७. छात्रानंद गुरुजी - १
-----------------------------------------------------------------
सेनानी सानेगुरुजी - राजा मंगळवेढेकर - अनुक्रमणिका
>-----------------------------------------------------------------
७. छात्रानंद गुरुजी - १
१९२३. सालच्या जुलै महिन्यात तत्त्वज्ञानाचा एक विद्यार्थी म्हणून पी. एस. साने हे अंमळनेर येथील तत्त्वज्ञान मंदिरात दाखल झाले. आपण त्यांना आता साने गुरुजी म्हणूया. या संस्थेची कीर्ती दूरवर पसरलेली होती. तत्त्वज्ञान मंदिरात
येण्यापूर्वी गुरुजींच्या मनीमानसी एक सुंदर स्वप्न होते. ज्या अद्वैताची शिकवण भारतीय संस्कृतीने, तत्त्वज्ञानाने दिली त्या अद्वैताची साधना त्या ठिकाणी चाललेली असणार, अद्वैत अभ्यासणारेच नव्हे तर, दैनंदिन जीवनात ते आचरणारे साधकही या मंदिरात असणार अशी गुरुजींची कल्पना होती. द्वैताने भरलेल्या या जगात अल्प प्रमाणात का होईना, अद्वैत स्वीकारलेले साधक पहायला मिळणार, त्यांच्यासोबत रहायला मिळणार, अशा आशेने ते आले होते. पण जेव्हा ते तत्त्वज्ञान मंदिरात प्रत्यक्ष रहिले आणि तिथली सगळी तऱ्हा पाहिली तेव्हा त्यांचा फारच भ्रमनिरास झाला. साबणाच्या वडीसाठी भांडणारे दोन प्रोफेसर पाहून त्यांना धक्काच बसला.
परंतु निरनिराळ्या प्रांतातले लोक तिथे होते आणि त्यांच्याशी थोडाफार संबंध आल्याने आधीच प्रांतनिरपेक्ष असलेली गुरुजींची दृष्टी अधिक विशाल, भारतीय बनली. त्या त्या प्रांताची ओळख त्या त्या प्रांतातील माणसांकडून करून घेण्याची
संधी लाभली. पुढे प्रतिपादलेल्या आंतरभारतीचे बीज मनोभूमीत रुजण्यास मदत झाली, हा एक आणि विविध तत्त्वज्ञानांचा अभ्यास करावयास मिळाला हा दुसरा असे लाभ पदरात पडले. बाकी बराचसा मनस्तापच झाला. तत्वज्ञान मंदिरात असतानाच त्यांचे वडील भाऊराव वारले. गुरुजींचे पितृछत्र हरवले. ते पालगडला जाऊन आले. तत्त्वज्ञान मंदिरात गुरुजींचे मन रमले नाही, म्हणून १९२४ साली एम. ए. झाल्यानंतर अंमळनेर येथील खानदेश एज्युकेशन सोसायटीमधे ते पी. एस. साने सर म्हणून दाखल झाले. तेच हायस्कूल आता प्रताप हायस्कूल म्हणून ओळखले जाते.
काळी टोपी, ओठावर ठसठशीत मिशा, गळ्याभोवती उपरणे गुंडाळलेले, काळा गळाबंद कोट, पायघोळ धोतर, पायात पुणेरी जोडा आणि हातात एखादे पुस्तक अशी त्या वेळी साने सरांची मूर्ती होतो. शाळेत गुरुजी त्या वेळच्या पाचवीला इंग्रजी व संस्कृत, सहावीला मराठी आणि मॅट्रिकला इतिहास व मराठी हे विषय शिकवीत असत. जो विषय विद्यार्थ्यांना शिकवायचा, त्या विषयाची मिळतील तेवढी पुस्तके मिळवून वाचीत असत आणि मग शिकवायला विद्यार्थ्यांपुढे उभे राहत असत. म्हणजे अध्यापनापूर्वी अध्ययन करणारे हे खरेखुरे निष्ठावंत गुरुजी होते. अशा निष्ठेमुळेच त्यांनी 'गुरुजी' हे पद सार्थ केले.
“साने सर उत्तम शिकवतात” एवढी लोकप्रियता त्यांनी थोड्या दिवसात मिळवली. हायस्कूल मुख्याध्यापक श्री. गोखले यांनी गुरुजींच्या ठायीची विद्यार्थ्यांविषयीची कळकळ व वात्सल्य ही श्रेष्ठ गुणसंपदा पाहिली आणि त्यांच्यावर तेथील वसतिगृहाची जबाबदारी सोपवली. शाळेच्या अभ्यासक्रमात व शिक्षणात ज्या गोष्टी अनेक अडचणींमुळे अपुऱ्या राहतात, त्या छात्रालयात बऱ्याचशा पूर्ण करता येतात. मुलांना शिक्षकांच्या सान्निध्याचा पुरेपूर फायदा मिळावा व मुलांच्या शीलसंवर्धनाकडे अधिक लक्ष देणे शक्य व्हावे; त्यांच्यात सहजीवन, सहकारिता, स्वावलंबन, सचोटी, स्वाभिमान, देशभक्ती व बंधुभाव या गुणांचे बीजारोपण व्हावे असाच उद्देश छात्रालय काढण्यामध्ये संस्थाचालकांचा होता. या उद्देशांची पूर्ती करायला गोखले यांना साने गुरुजीच सर्वथैव युक्त वाटले हे एका अर्थी सहज स्वाभाविक होते.
-----------------------------------------------------------------
सेनानी सानेगुरुजी - राजा मंगळवेढेकर - अनुक्रमणिका
>-----------------------------------------------------------------