जपानी भाषा
Following article is small part of language information article. Pleae refer to https://vishwakosh.marathi.gov.in for font images, complete article and info about literature in this language.
जपानी भाषा ही मुख्यतः जपान, रिऊक्यू व ओकिनावा या बेटांची भाषा आहे. भाषांच्या वर्गीकरणात तिला स्वतंत्र स्थान द्यावे लागते, कारण इतर कोणत्याही भाषाकुटुंबाशी तिचा संबंध दाखवता येत नाही. चिनी व जपानी भाषांचा एकमेकींशी दृढ संबंध आहे, ही सामान्यजनांची कल्पना अतिशय चुकीची आहे. तुलनाच करायची झाली तर जपानी ही चिनीपेक्षा मराठीला अधिक जवळची ठरेल.
जपानी भाषिकांची नक्की संख्या उपलब्ध नसली, तरी ती दहा कोटींपेक्षा अधिक असावी.
चीन व जपान यांत कोणताही भाषिक संबंध नसला, तरी फार जुन्या काळापासून त्यांच्यात सांस्कृतिक दळणवळण आहे. चीनची संस्कृती अत्यंत प्राचीन असून जपानने तिच्यातून अनेक गोष्टी घेतल्या आहेत. अनेक चिनी वाक्प्रचार आणि शब्द जपानीने घेतले आहेत. चिनी भाषेचा संपर्क होईपर्यंत जपानीला स्वतःची लिपी नव्हती ती तिने चीनकडून घेतली. पण चिनी ही शब्दचित्रणात्मक लिपी आहे. चिनी भाषेत शब्दाला कोणताच विकार होत नसल्यामुळे ही शब्दचित्रे जशीच्या तशी वापरता येतात. याउलट जपानी ही विकारयुक्त भाषा असल्यामुळे शब्दाला होणारे विकार दाखविल्याशिवाय तिचे चालत नाही. म्हणून चिनी लिपी स्वीकारल्यानंतर काही काळाने पन्नास ध्वनिदर्शक अक्षरे त्यातून तयार करण्यात आली. त्यांत पंचवीस इतर चिन्हांची भर घालून ही संख्या पाउणशेवर नेण्यात आली.
जपानी ध्वनिपद्धतीकडे पाहिल्यास या चिन्हसंख्येचा खुलासा होईल.
ध्वनिविचार : जपानी भाषेत आ, इ, उ, ए, ओ हे स्वर (ऱ्हस्व व दीर्घ) आणि क, ग, त, द, प, ब हे स्फोटक न, म ही अनुनासिके तालव्य च, ज, व दंत्य ०च, ०ज हे अर्धस्फोटक फ, स, झ, श हे घर्षक र हा कंपक य, व हे अर्धस्वर आणि ह हा महाप्राण ही व्यंजने आहेत. यांतील ग, द, प, ब, ज, ०ज, झ ही व्यंजने वाक्यारंभी येत नाहीत.
वरील पाच स्वर व्यंजनांनंतर येऊन जे अवयव बनतात, त्यांना ध्वनिचिन्हे देण्यात आली आहेत. पाच स्वरचिन्हे आणि ती क, ग, त, द, न, प, ब, म, स, झ, र, य, व, ह या व्यंजनांना लागून होणारी अवयवचिन्हे यांनी जपानी लिपी बनलेली आहे. प्रत्यक्षात बि, वु, वे हि चिन्हे नसल्यामुळे एकंदर अक्षरे बहात्तरच आहेत. शिवाय इ किंवा उ पुढे आल्यानंतर काही व्यंजनांत परिवर्तन होते. उदा., स + इ = शि, ह +उ = फु इत्यादी.
रूपविचार : जपानी व्याकरणानुसार शब्दांचे तीन वर्ग आहेत. विकाररहित वर्गात नाम, सर्वनाम व संख्यावाचक येतात, विकारयुक्त वर्गात क्रियापद, विशेषण व क्रियाविशेषण येतात आणि अव्ययवर्गात शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय व उद्गारवाचक येतात.
नाम : नामाला लिंग किंवा वचन नसते. तोरी या शब्दाने कोंबडा, कोंबडी, कोंबडे, कोबड्या यांपैकी कोणताही अर्थ व्यक्त होतो. निश्चित अर्थासाठी संदर्भ लक्षात घेणे आवश्यक असते. अनेकवचन व्यक्त करणे अपरिहार्य झाल्यास काही प्रत्यय वापरले जातात. रा, दोमा किंवा तोमो, शु किंवा शू, दाची किंवा ताची आणि गाता हे ते प्रत्यय आहेत. यातला रा हा सामान्य दर्जाच्या माणसाला लागणारा प्रत्यय असून गाता हा अत्यंत प्रतिष्ठा दाखवणारा आहे.
नामांना विकार होत नाही. पण वाक्यातले त्यांचे कार्य त्यांच्यानंतर येणाऱ्या काही शब्दांनी दर्शविले जाते. उदा., गा हा कर्तृवाचक शब्द आहे. वो हा कर्मवाचक आहे. उशी ‘गाय’, इनु ‘कुत्रा’, मिरू ‘पहा’ उशि गा इनुवो मिरू ‘गाय कुत्र्याला पहाते’ इनु गा उशि वो मिरू ‘कुत्रा गाईला पहातो’. नो हा स्वामित्वदर्शक शब्द आहे. तारो नो होन ‘तारोचे पुस्तक’.
सर्वनाम :वाताकुशि ‘मी’, आनाता ‘तू’, आनो हितो ‘तो’, ‘ती’. याचे अनेकवचन व इतर कार्य नामाप्रमाणेच होते.
विशेषण : विशेषणाच्या अंती आइ, इइ, उइ किंवा ओइ येतात. ते क्रियापदाप्रमाणे विकारयुक्त होऊ शकते. योइ ‘चांगला’ यापासून इनु गा योइ ‘कुत्रा चांगला’, इनु गा योइ देसु ‘कुत्रा चांगला आहे’.
क्रियाविशेषण : स्वतंत्र क्रियाविशेषणे थोडी आहेत. नाम, विशेषण, क्रियापद यांचाच त्यासाठी बऱ्याच वेळा उपयोग करण्यात येतो.
क्रियापद : क्रियापदे तीन प्रकारची आहेत : स्वरान्त, व्यंजनान्त व चिनीतून घेतलेली. स्वरान्त क्रियारूपांच्या शेवटी (इ) रू किंवा (ए) रू हा प्रत्यय येतो. तो काढला म्हणजे क्रियाधातू मिळतो. मि (रू) ‘पहा’, ताबे (रू) ‘खा’ व्यंजनान्त धातूला उ हा प्रत्यय असतो. काकु, धा. काक् ‘लिहि’. चिनी क्रियापदे चिनी भाषेतून घेतलेली असून ती जशीच्या तशी ठेवून त्यांना सुरू ‘कर’ याची रूपे जोडली जातात : केङ्क्यू ‘अभ्यास’, केङ्क्यू सुरू ‘अभ्यास कर’.
धातूला मासु हा प्रत्यय लावून आदरदर्शक रूप तयार होते. मि ‘पहा’ याचे सामान्य वर्तमानकाळाचे रूप मिरू आहे, तर आदरदर्शक मिमासु आहे. मासूची इतर रूपे अशी : भूतकाळ माशिता, प्रथम भविष्य माशो, द्वितीय भविष्य माशितारो, प्रथम संकेतार्थ मासुरेबा, द्वितीय संकेतार्थ माशितारा, हेतुवाचक माशिते. मि ‘पहा-’ची वरील काळांची सामान्यरूपे अशी : मिरू, मिता, मियो, मितारो, मिरेबा, मितारा, मिते.
कोणत्याही कर्त्याबरोबर एका विशिष्ट काळात क्रियापदाचे रूप तेच रूप न बदलता वापरले जाते.
काही क्रियापदे अनियमित आहेत.
संख्यावाचक : जपानी भाषेत एकपासून दहापर्यंत संख्यावाचके आहेत. पण त्यांच्याबरोबर चिनी संख्यावाचकेही वापरली जातात. दहाच्या पुढे मात्र चिनी संख्यावाचकेच आहेत. पहिली दहा संख्यावाचके अशी (कंसात चिनी) : १ हितो (इचि), २ फुता (नि), ३ मि (सान्), ४ यो (शि), ५ इचु (गो), ६ मु (येकु), ७ नाना (शिचि), ८ या (हाचि), ९ कोकोनो (कु), १० तो (जू). शक्य तिथे मिश्र संख्यावाचकेही आहेत. अकरा = जपानी १० चिनी १, नव्वद = जपानी ९ चिनी १० इत्यादी.
नकारार्थ : क्रियापदांच्या अंत्य उ च्या जागी आ ठेवून पुढे नाइ लावून नकारवाचक रूप सिद्ध होते. रू कारान्त क्रियापदात रू च्या जागी नाइ येतो. विशेषणात अंत्य ई च्या जागी कु व शेवटी नाइ येतो.
वाक्यरचना : वाक्यात सर्वांत आधी कर्ता, नंतर अप्रत्यक्ष कर्म, प्रत्यक्ष कर्म, साधन व शेवटी क्रियापद येतात.
काही वाक्ये : तेगामि वो काकिमाशिता. ‘मी पत्र लिहिलं’. आशिता आनाता वा तोक्यो ये युकिमासु का ? ‘उद्या तुम्ही टोकिओला जाणार का?’. चुकु नो उए नि एंपि ०चु ग आरिमासुरेबा मोत्ते किते कुदासाइ. ‘टेबलावर पेन्सिल असली, तर ती जरा इकडे आण’. इमा वा आमे ग फुरिसो देसु. ‘आता पाऊस पडेलसं दिसतं’. ताकेओ सान वा होन वो योंदे इमासु. ‘श्री ताकेओ पुस्तक वाचत आहेत’.
संदर्भ : McGovern, W. M. Colloquial Japanese, London.
कालेलकर, ना. गो.
Hits: 148