रेल्वेचा प्रवास भाग - १
बँगलोर - पुणे प्रवासामध्ये अनुभवलेल्या काही आठवणी.
----------------------------------------- वैभव मालसे, बंगलोर
रेलवे पकडणं ही एक अवघड गोष्ट आहे हे विधान सर्वांसाठी खरं असावं.तिकिट काढल्यापासून प्रवासाचा दिवस येईपर्यंत मन अस्थीर असतं. उशिर झाला तर बस रस्त्यावर अडवणं शक्य आहे,रेलवेचं तसं नाही.ऐकायला तितकसं योग्य वाटत नसलं तरी ,कुठेना कुठे तरी सर्वांच्या मनामध्ये हाच विचार चालू असतोच.प्रवासाचा दिवस जसजसा जवळ येतो तसतशी माझी झोप कमी होते.मला मी कसा रेलवे स्टेशनवर वेळेवर पोहोचतो आणि रेलवे पकडतो हीच चिंता असते.तो दिवस आला.सुरुवात झाली ती रिक्शा पकडण्यापासून.रिक्शावाले अशा गडबडीच्यावेळी मनात येईल तो आकडा सांगतात.अशावेळी सर्वात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची असते ती म्हणजे ,आपल्याला या रिक्शाची गरजच नाही असा चेहर्यावर भाव आणायचा.तडजोड करण्यामध्ये बायका खूप सरावलेल्या असतात.माझ्या बायकोने ते काम छान प्रकारे पार पाडलं.शेवटी रिक्शावाला खाली आला.
बँगलोरमध्ये संध्याकाळी प्रवास करणे म्हणजे मरण.वेळेवर पोहोचायचं असेल तर १ तास आधी निघाल्याशिवाय गत्यंतर नाही.रिक्शा रस्त्यावरून कधी भिरभिरत, कधी रांगत रेलवे स्टेशनवर पोहोचली.शहरांचं वातावरण वेगवेगळं असलं, तरी रेलवे स्टेशनचं वातावरण प्रत्येक शहरामध्ये सारखंच असतं.काही लोक सैरावैरा धावत होते,काहीजण बाकड्यावर निवांत वाट बघत बसले होते, काहीजण जणू आपण कधी परतणारच नाही असा चेहरा करून बसले होते,काहिंनी मोबाईलचं खेळणं केलं होतं,काही खात होते,काही बाळं रडत होती, काही जण हमालाबरोबर वाद घालत होते,काही जण कचरा वाढवत होते आणि काहीजण सफाई करत होते.थोडक्यात प्रत्येकजण आपल्याच कामात गुंतलेला होता.दर थोड्यावेळाने तीन भाषांमध्ये येणार्या आणि जाणार्या गाड्यांची माहिती देण्यात येत होती.ह्या असल्या गोंधळाच्या वातावरणात मी रेलवे फलाटावर प्रवेश केला.रेलवे कुठल्या फलाटावर उभी रहाणार हे विचारण्यासाठी मी दारावरच उभ्या असलेल्या 'टिकिट चेकर' ला त्रास दिला.त्रास दिला म्हणजे त्याने तो करून घेतला.हिंदी ऐकून कन्नड लोक का वैतागतात माहीत नाही,पण मला हा अनुभव बर्याच ठिकाणी आला आहे.माझा प्रश्न ऐकून त्याने 'आएगा' इतकच उत्तर दिलं.इतक्याने समाधान न झाल्याने मी विचारलं 'कहा आएगा?' तो 'प्लँटफाँर्म नंबर वन'. मी मागे पाहिलं तर, आधिच एक रेलवे तिथे उभी होती.कुतुहलाने मी विचारलं 'यहा तो रेलवे है,तो इसके पिछे आएगा क्या ?'तो 'याही आयेगा'हे ऐकून मी शांत झालो.पण बायको हे उत्तर मान्य करायला तयारच नाही.म्हणुन मी परत 'कब आयेगा?' तो 'ये जायेगा, वो आयेगा,छे बजे'तेव्हा कुठे वातावरण शांत झालं.मी जरा चांगलीशी जागा बाघितली आणि सामान ठेवलं.
आजुबाजूचं विश्व आपल्याच धुंदीत होतं.थोड्याच वेळात तीनही भाषांमध्ये आमची रेलवे येण्याचं सांगण्यात आलं आणि काही क्षणमध्येच फलाटावरचं वातावरण बदललं.शांत वाटणारे लोक जलद जतीने हालचाली करू लागले, आया पोरांचं रडं बाजुला ठेवून,जे काही पसरून ठेवलं आहे ते गुंडाळू लागल्या, लोकांनी सिगरेटी विझवल्या,पुड्यांचा फडशा पाडला, गटागट चहा पिण्यास सुरुवात झाली, असह्य बडबड आणि त्यामुळे होणारा गोंगाट सुरू झाला.जसजशी रेलवे जवळ येवू लागाली,तस तसे काही लोक आपला डबा कुठेतरी दुसरीकडेच थांबतो आहे, हे लक्षात येवून सामानाचा जडपणा जराही जाणावू न देता पळू लागले.वास्तविक बँगलोर रेलवे स्थानकावर सर्व ठिकाणी 'टि.व्ही सेट' लावले आहेत जेथे येणार्या गाड्यांची माहिती अगदी उत्तम प्रकारे दाखवली जाते, तसेच कोणता डबा कोठे थांबणार हे देखील ठिकठिकाणी लावलेल्या फलकांवरून सहज लक्षात येतं.तरीसुद्धा काही लोकांच्या स्वभावातच असतं हे,आधी विड्या फुंकत बसायचं आणि नंतर धावपळ.असो, सुदैवाने आम्ही योग्यजागी उभे होतो आणि आमचं मोजकच आणलेलं सामान उचलून आम्ही डब्यात शिरलो.
डब्यामध्ये चालण्यासाठी एक चिंचोळा बोळ होता, सामान उचलून आम्ही कसे-बसे चालू शकत होतो.तेवढ्यात एक भयंकर वैतागलेली बाई उलटी येताना दिसली.बोलण्यावरून असं लक्षात आलं की ती चुकिच्या डब्यात शिरली होती. सर्वानी तिला खूप विरोध करण्याचा प्रयत्न केला , पण तिच्या आकारमानापुढे सगळ्यांनी हार मानली आणि तिला जाण्यासाठी रस्ता दिला.मी माझ्या जागेवर गेलो आणि सामान सुरक्षित ठिकाणी ठेवलं.मला रेलवे मध्ये सामान चोरीला जाण्याचा नाही अनुभव नाही, पण बाकिचे लोक सामनाला चेन आणि कुलपं लावत होते.आता माला एक प्रश्न नेहमी पडतो तो, रेलवे मध्ये जी 'चेन खिचिये और गाडी रोकिये' सोय असते त्या बद्दल.साधारणपणे, आपण गाडीमध्ये चोरी झाली
असं लक्षात आलं, तर त्याचा उपयोग करतो.पण चोर जो, चालत्या गाडी मधून पळून जावू शकत नाही त्याला आपण गाडी थांबवून , पळण्यासाठी मदत करतो,नाही का ? त्यामुळे यामध्ये काहीतरी बदल करावा हे नक्की.आता इंजिनचा आवाज सुरू झाला आणि थोडा वारा खेळू लागला. लोक स्थिरावू लागले,आणि प्रत्येक डब्यातून असंख्य प्लास्टीकच्या पिशव्या वाजायला सुरुवात झाली.ह्या 'सेकंड क्लास' मध्ये लोक गप्पा , खाणं आणि झोप याखेरीज काहिही करत नाहित. फारच थोडे लोक असतात जे पुस्तकं वाचतात.माझी बायको त्यातलीच, तिने एक जाड-जुड पुस्तक बाहेर काढलं आणि त्यात नाक खुपसलं. मी, लहानपणापासूनच पुस्तकेतर गोष्टींमध्ये ज्यास्त आवड असल्यामुळे , त्या रद्दीचं ओझं कधीच बरोबर ठेवत नाही.इकडे बायको वाचत होती आणि समोरचं विश्व खात होतं.माझ्यासमोर खिडकितून बाहेर बघत बसण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता.मी बाहेर बघत वेळ घालवण्याचा प्रयत्न सुरू केला. 'चाय-काँफीऽऽऽ'माझा वेळ घालवण्यासाठीच की काय माहित नाही ,पण आता एकेका फेरीवाल्याने आमच्या डब्यामध्ये प्रवेश करण्यास सुरुवात केली. चहा पिण्यासारखा दुसरा चांगला 'टाइम-पास' नाही. चहामध्ये थोडा चहा घातला असता तर त्या गरम पाण्याला चहाची चव आली असती.पण पायाखालची जमीन सरकत असताना मला असली तक्रार करून चालणार नाही,म्हणून मी पूर्वी एकदापुण्यामध्ये प्यालेल्या अमृततुल्यची आठवण करत तो चहा पिउन टाकलारेलवे प्रवासामध्ये एक गोष्ट सर्वांनी अनुभवली असेल,सुरुवातीला कोणीच बोलत नाही , कदाचित बघत पण नाहीत एकमेकांकडे.आपल्याच नादात काही तरी करत असतात. आपल्या कुटुंबापुरतं बोलणं,खाणं चालू असतं.आमच्या डब्यात पण तो बांध अजून फुटायचा होता.