कार्तिक

Parent Category: मराठी संस्कृती Category: मराठी सण Written by सौ. शुभांगी रानडे
दीपावली
 

दिवाळी हा हिंदुंचा सर्वात मोठा सण आहे. हा सण घरोघरी दिव्यांच्या ओळी लावून साजरा करतात म्हणून त्यास दिपावली किंवा दिवाळी असे म्हणतात. हा सण पाच दिवस अतिशय आनंदाने साजरा केला जातो.

  • धन त्रयोदशी- आश्विन शुध्द त्रयोदशीस धनत्रयोदशी हे नाव दिले आहे. यमराजाने आपल्या दूतास या दिवशी जो दिपोत्सव साजरा करेल त्याला अपमृत्यु येणार नाही. असे सांगितल्याची कथा आहे. या दिवशी मंगलस्नान करून दक्षिणेकडेही तोंड करून दिवे लावतात.

  • नरकचतुर्दशी - या दिवशी कृष्णाने नरकासुर राक्षसाचा वध करून त्याच्या बंदिवासात असलेल्या सोळा हजार स्त्रियांना बंधमुक्त केले. नरकासुराचा वध करून कृष्ण सूर्योदयापूर्वीच परत आला त्यावेळी मंगलस्नान घालून त्याला ओवाळण्यात आले. याची स्मृती म्हणून या दिवशी सूर्योदयापूर्वी स्नान करून दिवे लावतात व आनंदोत्सव साजरा करतात.

  • लक्ष्मीपूजन - हा अतिशय महत्वाचा दिवस आहे. या दिवशी सायंकाळी अष्टदल, कमळावर लक्ष्मीची स्थापना करून तिची पूजा करतात. लक्ष्मी हे सौंदर्याचे, प्रेमाचे व वैभवाचे प्रतिक आहे. संयमपूर्वक धनसंपादन केले तर मनुष्याचे कल्याण होईल लक्ष्मी या दिवशी सर्वत्र संचार करीत असते. जेथे स्वच्छता, मांगल्या व प्रकाश आढळेल तेथे ती निवास करते या रात्री दिव्यांची रोषणाई करतात.

  • बलिप्रतिपदा- पौराणिक काळात बळी नावाच्या दानशूर राजाने पूर्ण जग जिंकले होते त्याचा पराभव करण्याकरता भगवान `विष्णुंनी' वामन रूप धारण करून त्याला पाताळलोकात लोटले मात्र त्याच्या दानशूरपणावर खूष होऊन या पुढे कार्तिक प्रतिपदा बली प्रतिपदा म्हणून ओळखल्या जाईल असा वर दिला. हा दिवस साडेतीन मुहुर्तापैकी अर्धा मानला जातो.

    विक्रम संवत शकाच्या वर्षारंभ याच दिवशी येतो म्हणून शक मानणारा (गुजराती) व्यापारी वर्ग त्या दिवशी धंद्याच्या हिशोबाचा किर्दखतावणीच्या नवीन वह्यांचे पूजन करून प्रारंभ करतात. या दिवशी पत्नीने पतीला व मुलीने वडीलांना ओवाळण्याची पध्दत आहे.

  • भाऊबीज - कार्तिक शुध्द व्दितीयेला भाऊबीज म्हणतात. या दिवशी यम आपल्या बहिणीकडे बरेच दिवसांनी गेला तेंव्हा तिने त्याला ओवाळले व आनंद व्यक्त केला तेंव्हापासून बहिणीने भावाला ओवाळण्याची चाल रूढ झाली आहे. या दिवसाला यम व्दितीयाही म्हणतात. स्त्रिया चंद्राला भाऊ मानून ओवाळतात.

त्रिपुरी पौर्णिमा
त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाने खडतर तप करून ब्रह्मदेवाकडून शत्रुंपासून भय राहणार नाही असा वर मागून घेतला या वरामुळे उन्मत्त होऊन तो सर्व लोकांना व देवांना सुध्दा खून त्रास द्यायला लागला. त्रिपुरासूराची तीन नगरे असून त्याला अभेद्य तट होता.

त्यामुळे देवांनाही त्याचा पराभव करता येईना. देवांनी भगवान शंकराची अखेर प्रार्थना केली. तेव्हा शंकरांनी त्याची तिन्ही नगरे जाळून त्याला ठार केले. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी ही घटना घडल्यामुळे तिला त्रिपुरी पौर्णिमा म्हटल्या जाऊ लागले. या दिवशी घरात, घराबाहेर व देवळातही दिव्याची आरास करून व नदीत दीपदान करून लोक आनंदोत्सव साजरा करतात.

तुलसी विवाह
तुळस ही भारताच्या सर्व प्रांतात व सर्व भागात उगवणारी वनस्पती आहे. प्रत्येक हिंदू कुटुंबाच्या घरासमोर तुळशी वृंदावन असते. विष्णूचा तुळशीशी विवाह लावण्याचा पूजोत्सव कार्तिक व्दादशीपासून पौणिमेपर्यंत एखाद्या दिवशी संध्याकाळी करतात पण मुख्यत: व्दादशीला करतात. कांचीनगरीत कनक नावाचा राजा होता. त्याला नवसाने एक मुलगी झाली तिचे नांव किशोरी होते. तिची पत्रिका पाहून ज्योतिषाने सांगितले जो तिच्याशी विवाह करेल त्याच्या अंगावर विज पडून तो मरेल. एका ब्राह्मणाने किशोरीला व्दादशाक्षरी विष्णू मंत्र सांगितला त्या मंत्राचा जप करावा, तुळशीची पूजा व कार्तिक शुध्द नवमीला विष्णूशी विवाह लावावा असे व्रत त्यांनी सांगितले व ती त्याप्रमाणे करू लागली.

एकदा एक गंध्यानं तिला पाहिले व तो तिच्यावर मोहित झाला माळिणीच्या मदतीने त्याने स्त्री वेष घेऊन त्या माळिणी बरोबर तो किशोरीकडे आला. ती माळिण म्हणाली, ही माझी मुलगी आहे. फुलांची रचना करण्यात तरबेज आहे. तुला देवासाठी फुलांच्या नाना प्रकारच्या रचना करून देत जाईल. गंधा किशोरीकडे दासी म्हणून राहू लागला. कांची राजाचा पुत्र मुकुंद हा ही किशोरीवर मोहित झाला. तो सूूर्याची खूप उपासना करायचा. सूर्याने स्वप्नात दृष्टांत देऊन त्याला सांगितलं की, तू किशोरीचा नाद सोडून दे तिच्याशी विवाह करणारा विज पडून मरेल. मुकुंद सूर्याला म्हणाला, तुझ्या सारख्या देवाला तिचं वैधव्य टाळता येईल. किशोरी मला लाभली नाही तर मी अन्न् पाणी वर्ज्य करून मरून जाईन. सूर्याने किशोरीच्या वडीलांना दृष्टांत देऊन सांगितले की राजपुत्र मुकुंदाला तू आपली मुलगी दे. कनक राजला हा विवाह मान्य करणं भाग पडलं. कार्तिक व्दादशी ही लग्नाची तिथी ठरली. गंध्याला हे सर्व कळलं. तो खूप दु:खी झाला, व त्याने ठरवलं की, लग्न मंडपात जाण्याआधी तिचा हात धरायचा त्याच वेळी मेघगर्जनांसह विजा कडकडल्या किशोरीही भांबावून गेली व ती बाहेर आली व गंध्याने तिचा हात धरला व त्याच क्षणी गंध्याच्या डोक्यावर विज कोसळली व तो मरण पावला. नंतर राजपुत्र मुकुंद याच्याशी तिचा विवाह झाला. तुळशी व्रताच्या प्रभावाने किशोरीचे वैधव्य टळलं.

Hits: 580
X

Right Click

No right click