रेल्वेप्रवासातील मजेशीर किस्से भाग - ३
हवाईदलातील कार्यकाळात घडलेले रेल्वेप्रवासातील मजेशीर किस्से भाग - ३
लेखकः विंग कमांडर (नि) शशिकांत ओक. मोः ०९८८१९०१०४९.
चुकीच्या वॉरंटचा घोळ!
नवी दिल्ली जवळ फरीदाबादच्या एअर फोर्स स्टेशनमधून तांबरमला पोस्टींगवर जायला सर्व सामानाची बांधाबांध करून आम्ही तयार झालो होतो. संध्याकाळच्या जीटीचे रिझर्वेशन झालेले. त्याच दिवशी नेमका इतका भयंकर धोधो पाऊस सुरु झाला की थांबायचे नाव काढेना. सामान घेऊन जाणारा ट्रक मथुरा रोडवर अडकून पडलेला. आयत्या दुसरा छोटा ट्रक मिळाला. तो आला तेंव्हा दुपारचे २ वाजलेले. फियाट गाडी त्यात मावेना. तिची मागची बाजू ट्रकच्या बाहेर आलेली. पावसाच्या धारात उरलेले सामान कसेबसे ठासून त्यावर टार्पोलिनने करकचून बांधून ट्रक रवाना झाला. त्यातच ५ वाजले. नवी दिल्ली स्टेशनवर आम्हाला पोचवायला एक बसभरून साथिदार जमलेले. पावसामुळे बँक बंद त्यामुळे बरेच पैसे जवळ. बसमधून बरोबरचे सामान उतरवून घेण्याला माझा जुनियर फ्लाईंग ऑफिसर चार्लस थॉमस हिरीरीने कामाला लागला. मी वॉरंट एक्सचेंज करायला तिकिटाच्या खिडकीत हात घातला. तर ते परत मला देत फरमाईश झाली, ‘हे वॉरंट चालणार नाही. कारण त्याच्या वरची तारीख चुकीची आहे. नवे आणा नाहीतर पैसे भरून तिकिट विकत घ्या’. झाले. वादविवाद करण्यात वेळ घालवण्यात अर्थ नव्हता. मी परत सौभाग्यवतींकडून झटपट दहा हजाराची एक गड्डी घेऊन निघालो. त्या काळात एसी क्लासचे तिकिट काढायला संपूर्ण १० प्लॅटफॉर्म ओलांडून जावे लागे. तोवर गाडी प्लॅटफॉर्मला केंव्हाच लागलेली. क्यू तोडून मी तिकिट विकत घेतले. पाऊस थांबण्याचे नाव नव्हते. रस्ते निसरडे. शूजमधे पाणी जाऊन ते मणामणाच्या ओझ्याचे झालेले. आयुष्यात प्रथम वाटले की आज गाडी चुकणार. थकवा इतका आला होता. घरच्यांचे चेहरे आठवले. आत्ता पाय लटपटून चालणार नव्हते. एकदम उत्साह वाटला. पावले झपझप टाकत मी धावलो. तिकडे गार्डने हिरवा झेंडा दाखवला व मी थॉमसच्या हाती ते वॉरंट ठेवले व कोणी गलती केली ते शोधायला सांगितले. मी गुड बाय करून हात हलवत असताना एक वयस्क बाई गाडीत शिरु लागल्या. त्यांना मी हात देऊन वेळेवर आत ओढले. त्यांचे सामान कुलीकडून घेतले. त्यांचा समाधानाचा चेहरा पाहून मला त्या दिवशीच्या कष्टांचे चीज झाले असे वाटले. पुढे वॉरंट लिहिण्यातील चुकी बद्दल दिलगिरी व्यक्त करणारे कमांडिंग ऑफिसरचे पत्र मला आले. अर्धी बाहेर लटकलेली कार व अन्य सामान व्यवस्थित तांबरमला मिळाले.
नव्या वेळापत्रकाचा फटका!
जळगावच्या सासुरवाडीचा पाहुणचार घेऊन आम्ही पत्नीसह पुण्याला परतत होतो. संध्याकाळच्या ७।। च्या महाराष्ट्र एक्सप्रेसचे रिझर्वेशन झालेले. जावईबापूंचा वेळेवर पोहोचायचा खाक्या माहित असल्याने सासूबाई आधीच धास्तावलेल्या. रिक्षेतून सामान काढेपर्यंत गाडी आल्याची घंटा झालेली. सामान बरेच होते. गाडी येऊ थांबली तरी मी दुसरी खेप करत होतो. इकडे मुले, पत्नी आत चढले. मी चालती गाडी पकडली तेंव्हा सासूबाईंचा जीव भांड्यात पडला.
तो दिवस होता १ ऑक्टोबर. नवे टाईमटेबल त्याच दिवसापासून अमलात आल्याने महाराष्ट्र एक्सप्रेस २०-२५ मिनिटे आधी पोचली होती. त्यावेळी कॉम्प्युटराईज्ड तिकिटे नसल्याने वेळेतील बदल समजणे शक्य नव्हते. असो.
प्रवासात भेटलेले प्रकाशक!
एक ग्रहस्थ छातीवर पुस्तक ठेऊन समोरच्या बाकावर झोपले होते. त्यांच्या छातीवरील पुस्तक अलगद घेऊन मी वाचायला लागलो. नंतर त्यांच्याशी ओळख झाली. गप्पात त्यांनी त्यांच्या अनेक प्रकाशक मित्रांची जवळीक वर्णन केली. पैकी एक होते इस्लामपुरच्या मनेकामना प्रकाशनाचे आनंद हांडे! त्यांनी अनेक पुस्तके छापली आहेत. त्यांची खपवायची पण हातोटी चांगली आहे. असे त्यांनी आवर्जून सांगितले. पुढे हांड्यांशी मी पत्रव्यवहार केला व त्यांनी माझी “अपछाय़िता उर्फ अंधार छाया” ही सत्य घटनेवर आधारित कादंबरी प्रकाशित केली. खपवली. आज तिच्या प्रती बाजारात उपलब्ध नाहीत. नव्हे एकुलती एक प्रत मी दुसऱ्या आवृत्तीसाठी बाळगून आहे. आश्चर्य असे की आज पर्यंत मी त्या प्रकाशकांना प्रत्यक्ष कधीच भेटलेलो नाही!
अशीच एक भेट रेल्वे प्रवासात मनमाडला डॉ अनिल फळे यांची. त्यांनी नाडी ग्रंथ भविष्यावर त्यांच्या दिवाळी अंकासाठी लेख आग्रहाने मागितले नंतर काही त्यांनी छापले. मात्र ते बाड नंतर नितिन प्रकाशनच्या गोगट्यांना भावले. आज नाडी ग्रंथ भविष्य पुस्तकाच्या ४ आवृत्त्या निघाल्या.
या शिवाय मे महिन्याच्या रणरणत्या उन्हात तान्ह्या चिन्मयला घेऊन अंबाल्याच्या स्टेशनवर मी अचानक उतरून दुसरी एसीट्रेन पकडण्याचे केलेले धाडस! झाशी–कानपूर रात्रीच्या प्रवासात फर्स्टक्लासच्या कूपेत वरच्या बर्थवर सुरे घेऊन बसलेल्या टारगट पोरापोरींचे फाजिल चाळे! सांगलीच्या स्टेशनवर अपरात्री महालक्ष्मी एक्सप्रेसच्या गार्डच्या डब्यातून खाली उतरल्याने घरच्यांची उडालेली झोप!
असे अनेक प्रसंग आठवून मजा वाटते. हे सर्व घडायला माझी हवाईदलातील कारकीर्द कारणभूत होती. त्या शिवाय असे थ्रिल कसे अनुभवायला मिळाले असते?
Hits: 462