२१. मंदिर प्रवेश -२
-----------------------------------------------------------------
सेनानी सानेगुरुजी - राजा मंगळवेढेकर - अनुक्रमणिका
>-----------------------------------------------------------------
२१. मंदिर प्रवेश -२
नंतर या मंदिर प्रवेशाला अनुकूल असणाऱ्या थोरामोठ्यांचे एक 'हरिजन मंदिर प्रवेश मंडळ' स्थापन करण्यात आले. 'हरिजन सेवक संघा'ने या कामी पुढाकार घेतला आणि ७ जानेवारी १९४७ पासून गुरुजींच्या महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात
मुंबई-पुणे येथील विराट सभांपासून झाली. सेनापती बापटही या दौऱ्यात गुरुजींच्या बरोबर होते. 'महाराष्ट्र शाहीर' नामक सेवादलातील कलावंतांचे एक कलापथकही होते. महाराष्ट्राच्या बहुतेक जिल्ह्यातून गुरुजींचा दौरा झाला. रोज अशा ठिकठिकाणी ५-६ प्रचंड जाहीर सभा झाल्या. हजारो स्त्री-पुरुष गुरुजींचे विचार ऐकत असत आणि पाठिंबा देत असत.
सुरुवातीला सेनापती थोडेसे बोलत असत. नंतर गुरुजी बोलत असत. ते म्हणत, “पंढरपूरचे विठ्ठल मंदिर हरिजनांना मोकळे व्हावे म्हणून मी मरायला उभा राहिलो आहे. पंढरपूर म्हणजे महाराष्ट्राचे ह्रदय. महाराष्ट्राच्या जीवनाची किल्ली.
पंढरपूरची कळ दाबली तर महाराष्ट्रभर प्रकाश पडेल, असे मनात आले. पंढरपूर म्हणजे दक्षिण काशी. असे हे प्राचीन मंदिरच देवाच्या सर्व लेकरांना मोकळे व्हावे. अशी माझी इच्छा. पंढरपूरचे मंदिर मी एक प्रतीक मानतो. या रूपाने महाराष्ट्रातील सर्व जीवनांतील अस्पृश्यता नष्ट व्हावी, दुष्ट रूढीची कुलपे गळून पडावी. मी माझ्या प्राणांचे तेल घालण्यासाठी उभा आहे...”
'घ्या रे, हरिजन घरात घ्या रे, घरात घ्या!' असे एक गाणेही त्यांनी करून दिले हेते. अनेक ठिकाणी गुरुजींच्या हस्ते हरिजनांसाठी पाणवठे मोकळे झाले, मंदिरे खुली झाली.
शेवटी १ मे १९४७ रोजी गुरुजी पंढरपुरी पोहोचले. सकाळी वाळवंटात प्रचंड जाहीर सभा झाली. त्या आधीपासून पंढरीत सनातनी मंडळींनी विरोध सभा घेतल्याच होत्या. 'जाव साने भीमापार । नही खुलेगा विठ्ठल द्वार |' अशा घोषणा
दिल्या होत्या. सभेतही सनातन्यांच्या म्होरक्यांनी विरोध केला. गुरुजींनी त्यांच्या आक्षेपाला समर्पक अशी उत्तरे दिली. सभा संपली आणि गुरुजी तनपुरे मठात आले. सकाळपासूनच त्यांचे प्राणंतिक उपोषण सुरू झाले होते.
गुरुजींच्या या अग्निदिव्याने सारा महाराष्ट्र व्यथित झाला होता. अनेक ठिकाणांहून लोक व नेते पंढरपूरला आले होते. दोन्ही बाजूंनी सभा, मिरवणुका चाललेल्या होत्या. उपोषणाचा एकेक दिवस चालला तशी पंढरीतली परिस्थिती गंभीर बनत चालली, वातावरण तापू लागले. सनातन्यांच्या घोषणेला गुरुजींचे तरुण चाहते उत्तर देत होते. “साने गुरुजी करे पुकार । खोलो विठ्ठल मंदिर द्वार ।”
दरम्यान पंढरपूरच्या देवळाचेच व्यवस्थापक बडवे व उत्पात यांचे प्रतिनिधी एका तथाकथित गांधीभक्ताच्या - पुंडलिकजी कातगडे - मध्यस्थीने म. गांधींना भेटले व गुरुजींच्या उपवासाविषयीची विपर्यस्त बातमी गांधीजींच्या कानी घातली.
महाराष्ट्रातल्या व मंत्रिमंडळातल्या काँग्रेस श्रेष्ठींनीही असेच विपर्यस्त सांगितलेले होते. ते ऐकून गांधीजींनी अत्यंत सावध शब्दांत गुरुजींना तार केली, “मला माहीत झालेली वस्तुस्थिती पहाता तुमचे उपोषण सर्वस्वी चुकीचे आहे. पंढरपूरचे मंदिर
हरिजनांना लौकरच खुले होईल. कितीही मोठ्या व्यक्तीने किंवा असंख्य लोकांनी काहीही आक्षेप घेतले तरी आपल्या मोठेपणाने त्यांच्याकडे दुर्लक्ष करावे. कृपा करून उपोषण थांबवा आणि तशी उलट तार करा.”
गांधीजींच्या या तारेमुळे गुरुजींना अतीव दु:ख झाले. वेदना झाल्या. अनेकांनाही हे चमत्कारिक वाटले. पण गांधीजींच्या तारेतील 'मला माहोत असलेली वस्तुस्थिती हे शब्द त्यांनी फार सावधतेने वापरलेले आहेत, हे गुरुजींच्या लक्षात आले. गांधीजींना संपूर्ण सत्य परिस्थिती कळलेली नव्हती. हितसंबंधी मंडळींनी अर्धसत्यच सांगितलेले होते. म्हणून गुरुजींनी ३ मे रोजी गांधीजींना उत्तर धाडले.
“पूज्य बापू, माझ्या निश्चयातील सत्य आणि पावित्र्य प्रायोपवेशनाच्या कसोटीस उतरलेच पाहिजे. आपला सल्ला मला पाळता येत नाही. क्षमा करा. आता स्वतःला सर्वस्वी परमेश्वराच्या हाती सोपविले आहे... स्वप्नात दिलेल्या शब्दांचे पालन करणाऱ्या हरिश्चंद्राच्या भूमीतील आम्ही लोक आहोत. आम्हीही गंभीर शब्दांना थोडेफार मोल दिले पाहिजे... बापू, तुमच्याजवळ अनंत दया आहे. तुमच्या दृष्टीने तुमचे लेकरू चुकत असले तरी ते स्वत:ची वंचना करू शकत नाही. म्हणून तुम्हीही पाठ थोपटा, हेच तुमच्या प्रिय पूज्य चरणांजवळ मागत आहे.”
गुरुजींचे पत्र घेऊन गांधीजींना वस्तुस्थिती सांगण्यासाठी श्री. अण्णासाहेब सहस्रबुद्धे व हरिभाऊ फाटक तातडीने दिल्लीला रवाना झाले. गुरुजींनी मंदिर प्रवेशासाठी दौरा सुरू केला व नंतर उपोषण करणार म्ह्णून त्या वेळच्या काँग्रेस मंत्रिमंडळाने एप्रिलच्या अखेरीस घाईघाईने मंदिर प्रवेशाचे बिल सादर केले होते. त्यावरून कायदा होणारच आहे, मग उपोषण कशाला? असाही प्रचार विरोधक करीत होते. गुरुजींना त्या वेळचे काँग्रेस श्रेष्ठीही तसा सल्ला देत होते पण गुरुजींनी त्यांना नम्रपणे सांगितले होते, “असेंब्लीतल्या कायद्यापेक्षा मला हृदयाचा कायदा श्रेष्ठ वाटतो. सत्या-असत्याशी मन केले ग्वाही. उपोषणाचा एकेक दिवस उलटू लागला तशी गुरुजींची प्रकृती क्षीण होत चालली. चिंतेचे वातावरण सर्वत्र पसरले. काय होणार? हीच काळजी सर्वांच्या मनी दाटली होती,
“अशा परिस्थितीतच त्या वेळच्या मध्यवर्ती कायदेमंडळाचे अध्यक्ष श्री, दादासाहेब मावळंकर हे ५ मे रोजी पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी म्हणून आले होते. पंढरपुरातले स्फोटक वातावरण पाहून त्यांनी चौकशी केली, तेव्हा त्यांना गुरुजींच्या उपोषणाची साद्यंत हकीगत कळली. दादासाहेबांनी लगेच हालचालींना सुरुवात केली. बडवे मंडळींशी वाटाघाटी केल्या, उपलब्ध १९३८चा 'टेंपल अॅक्ट' पाहिला आणि त्यांनी त्यानुसार बडवे मंडळींना समजावून सांगितले. बरीच चर्चा केली. या चर्चेचा परिणाम तरुण बडवे मंडळींवर झाला. त्यांनी बदलत्या काळाची चाहूल हेरली. त्यांनी वृद्धांना बाजूला सारून तडजोडीची भूमिका घेतली. त्यांनी तसे निवेदन न्यायालयात सादर केले. हरिजनांना मंदिर प्रवेश देण्यासाठी
बडव्यांची हरकत राहिली नाही.
दादासाहेबांनी गुरुजींची भेट घेतली व त्यांनाही सर्व कायदेशीर बाजू समजावून दिली. कारण अस्तित्वात असलेल्या कायद्यानुसार मंदिराचे ट्रस्टी बडवे हे गुरुजी म्हणतात तसे मंदिराचे दरवाजे हरिजनांना खुले करू शकत नव्हते, ही वस्तुस्थिती होती. दादासाहेबांनी तीच गुरुजींना सांगितलो व उपोषण मागे घेण्याची विनंती केली. गुरूजींनी सर्व वस्तुस्थिती लक्षात घेऊन मोठ्या नाखुषीने ही विनंती मान्य केली.
दादासाहेबांनी गांधीजींनाही तार करून परिस्थिती कळविली. गांधीजींची परत तार आली, “श्री. मावळंकरांच्या सल्ल्याने काम करावे. त्यानंतर आवश्यक ती कायदेशीर तरतूद झाल्यावर १० मे १९४७ रोजी संध्याकाळी दादासाहेब, मंदिराचे ट्रस्टी, बडवे, उत्पात यांचे प्रतिनिधी सर्वजण गुरुजींकडे आले. दादासाहेबांनी निवेदन वाचून दाखवले आणि उपोषण सोडण्याची विनंती केली. उपोषणकाळात गुरुजींनी श्रीविठ्ठलाचे एक चित्र आपल्याजवळ ठेवले होते. त्या विठ्ठलाला त्यांनी वंदन केले, डोळे मिटून क्षणभर मूक प्रार्थना केली आणि आपल्या वहिनींच्या हातून मोसंबीचा रस घेऊन १० दिवसांचे उपोषण सोडले.
उपोषण सुटल्याची वार्ता कळताच सर्वत्र आनंदाचे वातावरण पसरले. गुरुजींचे प्राण वाचले याचे अपूर्व समाधान सर्वांना झाले. त्याच दिवशी दिल्लीच्या प्रार्थनासभेत गांधीजी म्हणाले,"आज आणखी एक आनंदाची बातमी आली आहे.
पंढरपूरचे पुरातन आणि प्रसिद्ध असे मंदिर इतर हिंदूंप्रमाणेच हरिजनांसाठीही खुले झाले आहे. याचे खास श्रेय साने गुरुजींना आहे. हरिजनांसाठी हे मंदिर उघडावे म्हणून त्यांनी आमरण उपवास आरंभला होता.”
महाराष्ट्रातून अभिनंदनाचा वर्षावच गुरुजींवर झाला!
पंढरपूरचे विठ्ठल मंदिर हरिजनांसाठी खुले केले एवढेच श्रेय गुरुजींना लाभलेले नाही, तर तेराव्या शतकात ज्या सामाजिक क्रांतीचा श्रीगणेशा, महाराष्ट्राचा 'बडा बंडवाला" श्रीज्ञानदेव यांनी केला होता व जी समतेच्या सामाजिक क्रांतीची पावले
पंढरीच्या वाळवंटातच त्या वेळी थबकून राहिली होती, ती समताधिष्ठित सामाजिक क्रांती विसाव्या शतकात साने गुरुजींनी पंढरीरायाच्या चरणापर्यंत पोहोचवली होती. ह्या एका फार मोठ्या कामगिरीचे श्रेयही गुरुजींनाच आहे.
संस्कृतातली ज्ञानभांडारे बहुजनांसाठी मायबोलीत आणण्याचेच केवळ कार्य ज्ञानदेवांनी केले नव्हते, तर भागवत धर्माची आस्थापना करून आध्यात्मिक लोकशाहीचा ध्वजही पंढरीच्या वाळवंटात फडकविलेला होता. अवघे जन सांगाती घेऊन, भेदभावाला तिलांजली देऊन, 'नाचू कीर्तनाचे रंगी' म्हणणाऱ्या नामदेवांसह सर्व संत मंडळी एका ध्वजाखाली एक झाली होती. ज्ञानदेव-निवृत्तिनाथांसह नामा शिंपी तर होताच, पण सावता माळी, गोरा कुंभार, नरहरी सोनार आदी अठरा
पगड जातीतील संतांबरोबर चोखोबा महार, रोहिदास चांभार आणि मुक्ता व जनी हे सर्वजण होते. ज्या शूद्रांना आणि स्रियांना ज्ञानापासून वंचित ठेवले होते, तो ज्ञानाचा हक्क मुक्ता-जनीच्या व चोखोबा-रोहिदासांच्या रूपाने इथे मान्यता पावलेला दिसतो. ही समतेची नांदी गाणारी दिंडी दुर्दैवाने तिथेच थबकली होती. नव्हे नंतरच्या मतलबी धुरिणांनी त्या संतांचा नामगजर करीत त्यांचीच समतेची शिकवण दूर सारलेली होती आणि एखादा एकनाथ, तुकोबा वगळता अन्य धर्मलंड श्रेष्ठींनी समतेच्या दिंडीत पुन्हा विषमतेचे बीजच घुसडून जोपासलेले दिसते. परंतु साने गुरुजींनी आपल्या प्राणाची बाजी लावून पुनश्च त्या संतांच्या समतेच्या उदार शिकवणुकीला उजाळा दिला होता. या दृष्टीने पाहता साने गुरुजींचे महाराष्ट्रातील एक सामाजिक क्रांतिकारक म्हणून श्रेष्ठत्व लक्षात येते.
-----------------------------------------------------------------
सेनानी सानेगुरुजी - राजा मंगळवेढेकर - अनुक्रमणिका
>-----------------------------------------------------------------
Hits: 104