५. मातृवियोग

Parent Category: मराठी पुस्तके Category: सेनानी साने गुरुजी Written by सौ. शुभांगी रानडे

-----------------------------------------------------------------
सेनानी सानेगुरुजी - राजा मंगळवेढेकर - अनुक्रमणिका
>-----------------------------------------------------------------

५. मातृवियोग

आजच्यासारखी प्रवासाची वाहने त्या काळी उपलब्ध नव्हती. रस्ते नव्हते. प्रवासही खडतर असायचा. श्याम पालगडहून निघाला, तो हर्णे बंदरापर्यंत बैलगाडीने आला. तिथून बोटीने मुंबई. मुंबईहून पुढे पुणे. पुण्याहून रहिमतपूर. औंध हे संस्थान रहिमतपूरपासून चौदा मैलांवर आहे. तिथे रेल्वेस्टेशन नाही. त्यामुळे श्यामला बैलगाडीने रहिमतपूरपासून औंधला यावे लागले. असा हा खडतर प्रवास श्यामनें विद्येसाठी केला.

औंधला सखाराम दाते नावांचा पालगडचाच विद्यार्थी होता. श्याम सखारामकडेच उतरला. श्याम मोठ्या आशेने औंधला आला खरा पण आल्याबरोबर त्याच्या पदरी निराशा पडली. श्याम येण्याच्या काही दिवस आधीच तिथल्या बोर्डिंगमध्ये एक
नवीन नियम जारी करण्यात आला होता. संस्थानाबाहेरच्या मुलांना अत:पर बोर्डिंग बंद करण्यात आले होते. श्याम कोकणातला. संस्थानच्या बाहेरचा. त्यामुळे त्याला बोर्डींगचा फायदा मिळणार नव्हता. पोटाचा भीषण प्रश्‍न श्यामपुढे उभा राहिला. पण सखारामने धीर दिला, म्हणाला, '“मला मिळणारी शिदोरी आपण दोघे खाऊ.”

दोन भाकऱ्या आणि दोन मुदी भात एवढे अत्न बोर्डिगमधून सगळ्यांना मिळत होते. सखारामने मनाचा मोठेपणा दाखवला पण पोट भरणार कसे ? परंतु श्यामचा निर्धार कायम होता. घरी परत जाण्याचा विचार त्याच्या मनाला शिवला नाही. 'उपाशी मरेन पण घरी परतणार नाही' असा निर्धार त्याने मनाशी केला. पण करायचे काय? माधुकरी मागावी? वार लावावेत? पण येथे ना कोणी ओळखीचे ना मायेचे! कोणापुढे तोंड उघडायचे? श्याम विचारात बुडून भेला. .

औंधच्या श्रीयमाई श्रीनिवास विद्यालयात श्यामने नाव घातले. महिना आठ आण्याप्रमाणे भाड्याची एक लहानशी अंधेरी खोलीही ठरवली. शाळेचा अभ्यास सुरू झाला. पोटासाठी माधुकरी मागण्याचे ठरवले. “ॐ भवति भिक्षा देहि” म्हणत श्याम घरोघरी जाऊ लागला. पण दारोदारी होणारी हेटाळणी त्याच्या हळुवार मनाला मानवेना. मग त्याने हाताने स्वयंपाक सुरू केला. भाकऱ्या करता येईनात. एका वृद्ध माऊलीने भाकऱ्या करून दिल्या. तुकाराम नावाचा एक मित्र गिरणीत सांडलेले पीठ देऊ लागला. कधी कोरडी भाकरीच तर कधी नुसती भाजीच, कधी मक्‍याचे दाणे असे खाऊन श्याम शिक्षणासाठी खडतर तप आचरित होता. पण त्यातही विघ्न आले. औंधला प्लेग सुरू झाला. शाळा बंद पडली. जवळची घोंगडी व पुस्तके विकून श्याम पालगडला परत आला.

भाऊरावांना वाटले तो शिक्षण सोडून आला, म्हणून ते रागाने बोलले. श्यामला याचे फार दु:ख झाले. त्याने पुण्याला रामला पत्र लिहून मी तिकडे येऊ का म्हणून विचारले. रामने कळवले, 'निःशंकपणे निघून ये.' श्यामचा पुढचा प्रश्‍न तूर्त तरी
सुटला होता. वळकटी-ट्रॅंक घेऊन तो पुण्याला दाखल झाला. पुण्यात आल्यावर श्यामने नूतन मराठी विद्यालयात ६ वीच्या वर्गात नाव घातले. तो रामकडे राहू लागला. अभ्यास सुरू झाला. पण पोटोबाचे काय? श्याम कधी डाळे चुरमुरे खाऊन रहायचा, कधी रामच्या आईने दिलेले खाऊन रहायचा. त्याने खानावळीत जेवतो असे रामच्या आईला सांगितले होते. काही पुस्तके विकून त्याने खानावळीचे पैसे भरले होते. संध्याकाळी कुठेतरी चक्कर मारून येई आणि जेवण झाले म्हणून सांगे.
वार्षिक परीक्षा झाली. तेवढ्या अवधीतही श्यामने चांगला अभ्यास केला. तो पास झाला. मॅट्रिकच्या वर्गात गेला. पण जेवणाचा प्रश्‍न होताच. रामच्या आईने घरीच जेवायला सांगितले. श्यामला संकोच वाटे. त्याने काही वार मिळवले. तो
वारावर जेवू लागला. रामच्या घरातली सर्व कामे करू लागला. रामची बहीण आजारी पडली तर तिची सेवासुश्रूषा श्यामने केली. श्याम सेवाप्रिय होता. त्याने एकदा एका गरिबाला पायातली वहाण काढून दिली. अंगातला कोटही दिला.

मुखास माझ्या न शिवो नकारा
निघो मुखातून सदा सकारा

अशी श्यामची त्या वेळीही वृत्ती होती. आपल्याजवळचे आपल्याहून जो गरजू आहे त्याला देण्याचा व त्यागाचा अभ्यासही श्याम करू लागला होता. देहाला उपवास पडले तरी मनाला उपवास पडू नयेत म्हणून तो दक्ष असे. जुन्या बाजारात जाऊन
चांगली पुस्तके पहात असे. विकतही घेत असे. त्यासाठी उपाशी रहात असे.

श्यामचे पुण्याला शिक्षण चालले होते त्याचवेळी पालगडला त्याची आई आजारी पडली. तिच्या सेवेसाठी श्यामची सखू मावशी तिकडे, गेली. पण श्यामचा अभ्यास, शाळा बुडेल म्हणून त्याला कळवले नव्हते. तेवढ्यात दिवाळीची सुटी
सुरू झाली म्हणून श्याम मुंबईला आला. तिथून बोटीने हर्णें बंदरावर उतरला. त्याला आईच्या निधनाची बातमी कळली. श्यामवर वज्राघातच झाला. दु:खाने तो विव्हळ झाला. श्याम म्हणतो, “माझ्या जीवनातली आशा गेली, प्रकाश गेला. माझ्या जीवनाचे सूत्र तुटले.” श्यामने आईच्या आठवणींचे “श्यामची आई” नावाचे अत्यंत सुंदर पुस्तक पुढे लिहिले. मराठी भाषेचे ते भूषणच आहे. पुस्तकाच्या अखेरीस श्यामने म्हटले आहे, “मित्रांनो, अशी आई मोठ्या भाग्याने मिळते. माझी
आई गेली परंतु भारतमातेच्या सेवेसाठी मला तयार करून गेली. श्याम माझ्या मोहात गुरफटेल, फक्त माझीच सेवा करेल, इतरांच्या सेवेसाठी तो धावणार नाही, म्हणून तर तिने स्वत:ला दूर केले नसेल? दूर केले असेल! सर्व भारतातील माता
माझ्या श्यामच्या होऊ देत. एकच नव्हे तर अनेक आया श्यामला मिळू देत. या अनंत आया पाहण्याची दिव्य दृष्टी देऊन आई गेली. जिकडे तिकडे आता माझ्याच आया!”

याच थोर व पवित्र भावनेने श्यामने पुढल्या आयुष्यात देशसेवेचे व समाजसेवेचे कार्य केले.

जड व दुःखी अंत:करणाने श्याम परत पुण्याला आला. अभ्यासाला लागला. मॅट्रिकची परीक्षा उत्तोर्ण झाला. ते १९१८ साल होते. मॅट्रिकच्या प्रमाणपत्रावर श्यामला एखादी नोकरी त्या काळी मिळालीही असती; पण श्यामला उच्च महाविद्यालयीन शिक्षणाची तहान लागली होती. अनेक अडचणी. पुढे होत्या, पण त्या सहन करायच्या, त्यांच्याशी दोन हात करायचे, झगडायचे पण शिकाथचे असा निर्षार त्याने केला. 'न्यू पूना कॉलेज'मध्ये तो दाखल झाला. आजचे सर परशुरामभाऊ कॉलेज म्हणजे त्या काळचे न्यू पूना कॉलेज होय.

१९१८ ते १९२२ अशी चार वर्षे त्या महाविद्यालयात श्यामने शिक्षण घेतले. श्याम रामकडेच रहात होता. वार लावून जेवत होता.. प्रो. घारपुरे, प्रो. द. वा. पोतदार, प्रो. द. के केळकर, प्रो. ना. सी. फडके, श्री. रा. कृ. लागू आदी प्रसिद्ध लेखक, वक्ते, संशोधक आदी विद्वानांच्या सहवासाचा व त्यांच्या शिकवण्याचा लाभ श्यामला त्या काळात लाभला.

-----------------------------------------------------------------
सेनानी सानेगुरुजी - राजा मंगळवेढेकर - अनुक्रमणिका
>-----------------------------------------------------------------

X

Right Click

No right click

Hits: 86
X

Right Click

No right click