१०. सक्रिय राजनीती - १
१०. सक्रिय राजनीती - १
साने गुरुजींनी शाळेच्या चिमुकल्या जगाचा निरोप घेतला आणि ते मराठी मुलुखाच्या मोठ्या जगात आले. त्यांच्या मनातील अतिविशाल व व्यापक ध्येयसृष्टीची ते वाटचाल करून आले. प्रारंभी ते जळगावजवळील पिंपराळ इथल्या
आश्रमात दाखल झाले. आश्रमातील मुले चटकन त्यांच्याभोवती जमा झाली. गुरुजीही मुलांत मूल होऊन गेले.
आश्रमातील सफाई, दळण, कताई, रसोई इत्यादी कामे गुरुजी करू लागले. मुले त्यांना आणि ते मुलांना प्रत्येक कामात सहकार्य करू लागले. गुरुजींना चरख्यावर सूत काढता येत होते, पण टकळीवर काढता येत नव्हते. म्हणून आश्रमातील मुलांकडून त्यांनी त्याचे घडे घेतले.
काही दिवसांतच आश्रमाच्या संचालकांनी गुरुजींची वृत्ती व वाणी हेरून त्यांना बाहेर खेड्यापाड्यांत प्रचारासाठी पाठवले. सत्याग्रहाची मोहीम चालविण्यासाठी सत्याग्रही स्वयंसेवकांची आणि आर्थिक मदत गोळा करण्याची आवश्यकता होती.
तरुणांना आकर्षित करून घेण्याची हातोटी गुरुजींनी साधलेली होती.
५-६ मुलांचा गट घेऊन गुरुजी निघाले. सावदा-फैजपूरकडे गेले. बाहेरचे मुक्त वातावरण मुलांनाही आवडले. त्यातून गुरुजी बरोबर! त्यांचा उत्साह वाढला. सावद्याला जाताना रेल्वेच्या डब्यातून लढ्यासाठी निधी जमा करायला सुरुवात केली. गांधीजींनी देशात असे अनुकूल वातावरण निर्माण केले होते की, लोकही यथाशक्ती मदत चटकन देत असत.
गुरुजींबरोबर मुले गावोगावी जात असत. गावात फिरून दवंडी देत असत. संध्याकाळी सभा घेत असत. सभेत गुरुजी बोलू लागले की भारताचा सारा स्वातंत्र्यलढा त्यांच्या जिभेवर अवतरत असे. एकेक शब्द त्यांच्या अंतःकरणाच्या तळमळीतून उतरत असे. श्रोत्याच्या हृदयाचा ठाव ते घेत असत. सभेनंतर लढ्यासाठी निधी जमा करीत असत. गुरुजींच्या ओजस्वी भाषणाने लोकांची मने भरारून जात असत. ते भराभर पैसे तर देत असतच पण काही जणांनी बोटातील अंगठ्याही काढून दिल्या. गुरुजींना एक नवीनच दर्शन घडले. त्यांचा आत्मविश्वास वाढला. कारण त्यांना वाटे, कोण आपल्याकडे लक्ष देणार? कोणाला वेळ? पण घडले होते मात्र निराळेच!
सभेच्या आधी गुरुजी स्वरचित अशी राष्ट्रीय गाणी म्हणत असत. त्या वेळी रचलेले त्यांचे पुढील गाणे फारच लोकप्रिय झाले होते -
आम्ही मांडू निर्भय ठाण । देऊ हो प्राण ।
स्वातंत्र्य-सुधेचे निज जननीला घडवू मंगल पान ॥
स्वार्थाची करुनी होळी
छातीवर झेलू गोळी
करू मृत्यूशी खेळीमेळी
मातृभूमीच्यासाठी मोदे करू सारे बलिदान ॥
श्रीकृष्ण बोलुनि गेला
जय अखेर सत्पक्षाला
ना पराभूती सत्याला
जयजयकार करुनी पुढती पुसू होऊ बेभान ॥
ही मंगल भारतभूमी
करू स्वतंत्र निश्चित आम्ही
हा निश्चय अंतर्यामी
मातृमोचना करूनी जगी तिज अर्पू पहिले स्थान ॥
येतील जगातील राष्ट्रे
वंदितील भारतमाते
कारितील स्पर्श चरणाते
धन्य असा सोन्याचा वासर दाविल तो भगवान ॥