१०. सक्रिय राजनीती - २
-----------------------------------------------------------------
सेनानी सानेगुरुजी - राजा मंगळवेढेकर - अनुक्रमणिका
>-----------------------------------------------------------------
१०. सक्रिय राजनीती - २
खानदेशात असा गावोगावी स्वातंत्र्याचा संदेश देत गुरुजी फिरले. नंतर ते कोकणात शिरोड्यालाही गेले. शिरोडा येथे मोठी सत्याग्रही छावणी उघडलेली होती. ते एक धारातीर्थच बनले होते. महाराष्ट्रातून ठिकठिकाणाहून शेकडो सत्याग्रही मिठाच्या सत्याग्रहासाठी शिरोड्याला गोळा झाले होते. गुरुजींना तिथे परत खानदेशात जाऊन निधी गोळा करण्याचा आदेश मिळाला. गुरुजी परत खानदेशात आले. गावोगावी हिंडून सभा घेऊ लागले. निधी जमा करू लागले. कुंझर-पाचोरा-उतराण-एरंडोल असे गुरुजी या गावाहून त्या गावाला झंझावाताप्रमाणे लोकांच्या चित्तात स्वातंत्र्यभावना चेतवीत चालले होते. त्यांच्या प्रचाराने सरकारी अधिकारी खवळले. त्यांनी गुरुजींना पकडून तुरुंगात डांबण्याचे ठरवले. गुरुजीही त्यांना चुकवीत चालले.
एके दिवशी संध्याकाळी अंमळनेरला सभा होती, नदीच्या वाळवंटात प्रचंड जनसमुदाय जमलेला होता. सभेच्या आधी अटक होऊ नये म्हणून गुरुजी टांग्यात बसून आले. सभेत उभे राहिले. त्या दिवशी गुरुजींची वाणी साग्राज्यशाहीवर अग्निवर्षाब करीतच अवतरली. विदेशी मालावर बहिष्कार टाकण्याची कळकळीची विनंती गुरुजींनी केली.
सभा संपता संपताच गुरुजींना फौजदाराने अटक केली. खटला भरण्यात आला. गुरुजींना १५ महिने सक्तमजुरी आणि २०० रु. दंड, दंड न भरल्यास आणखी तीन महिने सक्तमजुरी अशी शिक्षा ठोठावण्यात आली.
गुरुजींना धुळे तुरुंगात पाठवण्यात आले. १७ मे १९३० पासून गुरुजींचा पहिला कारावास सुरू झाला. गुरुजी राजकीय कारणामुळे तुरुंगात आले, पण ते स्वतःला तथाकथित राजकीय नेते वर्गैरै समजत नसत. त्यांचा पिंड विधायक, रचनात्मक कार्व करण्याचा होता. ते म्हणत असत, “मी प्रेम धर्माचा, बंघुभावाचा प्रचारक होईन, अस्पृश्यता नाहीशी व्हावी, हिंदू-मुस्लिम ऐक्य व्हावे, साक्षरता वाढावी इत्यादी प्रकारची कामे मी करीन, मी तसा पोलिटिकल माणूस नाही.”
तुरुंगातही थोरामोठ्यांपेक्षा गुरुजींची मैत्री जमली ती तीन सत्याग्रहींशी. कुणाला ते आपले मित्रच वाटत असत. त्यांचा धाक त्यांना मुळीच वाटत नसे. गुरुजी या तरुण सत्याग्रही मुलांना तुरुंगात स्फूर्तिदायक गोष्टी सांगत असत, स्वातंत्र्याची गाणी
शिकवीत असत, नवविचार देत असत.
चक्कीवर दळताना मुलांच्या हाताला फोड यायचे. दळताना त्यांना त्रास व्हायचा. मग गुरुजी आपले दळण दळून त्यांच्याही वाट्याचे दळण दळून द्यायचे.
-----------------------------------------------------------------
सेनानी सानेगुरुजी - राजा मंगळवेढेकर - अनुक्रमणिका
>-----------------------------------------------------------------