साधनेच्या सात पायऱ्या
साधनेच्या सात पायऱ्या
श्रीमती सीमाताई रिसबूड. औरंगाबाद.
भ्रमणध्वनी-९४२१८८५६५८.
भगवंताने भगवत् प्राप्तीसाठी जीवाला क्रियाशक्ती, ज्ञानशक्ती व भावशक्ती या तीन शक्ती दिल्या. या शक्तींमुळे जीवाचे ज्ञानमार्गी, भक्तिमार्गी, कर्ममार्गी असे परिवर्तन होते. या परिवर्तनासाठी काहीजण साधनेच्या सात पायऱ्या चढत प्रवास करतात, तर काही जण विहंगमार्गे आत्मज्ञान प्राप्त करुन घेतात. प्रस्तुत लेखात साधनेच्या सात पायऱ्यांचा विचार मांडला आहे.
१. संयोगाचा त्याग व वियोगाचा स्वीकार- इंद्रियांचे गुलाम झाल्याने काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या विषयांशी संयोग होतो. पुढे हे आकर्षण तीव्र होते. संसार, देह व जग ही या आकर्षणाची तीन माध्यमे असतात. शब्द, स्पर्श, रुप, गंधांनी मिळणारे सुखच नित्य सत्य आहे. असा भ्रम निर्माण होतो. एखाद्या अकस्मात घटनेने हे सुख शाश्वत नाही याची जाणीव जीवाला होते, व विषयापासून सुटका करुन घेण्याचा प्रयत्न सुरु होतो, व त्याला अद्वैत ग्रंथ व सदगुरु मार्गदर्शन करतात. साधनेची पहिली पायरी म्हणजे विषयांचा वियोग व भगवत् प्राप्तीचा संयोग ही होय. संत तुकाराम म्हणतात, ‘समचरण दृष्टी विटेवरी साजिरी। तेथे माझी हरि वृत्ती राहो। आणिक न लगे। मायिक पदार्थ॥’ साधकाच्या मनातील मायिक पदार्थांचे आकर्षण व तीव्र इच्छा संपावी. इच्छेचे पेट्रोल संपले की, भोगरुपी संसाराची गाडी बंद पडतेच. साधकाचे विषय संयोगाचे आकर्षण संपते व परमात्म स्वरुपाशी त्याचे मन जोडले जाते.
२. संयम किंवा दृढ निश्चय- संशयरहित ज्ञान म्हणजे निश्चय दासबोध दशक १ समास १ मध्ये परमार्थ प्राप्तीसाठी १५ निश्चय समर्थ सांगतात. विषयांच्या आकर्षणामागे धावणारी तीव्र इच्छा व वृत्ती आवरणे म्हणजे संयम होय. संयमाने नैसर्गिक शक्ती व आत्मिक बळ वाढते. संतुलीत वर्तन होते. इंद्रियांवर नियंत्रण राहते. आळस व विकार नष्ट होतात. संयमाने सत्ता, संपत्ती, सामग्री, सहवास, सामर्थ्य, आसक्ती यांना दूर ठेवता येते. संयम मनाचा, इंद्रियांचा व वाचेचा हवा. ‘मना सज्जना भक्तिपंथेची जावे।’ हा मनाचा, ‘नको रे मना काम नाना विकारी।’ हा इंद्रियांचा व ‘न बोले मना राघवेविण काही।’ हा वाचेचा संयम आहे. भूतकाळ, भविष्यकाळाचे चिंतनही संयमामुळे टाळता येते. यासाठी साधकाने सावध, साक्षेपी, दक्ष रहावे. आपल्याला दुर्लभ नरदेह परमात्म्याने एका निश्चित समयापर्यंत दिला आहे, त्यात एक क्षणही आयुष्य जास्त मिळत नाही हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे. शास्त्रवचन, ईशवचन, संतवचन यात आपले आयुष्य व कर्म बांधून ठेवावे त्यामुळे मायेच्या विळख्यातून आपण सुटतो व भगवत् प्राप्तीकडे वाटचाल सुरु होते.
३. संयोजन किंवा व्यवस्थापन- विषयांचे आकर्षण संपले, संयमाच्या बंधनात रहाता आले तर साधनेचे संयोजन लागते, आपले आयुष्य ब्रह्मचर्य, गृहस्थाश्रम, वानप्रस्थ व संन्यासाश्रम या चौकटीच्या नियोजनात असते यात प्रत्येक आश्रमाच्या वेळेत त्याग आहे व दुसऱ्यांना जागा मोकळी करुन देणे आहे. प्रपंचातही वेऴेचे, पैशाचे, कामाचे नियोजन करावे लागते, त्यामुळे कमी वेळात, कमी श्रमात जास्त काम होते. त्यागामुळे आलिप्तपणा येतो, उपाधी शिवाय राहू नये पण उपाधीत सापडू नये या गोष्टी जमतात. बिभिषणाने भावाचा, बळीराजाने गुरुचा, भरताने राज्याभिषेकाचा त्याग केला. सिंहासनावर श्रीरामाच्या पादुका ठेऊन अलिप्तपणे राज्य सांभाळले. साधनेच्या संयोजनामुळे परमार्थिक प्रगती वेगाने होते.
४.संबंध- जीवनात देहसंबंध व जगतसंबंध येतात. आणि साधनेच्या शेवटी दोन्ही परमात्म्यात विलीन होतात. शरीर सुद्धा प्राकृतिक स्थूल शरीर व शरीरातील आत्मचैतन्य या दोन संबंधात असते. यात प्रकृती जड आणि आत्मा चेतन असतो. देह एक साधन आहे, त्याला बालपण, तारुण्य, वृद्धपण, व्याधी हे विकार आहेत, तो पंचमहाभूतांचा आहे व मृत्यूनंतर त्यालाच अर्पण करायचा आहे हे सत्य कळले की देहावरचे ममत्व व आसक्ती नष्ट होते, संबंध सुटतो. जग आज आहे, उद्या नाही ते ही पंचमहाभूतांचे आहे, त्याला प्रलय आहे हे सत्य कळले की जगत् सत्यत्व भ्रम नष्ट होतो. हा संबंध जबरदस्तीने, तुसडेपणाने तोडू नये, जगात राहून व देह सांभाळून हे दोन्ही म्हणजे ‘मी नाही’ हा निश्चय सांभाळावा.
५.समय- जीवाला जन्म येतो तेव्हा तो अव्यक्तातून व्यक्त स्वरुपात प्रकट होतो. दृश्यामध्ये क्षणाक्षणाला बदल घडवून आणणारी शक्ती म्हणजे काल होय. कालाचे तोंड नेहमी विनाशाकडे असते. जीव कालाच्या बंधनात राहतो. जन्म केव्हा, कुठे, कसा होईल हे त्याच्या हातात नसते. मृत्यू केव्हा कुठे कसा हे पण त्याच्या हातात नसते. दुर्लभ देह निरोगी, सुंदर, कुरुप, काळा, गोरा कसा मिळेल हे ही त्याच्या हातात नसते या सत्य गोष्टींचा विचार करत नसल्यामुळे जीवाला मी कर्ता मी करीन मी भोक्ता हे भ्रम निर्माण होतात. माणसाच्या कर्तृत्वाच्या घमेंडीला मृत्यू हा जबरदस्त उतारा आहे. माणसाच्या आयुष्यात जन्मकाल व मृत्यूकाल याला फार महत्व आहे. उत्तम मरण येण्यासाठी जन्मभर भगवंताचे अनुसंधान टिकवावे व सतत वर्तमानात जगावे. आहे ते अनुसंधान टिकवावे, व सतत वर्तमानात जगावे. आहे तो क्षण आपल्या हातात आहे म्हणून समर्थ म्हणतात, ‘रिकामा जाऊ नेदी एक क्षण, वाया जाऊ नेदी एक क्षण’ साधनेच्या सातत्यासाठी ‘दिसामाजी काही तरी ते लिहावे। प्रसंगी अखंडीत वाचीत जावे॥’ ही गोष्ट महत्त्वाची आहे.
६.संतशरण- संत आध्यात्मिक मार्गदर्शक असतात. त्यांनी भगवत् तत्त्वाला स्पर्श केलेला असतो. विषय संयोगाचा त्याग, संयम, संयोजन, संबंध, समय या पाच गोष्टी स्विकारल्यावर शरणागतीला वेळ लागत नाही. संतांची भेट, संतांचा सहवास, संतांची सेवा, संतांची कृपा शरणागतीनंतर होते. या गोष्टी स्थिर झाल्या की, भावशक्तीचे समर्पण होते. भगवंत आहेच, माझ्यात आहे व चराचर सृष्टीत आहे या निश्चयालाच भाव म्हणतात, तुकाराम महाराज म्हणतात, सत्य तू ,सत्य तू , सत्य तू , विठ्ठला शरणागतीत मी, माझे, माझे शरीर, अहंकार या पैकी काहीच राहात नाही. ममत्व, आसक्ती, इर्ष्या, आकांक्षा, हवेपणा, इच्छा, सर्व नष्ट होतात. माळी जसा पाण्याला ज्या दिशेनी नेतो तेथे ते तक्रार न करता वाहते तसे आयुष्य साध्या, सोप्या, आनंदी वृत्तीत जगता येते. तुकाराम महाराज म्हणतात, ‘तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवापायी’ या भावनेत संतचरणी विश्वासाने रहावे. गणिताचे शास्त्रज्ञ १ली ते एम् एस् सी पर्यंत १ते ९ आकड्यातच खेळतात. तसे आपण संत देतील त्या नामात रहावे. प्रथम प्रयत्नपूर्वक नाम घ्यावे. पुढे सवय होते. श्वासात नाम येते व अखेर, ‘राम हमारा जप करे, हम बैठे आराम’ अशी स्थिती होते. सातत्याच्या नामसाधनेने तुकाराम म्हणतात, ‘तशी माझी मज झाली अनावर वाचा’ ही स्थिती येते. नामात सहजता येते. जसा श्वास सहज तसेच नाम सहज उच्चारले जाते. संतांनी दिलेल्या नामात शक्ती परंपरा व संस्कार असतो. भगवंताचा बोध होतो व तो प्रकट होतो. संतांना जगत कल्याणाची तळमळ असते. ते स्वतःच्या पातळीहून खाली येतात. व साधकाला वर उचलतात. हरिचे नाम हे वेदांचे बीज आहे, म्हणून वेद मंत्राच्या उच्चारा अगोदर ‘हरि ॐ’ म्हणतात.
७. समर्पण- शरणागतीनंतर साधक वेगळा उरत नाही पण सिद्ध म्हणून भगवत् इच्छेनी जगतो. सदगुरुरुपी समुद्रात त्याचा बिंदू एकरूप होतो व मग कृतकृत्य जीवन जगतो. वृक्ष जसा मधुर, सुवासिक, परिपक्व फळ देतो पण स्वतः खात नाही, इतरांना सावली देतो पण स्वतः ऊन, पाऊस, थंडी सहन करतो तसा समर्पित साधक इतरांच्या सुखात सुख व दुःखात दुःख मानतो. समर्पणानंतर काही साधक समाधी सुखाचा अनुभव घेतात. वाल्मिकी व अहिल्येनी अनेक वर्ष तप केले. त्यांचे वेगळे अस्तित्व राहीले नाही. गंगा नदी काठांच्या बंधनात वाहाते पण तिला ओढ सागरातील समर्पणाची असते. त्या नंतर तिचे अस्तित्व संपते. पुढे सूर्य किरणांनी तापल्यावर तिचे ढग सर्व ठिकाणी पाण्याचा वर्षाव करतात. संत सुद्धा देह त्यागानंतर जगज्जीवनी निरंतर राहतात व त्यांच्या शक्तीचा अनुभव साधकाला येतो.
साधनेच्या या सात पायऱ्यांचा विचार प.पू. बालयोगी दातानंदजी महाराजांच्या पुस्तकातील संदर्भाच्या आधारे लिहीला. समर्थ रामदासांनी, दशक ४ समास ४ मध्ये संतत्याग, निवेदन, विदेहस्थिती, अलिप्तपणा, सहजस्थिती, उन्मनी, विज्ञान या सात पायऱ्यांचा उल्लेख आहे, हे सप्तही एकरुप आहे.
‘स्वरुपीं राहिल्यां मती। अवगुण अवघेची सांडिती। परंतु यासी सत्संगती। निरुपण पाहिजे॥’
॥जय जय रघुवीर समर्थ॥