्याने दिली. त्यांच्या या प्रयत्नांमुळे आग्रा येथे ‘कॉटन मिल्स’ सुरू करण्यात आली.
जातिभेदाच्या अनिष्ट प्रथेला त्यांचा विरोध होता. त्यांच्या पत्नी सरस्वतीबाई यांनी पुढाकार घेऊन १८७१ मध्ये पुण्यात ‘स्त्री विचारवती’ या नावाची एक सामाजिक संस्था स्थापन केली. या संस्थेद्वारे जातिभेद दूर करण्यासाठी हळदीकुंकू यासारखे उपक्रम आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमात सर्व जातिजमातींच्या स्त्रिया सामील होत असत.
सार्वजनिक सभेच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रातील बहुतेक सर्व जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीची पाहणी केली (१८७३). या पाहणीतून शेतकऱ्यांच्या दारिद्र्याची माहिती प्रकाशात आली. १८७६-७७ मध्ये महाराष्ट्रात फार मोठा दुष्काळ पडला असताना त्यांनी दुष्काळ फंड उभारून दुष्काळ समित्या नेमल्या. स्वस्त धान्याची दुकाने उघडली. सार्वजनिक सभेने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मोठे साहाय्य केले. तसेच सरकारने आपल्या ‘पब्लिक वर्क्स’ खात्यामार्फत दुष्काळग्रस्तांसाठी कामे सुरू करावीत म्हणून लढा दिला.
ब्रिटिशांच्या वेळखाऊ व खर्चिक न्यायालयांना पर्याय म्हणून त्यांनी स्वदेशी लवाद न्यायालयाची कल्पना मांडली आणि त्यांच्या प्रयत्नानेच पुणे येथे त्या सुमारास लवाद न्यायालयाची स्थापना झाली (१८७६).
सार्वजनिक काकांना लोकजागृतीच्या कार्यातील वृत्तपत्रांच्या सामर्थ्याची जाणीव होती. त्यामुळेच त्यांनी व्हाइसरॉय लॉर्ड लिटनच्या १८७८ मधील मुद्रणस्वातंत्र्यावर निर्बंध लादणाऱ्या कायद्याला कडाडून विरोध केला. या कृतीचा निषेध करण्यासाठी इंदुप्रकाश चे संपादक जनार्दन सुंदरजी कीर्तिकर यांच्या अध्यक्षतेखाली वृत्तपत्रकारांचे एक संमेलन २९ मार्च १८७८ रोजी मुंबई येथे भरविले. शिवाय कलकत्ता (कोलकाता) येथील त्याच वर्षीच्या अशाच प्रकारच्या अन्य संमेलनांस ते आवर्जून उपस्थित राहिले.
सार्वजनिक सभेच्या कार्याला त्यांनी स्थापनेपासून अखेरपर्यंत वाहून घेतले होते. त्यामुळे सार्वजनिक सभा म्हणजे गणेश वासुदेव असे समीकरण झाले होते. त्यांच्या या समर्पित जीवनामुळे त्यांना सार्वजनिक काका हे नामाभिधान प्राप्त झाले. या दगदगीच्या जीवनात त्यांना हृदयविकार जडला आणि त्यातच त्यांचे पुण्यात निधन झाले.
संदर्भ : १. के. सागर, महाराष्ट्रातील समाजसुधारक, पुणे, २०१०.
२. लिमये, पुष्पा, सार्वजनिक काका जोशी, पुणे, २०१०.
देशपांडे, सु. चिं.
Hits: 185