२५. अशी नेऊया पुढेच दिंडी
-----------------------------------------------------------------
सेनानी सानेगुरुजी - राजा मंगळवेढेकर - अनुक्रमणिका
>-----------------------------------------------------------------
२५. अशी नेऊया पुढेच दिंडी!
साने गुरूजी गेले. अनंतात विलीन झाले. त्यांची देहमूर्ती हरपली. पण वाडमयमूर्ती सर्वांसाठी चिरंतन उपलब्ध आहे.
गुरुजी आयुष्यभर झगडले, धडपडले ते सर्वांभूती कल्याणमय, आनंदमयासाठीच. या त्यांच्या वागण्यात “धीर माझ्या मना । नाही आता नारायणा? अशी त्यांची हरक्षणी अवस्था असे. पंढरपूर मंदिर प्रवेशच्या दौऱ्यात प्रत्येक सभेत ते ही ओळ म्हणून दाखवून आपली अस्पृश्यतेच्या कामातील अधीर उत्कटता व्यक्त करीत असत. ही अधीरता खरीच, पण ती उदात्त स्वरूपातली होती! गुरुजींची अधीरता, भावनाविवशता, उतावीळपणा किंवा प्राणही झोकून देण्याची सिद्धता ही अशी
उदात्तच होती. त्यांचे सारे उमाळे असे उदात्तच होते. त्यांचा संतापही उदात्त, विकारही उदात्त! गोल्डस्मिथने म्हटल्याप्रमाणे, 'Even his faults lean to virtuous side.' असे त्यांच्या दोषांचेही उदात्तीकरण झालेले होते.
मानवाविषयी गुरुजींच्या ठायी असलेल्या अथांग करुणेलाच वात्सल्याचे धुमारे फुटले होते आणि या वात्सल्यानेच त्यांना समाज-मातृत्वही प्राप्त झालेले होते. मातेच्या ममतेनेच ते सगळ्यांकडेच पहात असत. चिडले, रागावले तरी तो पुन्हा
मातेचाच राग होता. मुलाला काही कारणाने एखादे वेळी मारल्यानंतर आई जशी दुःखी होऊन अश्रू ढाळत बसते, तसेच गुरुजीही घरात बसत असत. स्वत:च्या आईकडून लाभलेला हा वात्सल्याचा वारसा त्यांनी समाजव्यापी बनवला.
पत्नीनिरपेक्ष अशा विशाल मातृत्वाचा गुरुजी एक विलक्षण आणि फार फार क्वचित आढळणारा आदर्श होते.
जन्मदात्री माता, भारतमाता आणि विश्वमाता यांच्या सेवामय निदिध्यासातून त्यांच्या ठायीच्या मातृत्वाला एवढे सहजपण लाभले होते. कमालीचे सौजन्य, दीनता, नप्रपणा त्यांच्या स्वभावात होता. याचाही परिणाम अशा प्रकारच्या ऋजुतेत
झाला असावा. सेवामय, त्यागमय, कष्टमय, प्रेममय व सोशीक अशा भारतीय ख-या संस्कृतीचा गुरुजींच्या प्रकृतीवर एवढा प्रभाव पडलेला होता! सहज म्हणा की नियतीमुळे म्हणा, पण कोकणातल्या गुरुजींना खानदेशच्या भूमीचा लाभ झाला ही गोष्टही त्यांच्या ठायीच्या मूलद्रव्याला पोषक ठरण्यास कारण झाली आहे. गुरुजींसारखा साधा, प्रेमळ, उदार, मनस्वी माणूस एरवी अन्यत्र गुदमरून गेला असता. पण त्यांच्या वृत्तीशी खानदेशच्या माणसांची वृत्तीही जमली. खानदेशची माणसे, खानदेशची माती आणि गुरुजी या परस्परांमध्ये एवढे तादात्म्य निर्माण झाले की, मातृवात्सल्याच्या नात्यानेच ते वागले.
कोकणातला निसर्ग आणि खानदेशची माती व माणसे यांच्यावर गुरुजींनी निरतिशय प्रेम केले.
अंतरीच्या उमाळ्याने गुरुजींनी लेखणीचा वापर केला त्याच उमाळयाने त्यांनी आपली वाणीही वापरली. लेखणी आणि वाणी ही त्यांना त्यांच्या कार्यसिद्धीसाठी लाभलेली अमोघ अशी वरदानेच होती.
गुरुजींची 'वाणी' आणि 'लेखणी'सुद्धा महाराष्ट्रात आबालवृद्धांनी ऐकलीच. त्यांना त्यांचा वाचक होता असे म्हणण्यापेक्षा श्रोता होता म्हणजेच अधिक उचित होईल. गुरुजींच्या ललित साहित्याला भाषा आहे म्हणण्यापेक्षा वाणी आहे असे
म्हणणेच यथार्थ ठरेल. कारण अन्य साहित्याप्रमाणे गुरुजींच्या गोष्टी केवळ वाचल्या जात नाहीत, तर ऐकल्या जातात. त्यातून गुरुजी सारखे बोलत असतात. या बहुतेक गोष्टींचा जन्मही असा सांगता-ऐकतानाच झालेला आहे. सेवादलातल्या मुलांना किंबा तुरुंगातल्या मित्रांना त्यांच्या कोंडाळ्यात बसून सांगितलेल्या त्या गोष्टी आहेत आणि मग ते जशी सांगत असत तशीच ती गोष्ट लिहून काढत असत. त्यामुळे त्यांची लिखित भाषादेखील बोलीप्रमाणे बनली. मराठी लोकवाड्मयातील कहाणीशी जवळीक साधणारी त्यांची भाषा आहे. गुरुजी लोकमानसात साहित्याच्या द्वारा अल्पावधीत पोहोचले त्याला विषयांप्रमाणेच त्यांची ही लोकवाङ्मयाशी नाते जोडणारी लोकभाषाही कारण ठरली आहे. 'हा माणूस आपले जीवन, आपली सुखदु:खे, आपल्याच भाषेत, आपल्यापाशी तादात्म्य पावून अपरंपार सहानुभूतीने रंगवत्तो आहे' असेच त्यांना भावले.
याच उमाळ्याने शिक्षणाच्या क्षेत्रातही गुरुजी वावरले. 'गुरुजी' हे बिरुद त्यांच्याइतके महाराष्ट्रात अन्य कुणीही सार्थ केलेले नाही. तसे अंमळनेरच्या शाळेत शिक्षक म्हणून ते पाच-सहा वर्षेच होते. पण शाळेच्या चिमण्या जगाचा निरोप घेऊन
राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या लढ्यात भाग घेतल्यावरसुद्धा त्यांनी आपली शिक्षकाची भूमिका कधी सोडली नव्हती. समाजशिक्षणाचे कार्य अनेक अंगांनी ते सतत करीतच राहिले आणि महाराष्ट्राचे गुरुजी बनले.
साने गुरुजींच्या व्यक्तिमत्वाचा पिंड हा श्रद्धाशील समर्पणवृत्तीच्या प्रेमळ अशा आर्त भक्ताचाच होता. त्यांनी मानवावर आणि मानवेतर सृष्टीवरही अपार प्रेम केले. प्रेमधर्माचे ते यात्रिकच होते. 'खरा तो एकचि धर्म । जगाला प्रेम अर्पावे' अशा
तर्हेच्या प्रेमधर्माची पताका त्यांनी आयुष्यभर फडकवत ठेवली. गुरुजींनी आपल्या वागणुकीतून, शिकवणुकीतून सर्वत्र प्रेमधर्माची शिकवण दिली. प्रेमाच्या फडाचे ते फडकरीच होते. प्रेमाच्या दिंडीचे ते दिंडीकरच होते. त्यांची हो प्रेमदिडी आपण अशीच पुढे नेऊया!
-----------------------------------------------------------------
सेनानी सानेगुरुजी - राजा मंगळवेढेकर - अनुक्रमणिका
>-----------------------------------------------------------------