बदामी हलवा
साहित्य :- |
एक वाटी गव्हाचे सत्त्व, पाच वाट्या साखर, दोन वाट्या तूप, बदाम अगर काजू, केशर अगर कोणताही खाण्याचा रंग, लिंबू |
|
कृती : |
गहू तीन दिवस भिजत घालून ठेवून नंतर पाट्यावर वाटावे व तो गोळा पाण्यात कालवून पाणी गाळून घ्यावे. ते पाणी दोन-तीन तास तसेच ठेवावे. नंतर वरचे पाणी काढून टाकावे व जो साका खाली बसेल तेच गव्हाचे सत्त्व. एक वाटी गव्हाचे सत्त्व एक वाटी पाणी, पाच वाट्या साखर, चार चमचे लिंबाचा रस, अर्धी वाटी तूप व पाहिजे असल्यास केशर अगर आवडत असेल तो खाण्याचा रंग, असे सर्व साहित्य एकत्र करून शिजत ठेवावे. शिजत असताना ढवळीत राहावे. म्हणजे गाठी होणार नाहीत. शिजून घट्ट गोळा झाल्यावर राहिलेल्या दीड वाटी तुपापैकी एक एक चमचा तूप (ते तूप संपेपर्यंत) त्या गोळयावर वरचेवर घालून त्यामध्ये तो गोळा पूर्ण शिजवून घ्यावा. पूर्ण शिजल्यावर त्यात बदामाचे काप अथवा काजूच्या फाकी घालून तो गोळा पुन्हा थोडा शिजवावा. शिजून झाल्यावर तो गोळा एका थाळीत ओतावा व सारखा थापून त्यावर पुन्हा थोडे बदामाचे काप अथवा काजूचे काप अगर फाकी घालून हाताने पुन्हा सारखे करावे. हा हलवा पारदर्शक होतो व आत घातलेले बदाम अगर काजूचे कापही दिसतात. |