७. छात्रानंद गुरुजी - २
-----------------------------------------------------------------
सेनानी सानेगुरुजी - राजा मंगळवेढेकर - अनुक्रमणिका
>-----------------------------------------------------------------
७. छात्रानंद गुरुजी - २
छात्रालयाचे काम अंगावर घेतल्यानंतर गुरुजींचा विद्यार्थ्यांशी अधिक जवळून संबंध येऊ लागला. गुरुजींची तेथील खोलीदेखील छात्रालय-विद्यार्थ्यांचीच बनली. सगळे तिथे यायचे, बसायचे. गुरुजींच्या भोवती मुलांचा गराडा सारखा असेच.
बालमनात कसा प्रवेश करावा, बालकांच्या भावविश्वाशी कसे समरस व्हावे, याचे उपजत असे ज्ञान जणू गुरुजींना होते. एरवी थोरामोठ्यांत संकोचून जाणारे, कमी बोलणारे गुरुजी लहान मुलांत मात्र मूल होऊन जात.
छात्रालयात भल्या सकाळी लवकर उठावे लागे. मुलांची ती तर साखरझोपेची वेळ. मुले उठायला कुरकुरत. गुरुजी मातेच्या मायेने जवळ जाऊन अंगावरून हात फिरवून उठवत असत. कधी हलक्या प्रेमळ हाकेने. तर कधी 'घनःश्याम सुंदरा
श्रीधराः' अशा भूपाळीच्या स्वरांनी मुलांच्या अंगावरील पांघरूण दूर करीत असत.
प्रार्थना मंदिरात प्रार्थना व्हायची. गुरुजी तिथे सुंदर सुगंधी फुले आणून ठेवीत असत. सुरेल आवाजात प्रार्थना होई. भजने म्हटली जात. दिवसाची सुरुवात अशी प्रसन्न, सुंदर व्हायची.
खेड्यापाड्यांतून, ठिकठिकाणाहून आलेले विद्यार्थी छात्रालयात असत. त्या काळी आजच्यासारखी ठिकठिकाणी विद्यालये नव्हती. त्या विद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये कुणी श्रीमंतीत, कुणी लाडात वाढलेले असत, नको त्या सवयी त्यांना
असत. गुरुजींना त्यांना चांगल्या सवयी लावायच्या होत्या. त्यासाठी गुरुजींनी त्यांना उठता बसता रूक्ष कोरड्या उपदेशाचे घुटके पाजण्याऐवजी वात्सल्यपूर्ण कृती करायला सुरुवात केली. मुले शाळेत किंवा क्रीडांगणावर गेली म्हणजे गुरुजी
त त्यांच्या खोल्यांतून जात असत आणि तशीच पडलेली अंथरुणे पांघरुणे नीट घड्या घालून ठेवीत असत. इकडे तिकडे पडलेले कपडे, पुस्तके, वह्या सर्व व्यवस्थित लावीत असत. काजळीने काळ्या पडलेल्या कंदिलाच्या काचा स्वच्छ पुसून ठेवीत असत. डबे, कपबशा, भांडी असतील तर ती घासून ठेवीत असत. गादीवरच्या मळक्या चादरी, दोरीवरचे कळकट कपडे धुवून वाळवीत असत. खोल्या स्वच्छ झाडून ठेवीत असत.
मुले बाहेरून आली म्हणजे आपल्या लखलखीत झाडलेल्या खोल्या आणि व्यवस्थित ठेवलेले सामान पाहून नवल करीत! कुणी केले हे सारे? कुणाचा येथे प्रेमळ हात फिरला? साने सरांचा! हे कळल्यावर त्यांना आपलीच लाज वाटे. दुसऱ्या दिवसांपासून ते स्वच्छ, व्यवस्थित राहण्याचा प्रयत्न करू लागायचे. हळूहळू त्यांच्या वागणुकीत इष्ट तो बदल घडून येई. कुणी आजारी पडला, कुणाला काही -लागले-खुपले तर गुरुजी त्याची रात्र रात्र जागून सेवा करायचे. अडीअडचणीला धावायचे. गरीब विद्यार्थ्यांची फी थकायची. गुरुजी आपल्या पगारातून ती भरून टाकायचे.
छात्रालयाची इमारत शाळेच्या इमारतीपासून थोडी दूर होती. तो परिसरही रुक्ष, ओसाड होता. साप-विंचवांची वस्ती तिथे असायची म्हणून त्या भागाला 'अंदमान' म्हणत असत. गुरुजींनी या अंदमानचे 'आनंदभवन' करायचे ठरवले. त्या ओसाडीत
- बगिचा फुलवावची योजना आखली. एका सुट्टीत छात्रालयातील तरुणांबरोबर खपून त्यांनी ती जमीन खणून साफ केली. वाफे तयार केले. फुलझाडे लावली. विहिरीचे पाणी उपसून बाग शिंपली. मुलांना फुलांचा सहवास मिळाला पाहिजे, त्यांच्या दृष्टीसमोर सदैव फुलांची पवित्र, निर्मळ सृष्टी असली पाहिजे. फुले जशी सुगंधी, स्वच्छ व रसमय असतात तशी आपली जीवने व्हावीत, ही भावना फुलांच्या दर्शनाने मुलांच्या मनात सहज निर्माण व्हावी अशी गुरुजींची इच्छा होती. हळूहळू बाग आकाराला आली. काही दिवसांतच त्या ओसाडीत हिरवळ दिसू लागली. गुलाब, निशिगंध, शेवंती, मोगरा नाना तऱ्हेची फुलझाडे तरारली. गुलबाक्षी, कर्दळी, तुळशी डोलू लागल्या आणि काही दिवसांतच एका गुलाबाच्या रोपट्यावर एक कळी दिसू लागली. गुरुजींना केवढा आनंद झाला! फुलांच्या, झाडांच्या हिरव्या सृष्टीतच त्यांचे बालपण गेले होते. थोड्या दिवसांतच कळीचे फूल झाले. त्या रात्री छाञालयातील मुलांना घेऊन, बगिच्यात बसुन गुरुजींनी त्या गुलाबाच्या फुलाचा जन्मोत्सव साजरा केला. त्या रोपट्याला त्यांनी रंगीबेरंगी कापडाच्या तुकड्यांनी सजविले. मग मुलांनी गाणी म्हटली, बासरी वाजवली. गुरुजींची थोर निखळ सौंदर्यदृष्टी नि रसिकता यातून जशी प्रकट होते, तसेच फुलांवर, वृक्षवेलींवर, अवघ्या सृष्टीवरच प्रेम करावे, सृष्टीशी तद्रूप होऊन जावे, हा पाठ किती वेगळ्या तऱ्हेने त्यांनी मुलांना दिला होता,
-----------------------------------------------------------------
सेनानी सानेगुरुजी - राजा मंगळवेढेकर - अनुक्रमणिका
>-----------------------------------------------------------------