४. शिक्षणाचा ध्यास -१

Parent Category: मराठी पुस्तके Category: सेनानी साने गुरुजी Written by सौ. शुभांगी रानडे

-----------------------------------------------------------------
सेनानी सानेगुरुजी - राजा मंगळवेढेकर - अनुक्रमणिका
>-----------------------------------------------------------------

४. शिक्षणाचा ध्यास -१

कोकणातले पालगड गाव तसे लहान खेडेच. त्या काळात तिथे माध्यमिक शिक्षणाची काहीही सोय नव्हती. प्राथमिक शाळेत पाचवीपर्यंतचे वर्ग होते. सहावीचा वर्ग नव्हता. तेव्हा पुढच्या शिक्षणासाठी गावापासून बाहेर जाणे भागच होते. त्या वेळी श्यामची एक आत्या दापोलीत रहात होती. दापोलीत इंग्रजी शाळा होती. भाऊरावांनी श्यामला आपल्या बहिणीकडे शिक्षणासाठी ठेवण्याचे ठरविले. दापोली-पालगंड अंतर सहा कोसांचे होते. श्यामने सर्वांचा निरोप घेतला. आई म्हणाली,

“श्याम नीट रहा हो. मन लावून शीक.”

श्याम दापोलीत आतेकडे शिकायला आला. १० जून १९१२ रोजी दापोलीच्या मिशन हायस्कूलमध्ये श्यामचे नाव घातले. टेकडीवर बांधलेल्या सुंदर इमारतीमधील ही शाळा श्यामला फार आवडली. श्यामची ही शाळा नामांकित होती. महर्षी कर्वे, रँग्लर परांजपे, म. म. पां. वा. काणे यांच्यासारखे विद्यार्थी या शाळेत शिकले होते आणि भारतामध्ये प्रारंभीच्या काळी ज्यांना भारतरत्न ही सर्वोच्च गौरवउपाधी प्राप्त झाली त्यातील महाराष्ट्रातील दोन्ही भारतरत्ने - महर्षी कर्वे आणि
म. म. पां. वा. काणे- त्या हायस्कूलचेच विद्यार्थी, त्याच भाग्यवान भूमीत आणि शाळेत श्यामला चार वर्षे शिकायला मिळाले.

दापोलीत शिक्षणासाठी काढलेल्या या दिवसांविषयी श्याम म्हणतो, “आत्याकडल्या चार वर्षांच्या आयुष्यक्रमात माझा पुष्कळ फायदा झाला. मी कधी आजारी पडलो नाही. वेळ फुकट न दवडण्यास मी शिकलो. लौकर निजणे व लौकर उठणे हा
नियम येथे सहज पाळला जाई. व्यवस्थितपणाची सवय लागली. कामाचा कंटाळा गेला. कोणतेही काम करण्याची लाज वाटेनाशी झाली. कितीही कष्ट पडले तरी ते विद्येसाठी केले पाहिजेत, हे शिकलो. माझ्या वर्तनामुळे माझ्या माय-बापांस
पुष्कळ समाधान वाटू लागले.”

आत्याच्या घरच्या वातावरणाचा जसा अनुकूल प्रभाव श्यामवर पडला तसाच शाळेतील वातावरणाचाही पडला. त्याच्या मनाचा आणि बुद्धीचाही विकास या काळात चांगल्या प्रकारे झाला. या शाळेत श्यामला राम भेटल्याचा उल्लेख मागे
केलाच आहे. श्याम मन लावून शिकू लागला. “मी मोठा होईन. शिकेन, आईला सुखात ठेवीन.” अशी महत्त्वाकांक्षा त्याच्या ठायी उत्पन्न झाली. तो मन लावून शिकू लागला. शाळेतल्या अभ्यासाबरोबरच त्याने शाकुंतलाची प्रस्तावना, काव्यदोहन, नवनीत, वृत्तदर्पण ही पुस्तके वाचून काढली. घरी आजोबांकडून वेदविद्या शिकत होताच. लोकमान्यांचा केसरी तो अधाशासारखा वाचून काढी.

त्याचे मन फुलू लागले. बुद्धीला तेज चढू लागले. तो शाळेतल्या वक्तृत्व सभेत भाषणे करू लागला. कविताही लिहू लागला. भेंड्यांच्या खेळात तर तो आपल्या पाठांतराने, स्मरणशक्तीने साऱ्यांना हरवून टाकत असे. अभ्यासाबरोबरच खोड्याही चालू होत्या. एकदा वर्गात दोन मुलांच्या पिशव्यांना श्यामने गाठी मारून ठेवल्या. शिक्षक रागावले. “हे कृत्य कोणी केले?” त्यांनी दरडावून विचारले. पण वर्गात कोणीच कोणाचे नाव सांगेना. शेजारच्या वर्गातल्या मुलाने श्यामचे नाव सांगितले. शिक्षकांनी श्यामला उभे केले. निगडीच्या फोकाच्या छडीने उजवा-डावा हात फोडून काढला. छडी मोडली पण श्यामचा हात खालीसुद्धा झुकला नाही, की डोळ्यांतून पाण्याचा थेंबही ओघळला नाही. 'मोडेन पण वाकणार नाही' ही कणखर वृत्ती श्यामने प्रकट केली. शिक्षक अधिकच संतापले. त्यांनी वर्गाला विचारले, “आता याला कोणती शिक्षा करू?”

मुले म्हणाली, “श्यामला क्षमा करा!”

वर्गबंधूंचे ते प्रेम पाहून मात्र श्याम विरघळला. त्याच्या डोळ्यांतून कृतज्ञतेचे अश्रू पाझरू लागले.
अभ्यास, खोड्या, खेळ आणि वाचन यांत श्यामचा वेळ जाई खरा, पण आईची आठवण मनात हुरहूर निर्पाण करीत असे. ओढ लावीत असे. तो व्याकूळ होत असे. मग शनिवारची वाट पहात बसे. शनिवारी सहा कोस चालून श्याम पालगडला
जात असे. रविवारचा दिवस आईजवळ राहून तो परत दापोलीला येत असे.

-----------------------------------------------------------------
सेनानी सानेगुरुजी - राजा मंगळवेढेकर - अनुक्रमणिका
>-----------------------------------------------------------------

Hits: 83
X

Right Click

No right click