२४. महाप्रस्थान -२
-----------------------------------------------------------------
सेनानी सानेगुरुजी - राजा मंगळवेढेकर - अनुक्रमणिका
>-----------------------------------------------------------------
२४. महाप्रस्थान -२
मृत्यू म्हणजे महामाया! मृत्यू म्हणजे महानिद्रा! दररोजच्या धडपडीनंतर आपण झोपतो. झोप म्हणजे लघुमरण. सर्व जीवनाच्या धडपडीनंतर असेच आपण झोपतो. रोजची झोप आठ तासांची, परंतु ही झोप मोठी असते. आईच्या जाऊन झोपणे! लहान मूल दिवसभर खेळते, खिदळते, रडते, पडते, रात्र पदताच आई त्याला हळूच उचलून घेते. त्याची खेळणी
वगैरे तेथेच पडतात. आई त्याला कुशीत घेऊन झोपते. आईची ऊब घेऊन बाळ ताजेतवाने होऊन सकाळी पुन्हा दुप्पट उत्साहाने चेष्टा करू लागते. तसेच जीवनाचे! जगात दमलेल्या, श्रमलेल्या जीवाला ती माता उचलून घेते.
'जन्मदायी माता, भारतमाता आणि विश्वमाता जगदंबा यांनी आजवर माझा सांभाळ केला. आता मृत्युमातेच्या मांडीवर डोकं ठेवून या मातांचा निरोप घेणार! मरण हे उपकारक आहे. जीवनाने जे काम होत नाहो, ते कधी कधी मरणाने होते.
आपल्याला वाटते मरण म्हणजे अंधार परंतु मरण म्हणजे निर्वाण, म्हणजेच अनंत जीवन पेटविणे, मरण म्हणजे अमर आशावाद आहे. मरण म्हणजे पुन्हा नवीन जोमाने, नवीन उत्साहाने ध्येयाची सिद्धता. मरणाची भीती कशाला? निद्रेची भीती नाही मग चिरनिद्रेची काय म्हणून? मृत्युकडे पाहण्याची गुरुजींची अशी असामान्य, काव्यात्म, सौदर्यवादी दृष्टी होती.
'येई ग आई, मज माहेराला नेई!'
अशी त्यांची मृत्युममातेकडे विनवणी होती. ही अशी सर्वस्व समर्पण करून निघून जाण्याची तीव्र वृत्तीच त्यांची होती. तशात काही शारीरिक त्रासही होऊ लागला होता. डोकेदुखी, निद्रानाश, घशाचा त्रास होऊ लागला होता. गुरुजींना वाटे 'ज्या शरीराने इतरांची सेवा करायची त्या शरीराला इतरांकडून सेवा घ्यायची वेळ येऊ नये. असे होण्याआधी हे शरीरच विसर्जित केलेले बरे.'
पंढरपूरच्या उपवासाच्या वेळी अनुभवास आलेली कटुता, असत्यपणा, गांधीजींच्या वधाने पसरलेला अंधार, स्वातंत्र्यप्राप्तीनंतर स्वकीयांशी न्यायासाठी करावे लागणारे संघर्ष. त्यातून उद्भवलेले मनोमालिन्य या सर्वांचाच मिळून परिणाम म्हणजे गुरुजींचे देहविसर्जन होय.
गुरुजींच्या जाण्याने महाराष्ट्रातील बाल तरुणवर्ग पोरका झाला. पण गुरुजींनी त्यांच्यासाठी लिहून ठेवलेले वाङ्मय त्यांना निरंतर प्रेरणा देत राहील.
गुरुजींच्या निधनानंतर अनेक थोरामोठ्यांनी शोक व्यक्त केला. विनोबाजी म्हणाले, 'माझ्याहून ते शरीराने मजबूत व वयाने लहान होते. जेमतेम पन्नास वर्षांचे वय असेल. पण एवढ्यात त्यांनी प्रचंड कामगिरी केली. महाराष्ट्रातील सबंध तरूण पिढी त्यांनी आपल्या विचाराने भारून टाकली. बाळगोपाळांना वेड लावले.'
"रामकृष्ण, रवींद्रनाथ आणि गांधी या त्यांच्या तीन देवता होत्या. तिघांचे अंश त्यांच्या ठिकाणी उतरले होते. 'येता जाता, उठत बसता, कार्य करिता । सदा देता घेता, वदनी वदता, घास गिळता”-- चोवीस तास परमार्थाशिवाय ज्याला दुसरे
चिंतन नाही. असा हा पुरुष होता."
"त्यांचा पिंड राजकारणी नव्हता. पण गरिबांच्या तळमळीने त्यांना राजकारणात पडावे लागे, बोलावे लागे, लिहावे लागे. त्याच तळमळीने त्यांना समाजवादी बनविले पण ते समाजवादी म्हणण्यापेक्षा समाजसेवी होते. त्यांचा विशाल आत्मा सर्वांचे गुण घेणारा होता. भलेपणा जिथे आढळला तिथून त्यांनी तो उचलला."
“साहित्य तर त्यांनी अपरंपार लिहून ठेवले आहे. तरी पण ते स्वतःला साहित्यिक समजत नसत. लिहिल्याशिवाय, बोलल्याशिवाय राहवत नसे, म्हणून ते लिहीत आणि बोलत. दीनांचा कळवळा त्यांच्याकडून साहित्य वदवीत होता.”
“तुकारामादिकांच्या मालिकेत मी त्यांची नि:शंक गणना करतो. त्यांना योग्याची क्षमता लाभली नव्हती. पण त्यांची उत्कट आर्त भक्ती होती. 'परपीडक तो आम्हा दावेदार' अशी त्यांची मनोभूमिका होती. यामुळे राग-द्वेषही त्यांचे प्रबळ होते. पण
ते सारे देवाच्या चरणी वाहिलेले होते.”
“बत्तीस साली धुळे जेलमध्ये त्यांचा-माझा परिचय झाला. पहिल्याच भेटीत गाढ मैत्री अनुभवली. तिला कारण काहीच नाही. अशाच काही अनुभवांवरून मी पूर्वजन्माची सिद्धी करीत असतो. त्यांचा तो स्नेहभाव उत्तरोत्तर दृढच होत गेला. त्यांचा तो माझ्यावर फार मोठा अनुग्रह होता.”
“त्यांच्या मरणावर माझा विश्वास बसत नाही, हे त्यांनी एक नाटक केले आहे, असे मी समजतो.
'अमृतस्य पुत्रः।' ही त्यांची वास्तविक पदवी आहे.”
-----------------------------------------------------------------
सेनानी सानेगुरुजी - राजा मंगळवेढेकर - अनुक्रमणिका
>-----------------------------------------------------------------