२१. मंदिर प्रवेश - १
-----------------------------------------------------------------
सेनानी सानेगुरुजी - राजा मंगळवेढेकर - अनुक्रमणिका
>-----------------------------------------------------------------
२१. मंदिर प्रवेश - १
पंढरपूर म्हणजे महाराष्ट्राची आध्यात्मिक राजघानी. वारकरी पंथाच्या भागवत धर्माचे प्रेरणास्थान. संतांनी वर्णिलेले भूवैकुंठ विठुरायाची नगरी ! परंतु विठुराया मात्र, शेकडो वर्षे झाली, बडवे आणि धर्ममार्तंड, सनातनी यांच्या कैदेत. तो सकलांसाठी माऊली होऊन उभा राहिला. पण या मंडळींनी त्याला त्याच्याच काही लेकरांपासून तोडले. शूद्रांना अस्पृश्य ठरवून त्यांच्यासाठी मंदिराची दारे लावून घेतली. मायलेकरांची ताटातूट केली. आषाढी-कार्तिकीला इतर लेकरांप्रमाणेच ही विठाई-माऊलीची लेकरेही अनवाणी पायांनी दगडगोट्यांची वाट तुडवीत, शिळ्या भाकरीचे तुकडे पोटात भरीत, मोठ्या भक्तिभावाने विठूनामाचा गजर करीत पंढरीला येत असत. पण तिथे आल्यावर त्यांना देवळात जाता येत नसे. विठाई माऊलीला भेटता येत नसे. तिचे श्रीमुख किंवा चरण दृष्टीला पडत नसत.
कारण ते शूद, हरिजन, अस्पृश्य, मग तळमळत्या अंत:करणाने, देवदर्शनासाठी भुकेजल्या मनाने लांबून, दुरून कुठून तरी देवळाच्या कळसालाच हात जोडायचे आणि जड मनामे, वारी घडली अशा खोट्या समाधानाने गावाकडे परत फिरायचे. जाता-येताना किंवा पंढरीतही कुठे हिंडता-फिरताना कुणा स्पृश्याला, सवर्णाला आपला धक्का लागणार नाही ना, आपला त्याला विटाळ होणार नाही ना, अशी काळजी वहायची, अंग चोरून, मन मारून वागायचे, अदबीने बोलायचे, तुच्छ तुच्छ पशूहून तुच्छ जिणे जगायचे. असे हे वर्षोन्वर्षे चालले होते. देवाच्या नावावर चालले होते. धर्माच्या नावावर चालले होते. धर्मशास्त्राच्या नावावर चालले होते. परंपरा-रूढी यांच्या नावावर चालले होते. माणसांना माणसांपासून दूर ठेवणारा देव आणि धर्म नसतो, तर ती श्रेष्ठत्वाच्या अहंकाराने पछाडलेली स्वार्थी, धर्मलंड माणसेच असतात. खोट्या धर्माचे स्तोम माजविणारे हेच खरे अधार्मिक, नास्तिक भोंदू असतात.
गुरुजींना हरिजन बांधवांवर चाललेल्या ह्या अन्यायाची चीड आली. संताप आला आणि त्यांनी ह्या दुष्ट रूढीविरुद्ध बंड करण्याचे ठरविले. आपले प्राण पणाला लावले. अस्पृश्यतेचा कलंक धुतला जावा म्हणून गुरुजी तर आयुष्यभर झगडत
आलेच होते. पण १९४६च्या नोव्हेंबर महिन्यात निमित्तमात्र अशी एक घटना घडली आणि अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष गुरुजींनी वेधून घेतले. त्यांनी प्राणांतिक उपोषणाचा निर्धार घोषित केला.
घडले होते असे की, खानदेशातील एक कार्यकर्ते श्री. सीतारामभाऊ चौधरी विनोबांकडे गेले होते. त्या वेळी विनोबांच्या मनातही हरिजनसेवेचे विचार चालले होते. विनोबांनी सीतारामभाऊंजवळच गुरुजींसाठी एक पत्र दिले. ११ नोव्हेंबर
१९४५च्या ह्या पत्रात विनोबांनी 'मंदिर प्रवेशाबाबब काम करण्याचे मी सीतारामभाऊंना सुचवले आहे' असे वाक्य होते. 'पुणे करार झाला त्याला १४ वर्षे झाली, या अवधीत हरिजनांसाठी आम्ही किती मंदिरे उघडली, किती विहिरी मोकळ्या केल्या, हरिजनांना किती जवळ घेतले, याचा हिशोब द्याः', असेही एकदा विनोबा म्हणाले होते. गुरुजींच्या मनात ह्या प्रश्नावरून बरीच खळबळ माजून राहिलो होती. ते अत्यंत अशांत, अस्वस्थ होते. तशात श्री. सीतारामभाऊ पंढरपूरला गेले. ते वारकरी होते. मंदिर प्रवेशाच्या खटपटीला लागले. गुरुजींना पत्र लिहिले, “पंढरपूरला मिघून या. तुम्ही आलात तर मला हिंमत चढेल.”
गुरुजी त्या वेळी बोर्डीला होते. सीतारामभाऊंचे पत्र वाचून त्यांच्या मनाची तगमग आणखीनच वाढली. पण पंढरपूरला जाऊन काय करणार? कसले बळ आपल्याजवळ आहे? बडवे मंडळींजवळ का याबद्दल शास्त्रार्थ करीत बसायचे? असे विचार त्यांच्या मनात आले आणि पंढरपूरला न जाता आपण आपले प्राण या कार्यासाठी हातात घेऊन उभे रहावे, असे गुरुजींनी आपल्या वृत्तीनुरूप ठरविले. कार्तिकी दशमीच्या दिवशी त्यांनी आपल्या उपोषणाविषयी वृत्तपत्राकडे एक निवेदन
धाडले आणि ते उंबरगावी आपले बालमित्र डॉ. रामभाऊ जोशी यांच्याकडे आले. दुसऱ्या दिवशी कार्तिकी एकादशीपासून गुरुजींचे पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात हरिजनांना प्रवेश मिळावा, म्हणून प्राणांतिक उपोषण सुरू झाले.
त्याच दिवशी म्हणजे ४ नोव्हेंबर १९४६ रोजी ही बातमी सर्व वृत्तपत्रांतून, गुरुजींच्या पत्रकासह प्रसिद्ध झाली आणि अवघ्या महाराष्ट्रात खळबळ उडाली ! गुरुजींनी पत्रकात म्हटले होते, “आज कार्तिकी एकादशी. प्लेग असला तरी पंढरपूरची यात्रा जमेल. पंढरपूरच्या वारकर््यांत वऱ्हाड-खानदेशाकडील कितीतरी हरिजन वारकरी आहेत. त्यांच्या मुलांची नावे तुळशी, एकादशी अशी असतात. परतु या वारकऱ्यांना त्या समचरणांवर डोई ठेवता येत नाही. समचरण? असे
विठ्ठलाच्या चरणांचे संतांनी वर्णन केले. ते चरण भेदभाव करीत नाहीत. ते सर्वांभूती सम आहेत. परंतु त्या चरणांवर सर्वांना कां बरे डोके ठेवता येऊ नये?“ पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मंदिराच्या व्यवस्थापकांना माझी प्रार्थना आहे की,
त्यांनी देवाजवळ सर्व लेकरांस येऊ द्यावे. तशी त्यांनी घोषणा करावी. तोपर्यंत मी उपवास करीत राहीन.”
“महाराष्ट्रातील हजारो गावांतील बंधू-भगिनींना, तसेच शहरातील बंधू-भगिनींना माझी प्रार्थना की, तुम्ही भराभरा पुढे येऊन ही अस्पृश्यता समूळ नष्ट करा. प्रचंड लाट सर्व महाराष्ट्रभर उसळू दे आणि हे पाप धुऊन जाऊ दे!”
ही वार्ता वाचून सेनापती बापट, अच्युतराव पटवर्धन, एस. एम. जोशी आदी मंडळी तातडीने उंबरगावी पोहोचली, सर्वांचीच गुरुजींच्या मनीची वेदना जाणली आणि त्यांना पाठिंबा दर्शविला. परंतु असे एकदम उपोषण करण्यापूर्वी महाराष्ट्रभर
दौरा करून जनतेला आपले म्हणणे समजावून सांगावे, जनमतही आपल्या बाजूला उभे करावे आणि नंतर प्रसंग पडलाच तर आमरण उपोषण करावे, असा विचार गुरुजींच्या पुढे मांडला! बरीच चर्चा झाली, पण गुरुजी टाकले पाऊल मागे घ्यायला तयार होईनात. मग सेनापतींनीही आपला उपोषणाचा विचार सांगितला तेव्हा मात्र गुरुजी हालले. आपल्यामुळे वृद्ध सेनापतींना क्लेश होऊ नयेत, म्हणून मग त्यांनी प्रचारदौऱ्याची कल्पना मान्य करून त्या वेळचे उपोषण सोडले.
-----------------------------------------------------------------
सेनानी सानेगुरुजी - राजा मंगळवेढेकर - अनुक्रमणिका
>-----------------------------------------------------------------