नृसिंहवाडी

Parent Category: महाराष्ट्र दर्शन Category: मंदिरे
Written by सौ. शुभांगी रानडे
     

कोल्हापूर जिल्ह्यातील नृसिंहवाडी हे एक प्रसिध्द तीर्थक्षेत्र आहे. नृसिंहवाडी म्हणजे दत्तसंप्रदायची राजधानीच. कोल्हापूरपासून सुमारे ४५ कि. मी. अंतरावर कृष्णा आणि पंचगंगेच्या पावन संगमावर हे क्षेत्र वसलेले आहे.

श्री दत्तगुरूंच्या अवतारामुळे नृसिंहवाडीचा परिसर पावन झाला असून, त्यांच्या स्वयंभू पादुकांची पूजा अर्चा येथे अखंड सुरू असते. श्री दत्तगुरूंचे साक्षात तिसरे अवतार मानले गेलेले श्री नृसिंह सरस्वती यांनी औदुंबर वृक्षांनी बहरलेल्या या अरण्यभूमीत १२ वर्षे वास्तव्य केले व त्यांनीच हा परिसर सुफल करून सोडला.

नृसिंहवाडीचे क्षेत्र कृष्णा व पंचगंगा या दोन नद्यांच्या मधोमध सुमारे एक चौरस मैल परिसरात पसरले आहे. गावची लोकसंख्या सुमारे चार हजारापर्यंत आहे. कृष्णेच्या प्रशस्त अशा घाटावर मध्यभागी औदुंबर वृक्षाखाली सुंदर व मनोरम असे मंदिर आहे. मंदिरातच स्वामींनी स्थापन केलेल्या दत्तपादुका आहेत. वाडीहून गाणगापूरला जाताना योगिनींच्या आग्रहावरून स्वामींनी वालुकामय पाषाणाच्या या पादुकांची स्थापना केली. त्यावरील सततच्या अभिषेकाने त्या झिजत नाहीत. म्हणून त्याची घडण चंद्रकांत पाषाणाची असावी असे म्हणतात.

सांप्रत उभे असलेले मंदिर विजापूरला अदिलशहा या मुसलमान बादशहाने बांधले आहे. विजापूरच्या बादशहाच्या मुलीचे डोळे गेल्यामुळे तिला अंधत्व आले. तेव्हा बिदरच्या बादशहाच्या सांगण्यावरून बादशहा नृसिंहवाडीस आला. त्याने श्री गुरूंचे दर्शन घेतले व नवस बोलला. पुजाऱ्याने अंगारा दिला तो त्याने मुलीच्या डोळयाला लावला असता, तिला दृष्टी प्राप्त झाली. त्यामुळे बादशहा आनंदित झाला. त्याने कृष्णेच्या पैलतीरावरील औरवाड व गौरवाड ही दोन गावे देवस्थानच्या पूजेअर्चेसाठी इनाम दिल्याची नोंद आढळते. सध्या उभे असलेले श्री गुरुमंदिर विजापूरच्या मुसलमान बादशहाने बांधले असल्याने त्यावर कळस नाही, तर लांबट आकाराची उंच अशी वास्तू आहे आणि त्यासमोरच कृष्णेचा विस्तीर्ण घाट व कृष्णा नदी संथ वाहत आहे.
मधोमध श्रीगुरू ज्या औदुंबर वृक्षाखाली बसत असत तो वृक्ष आणि त्याखाली कृष्णा नदीसन्मुख त्या मनोहर पादुका आहेत व त्यापुढे थोडी मोकळी जागा आहे. त्याच ठिकाणी पुजारी बसतात व आतील गाभाऱ्यात पादुकांचे पूजन करतात. या गाभाऱ्याचे दार अतिशय लहान आहे. पादुका ज्या सभागृहात आहेत त्याच्या दर्शनी भागावर चांदीचा अलंकृत पत्रा मढविला आहे. मधोमध गणेशपट्टी, त्यावर आजूबाजूला मयूर व जय-विजय आणि त्यांच्या वरील बाजूस नृसिंह सरस्वती महाराजांची प्रतिमा उठवलेली आहे. पुजारी येथे आसनस्थ होऊन पूर्जा-अर्चा करतात, त्यांच्या एका बाजूला श्रीगणेशाची भव्य मूर्ती स्थापिली असून तिचीही पूजा होते.

या मंदिराभोवती मोठा गोलाकार मंडप असून त्याला चारही बाजूंनी उंच व विस्तृत खांब आहेत.

पैठण

Parent Category: महाराष्ट्र दर्शन Category: मंदिरे
Written by सौ. शुभांगी रानडे
    प्राचीन काळी प्रतिष्ठान या नावाने इतिहास प्रसिद्ध असलेले हे तीर्थस्थान गोदावरी नदीच्या तीरावर असून ते महाराष्ट्राचे श्रद्धास्थान आहे. पूर्वी दक्षिणकाशी म्हणून ते ख्यातनाम होते. यावरूनच धार्मिकदृष्ट्या पैठणचं महत्त्व किती थोर होतं याची कल्पना येईल. शककर्त्या सातवाहन राजवंशाची ही राजधानी होती. महाराष्ट्रातील थोर संत श्री एकनाथांचे हे जन्मस्थान, याच तीर्थस्थानी त्यांनी गोदावरी नदीत समाधी घेतली. संत एकनाथांनी लिहिलेलं एकनाथी, भागवत, त्यांच्या गवळणी आणि भारूडं मराठी संत साहित्यात अजरामर आहेत. आचरणातून आणि साहित्यातून सतत समानतेचा विचार मांडणारे ते एक लोकप्रिय संत होते.
ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या मुखातून वेद वदविले ते याच नगरीत. वारकरी संप्रदायाइतेकच महानुभावी पंथ व जैन धर्मीयही पैठणला तीर्थस्थान म्हणून मन:पूर्वक मानतात हे विशेष. नाग-षष्ठीला येथे मोठा उत्सव असतो.
वारकरी संप्रदायात पैठणची वारी करणारे अनेक वारकरी आहेत. प्राचीन काळापासून पैठण हे जरीकाम व कलाकुसर यासाठी प्रसिद्ध असून पैठणी तर संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे.
येथील एकनाथ महराजांचा वाडा, तेथील पाण्याचा रांजण, संत एकनाथांची समाधी, दत्तमंदिर, नृसिंह मंदिर, नवनाथ मंदिर, तीर्थखांब ही स्थळं भाविकांना वंदनीय आहेत.

पावस

Parent Category: महाराष्ट्र दर्शन Category: मंदिरे
Written by सौ. शुभांगी रानडे
     
     सोहम साधनेचा पुरस्कार करून लोकोद्धार करणारे स्वामी स्वरूपानंद यांच्या वास्तव्याने पुनीत झालेले हे स्थान रत्नागिरी जिल्ह्यात रत्नागिरीपासून अवघ्या २० कि. मी. अंतरावर आहे. या ठिकाणी स्वामीजींचे समाधी मंदिर आहे. स्वामी स्वरूपानंदांनी आयुष्यभर ज्ञानेश्वरीतील आध्यात्मिक विचार भक्तांपर्यन्त सुबोधणे पोहचविला. त्यांचे प्रेमळ व्यक्तिमत्व सर्वसामान्यांच्या हिताबद्दलची तळमळ आणि साधेपणा यामुळे त्यांचा भक्त परिवार फार मोठा आहे. त्यांच्या भक्तमंडळींनी `स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ' हा ट्र्स्ट स्थापन करून स्वामीजींच्या विचार व कार्याचा प्रसार करण्याचे कार्य सुरू केले आहे.
     पावस येथे येणाऱ्या भक्तांसाठी मंडळातर्फे अधिकाधिक सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. श्री स्वामी मंदिर, उत्सव मंडप, भक्त निवास, आध्यात्मिक मंदिर आदि प्रकल्प या मंडळाने प्रत्यक्षात आणले आहेत. स्वामीजींनी लिहिलेल्या ग्रंथांचं प्रकाशनही मंडळातर्फे केले जाते. ज्या निवासात स्वामीजींनी सतत चाळीस वर्षे वास्तव्य केले ते अनंत निवास भक्त मंडळाने श्रद्धापूर्वक जतन करून ठेवलेले आहे. मंडळातर्फे ग्रंथ पारायण, शैक्षणिक मदत, वैद्यकीय मदत तसेच भक्तांना भोजन व प्रसाद असे उपक्रम राबविले जातात.

मंदिराच्या आवारात एका आवळीच्या झाडातून एक स्वयंभू गणपतीही प्रकट झाला आहे. येथे विश्वेश्वर व सोमेश्वर मंदिरे आहेत.

पंढरपूर

Parent Category: महाराष्ट्र दर्शन Category: मंदिरे
Written by सौ. शुभांगी रानडे
  गेली शेकडो वर्षे महाराष्ट्रातील सर्वसामान्य माणसाच्या हृदयात अनेक पिढ्या सर्वोच्च श्रद्धास्थान बनून असलेलं हे तीर्थस्थान वारकरी संप्रदायाचं आणि संत महंतांचं आदिदैवत आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक संतकवीने पंढरपूर आणि पंढरपूरच्या विठ्ठलाचा अगाध महिमा मोठ्या भक्तीभावाने वर्णन केला आहे. `माझे माहेर पंढरी', `तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल । देव विठ्ठल देवपूजा विठ्ठल' अशा समर्पित भावनेने लिहिलेले असंख्य अभंग म्हणजे मराठी भाषेतील उत्कट भावकाव्य होय.
चंद्रभागेकाठी असलेल्या या तीर्थस्थानी विठ्ठल व रूक्मिणीची भव्य प्राचीन मंदिरे आहेत. अलिकडे भक्तांची वर्दळ लक्षात घेऊन मंदिरात दर्शनार्थीसाठी अनेक सोयी केल्या आहेत. आषाढी आणि कार्तिकी एकादशीला येथे फार मोठी यात्रा भरते. महाराष्ट्र व कर्नाटकातील लक्षावधी वारकरी दिंड्या व पालख्या घेऊन या यात्रेस पायी येतात.

मोठं तीर्थस्थान असल्याने या क्षेत्री असंख्य देवालये व मठ आहेत. लक्ष्मी, पुंडलिक, विष्णुपद, त्र्यंबकेश्वर, मल्लिकार्जून, श्रीराम, अंबाबाई, नामदेव यांची प्रेक्षणीय मंदिरे आहेत. अनेक संत सत्पुरूषांच्या समाध्या पंढरपूरच्या परिसरात विराजमान आहेत. मंदिराच्या प्रवेशद्वाराशीच नामदेवाची पायरी आहे. संत जनाबाईचं घर असलेलं गोपाळपुरा हे स्थानही प्रेक्षणीय आहे.
पंढरपूर हे वारकरी संप्रदायाचे केंद्रस्थान असून या स्थानाचे महात्म्य महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात दूरवर पसरलेले आहे

शनि-शिंगणापूर

Parent Category: महाराष्ट्र दर्शन Category: मंदिरे
Written by सौ. शुभांगी रानडे

      अहमदनगर जिल्ह्यातील एक प्रमुख आणि जागृत क्षेत्र म्हणून शनि शिंगणापूर हे संपूर्ण महाराष्ट्नला परिचित आहे. येथे श्रीशनैश्वराचे स्वयंभू जाज्वल्य देवस्थान असून शनैश्वराची मूर्ती ५ फूट ९ इंच उंचीची आहे.

या स्वयंभू मूर्तीबद्दल अनेक आख्यायिका भाविकात प्रचिलित आहेत. विशेष म्हणजे हा देव उघड्यावरच एका चौथऱ्यावर आहे. देव आहे पण देऊळ नाही असे या देवाचे वैशिष्ट्य होय. मूर्तीच्या डोईवर वृक्ष पण नाही. नजिकच्या लिंबाच्या वृक्षाची फांदी डोईवर आली तर ती गळून पडते. या लहानशा गावाची लोकवस्ती सुमारे ३००० असेल पण येथील घरांना दरवाजे नाहीत याचे आश्चर्य वाटते.

अगदी जगावेगळे असलेले हे देवस्थान चमत्कारांमुळे खूप प्रसिद्ध पावले आहे. देव दर्शन दिवसातून कोणत्याही वेळेस घेता येते. स्त्रियांना मात्र चौथऱ्यावर जाऊन दर्शन घेण्यास मनाई आहे. दुरून दर्शन घेता येते. दर्शनापूर्वी आंघोळ करून शुचिर्भूत होणे आवश्यक असते. आंघोळीची व्यवस्था देवस्थानाच्या आवारात कायम आहे. शनि अमावस्या व गुढीपाडवा या दिवशी येथे मोठी यात्रा असते. शनि जयंतीस (वैशाळी अमावस्या) येथे उत्सव साजरा होतो.
X

Right Click

No right click