सामान्य माणूस
सामान्य माणूस कसा असतो याचे चित्रण आर. के. लक्ष्मण यांच्या व्यंगचित्रांतून, चार्ली चॅप्लीन व लॉरेल हार्डी सारख्या सिनेमांतून प्रभावीपणे व्यक्त झाले आहे. मर्यादित स्वार्थ, पापभिरुपणा, उसने अवसान, बावळटपणा, घाबरटपणा व भाबडा स्वभाव ही सामान्य माणसाची वैशिष्ठ्ये सांगता येतील. टॉलस्टॉय, मार्क ट्वेन, चेकॉव्ह यांच्या गोष्टी, पु.ल. देशपांडे, चिं.वि. जोशी यांच्या लेखांतूनही त्याचे दर्शन घडते. दादा कोंडके, लक्ष्या व आता मकरंद अनासपुरे याचे चित्रपट सामान्य माणसाचीच कहाणी सांगतात.
सामान्य माणसाच्या भावभावनांशी आपण लगेच एकरूप होतो. मात्र आपण सामान्य माणूस आहोत हे मान्य करायला मात्र बहुतेकांना लाज वाटते. अर्थात आपण असामान्य नाही हेही त्यांना पुरेपूर ठाऊक असते.
माझ्याबाबतीत मात्र मला आपण सामान्य माणूस आहोत याची मनोमन खात्री पटली आहे.मोठेपणी आता समाजकारण व राजकारण याबाबतीत माझी काही मते निश्चित झाली असली तरी लहानपणी ती सतत बदलत असायची.
मला आठवते त्याप्रमाणे १९५० ते १९६० पर्यंतचा शालेय जीवनाचा काळ विविध रंगी संस्कारांनी अगदी भारून गेला होता. सातारला राजवाडा चौकात यशवंतराव चव्हाण, एस. एम. जोशी, श्री. अ. डांगे, गॊळवलकर गुरुजी यासारख्या बर्याच नेत्यांची भाषणे मोठ्या भक्तीभावाने मी ऎकायचो. एकाचे भाषण ऎकले की मी त्यांच्या विचाराचा होऊन जाई. ते म्हणतात तेच खरे. बाकी सर्व चूक अशी माझी स्थिती होई. दुसरे वेगळ्या विचाराचे भाषण ऎकलॆ की माझ्या विचारांत पूर्ण बदल होई.
खेळाची फारशी आवड नसल्याने वा प्रकृतीही नाजुक असल्याने मी मैदानी खेळांच्या भानगडीत कधी पडलो नाही. त्यापेक्षा नगरवाचनालयातील पुस्तके वाचणे मला आवडे. त्यात आवड निवड नव्हती. कोणतेही पुस्तक मला चाले. सोव्हिएट देश मासिकातून मराठीत सुंदर लेख व गोष्टी येत. मी त्या वाचत असे. पुस्तक वाचनातून वैज्ञानिक व समाजवादी विचारसरणीचा माझ्यावर प्रभाव पडू लागला. एकदा मी शाळेतील मित्राला मार्क्स तत्वज्ञान काय आहे याची माहिती सांगितली. तो संघस्वयंसेवक असल्याने त्याला ते रुचले नाही. तो म्हणाला असले काही वाचत जाऊ नकोस. तुझा बुद्धीभेद होईल. तुला वाचायचेच असेल तर म्हाळगींचे मार्क्सवादावरील पुस्तक वाच.त्याला माझ्याबद्दल वाटणारी काळजी मला कळली पण मी त्याचा सल्ला मानला नाही. कारण मला कोणतेही बंधन नको वाटायचे. कधी मित्रांबरोबर शाखेत गेलो तर तेथील बौद्धीके ऎकून मला हिंदु धर्माचे भरते य़ेई. पण इतर धर्मांविषयी पुस्तके वाचली की त्यांची श्रद्धाही मला योग्य वाटू लागे.
अंधश्रद्धा, धर्म व विज्ञान या विषयांवर आमच्यात नेहमी वादविवाद होत असत. त्याबाबतीतही माझे मन सांगणार्याप्रमाणे हेलकावे खाई. देव आहे की नाही असे विचारले तर मला दोन्ही बाजूंनी वाद घालता येई. घरात देवाबद्दल अशी शंका घेण्याने घरातल्यांची मने दुखावतात हे पाहून मी तेथे धार्मिक रहात असे तर मित्रांत निरीश्वरवादी. रामायण महाभारतातील युद्धे, शिवाजी, राणाप्रताप यांचे पराक्रम, राणी लक्ष्मीबाई किवा सुभाषचंद्र बोस यांचा सशस्त्र संघर्ष या माहितीबरोबर महात्मा गांधींची अहिंसा व असहकाराचे स्वातंत्र्यासाठी योगदान पाहिले की मनात हिंसा-अहिंसा या मार्गांविषयी संभ्रम निर्माण होई.
आजही माझ्या स्वभावात फारसा काही फरक पडलेला नाही हे मला जाणवते. लांबची लढाई मला आवडते. पण प्रत्यक्ष लढाईला मी घाबरतो. विरुद्ध पक्षाचाही सहानुभूतीने व त्याच्या दृष्टीकोनातून विचार करण्याची सवय जडल्याने माझी अर्जुनासारखी स्थिती होते. गरिबांचे दुःख मला अस्वस्थ करते मात्र आपल्या सुखासीन जीवनाचा त्याग करून त्यांच्या उद्धारासाठी जीव झोकून काम करण्याचे धाडस होत नाही. राजकारणात तर ‘कोणता मी झेंडा घेऊ हाती’ असा रास्त संभ्रम पडतो.
पर्यावरण रक्षण का विकास, व्यक्तीस्वातंत्र्य की स्वयंशिस्त, मराठी की इंग्रजी, समाजवाद की लोकशाही असे अनेक प्रश्न माझ्या मनात अनुत्तरित राहिलेले आहेत. त्यामुळे कोणत्याही बाबतीत ठाम भूमिका घेणे मला जमत नाही.
थोडक्यात सांगायचे म्हणजे वार्याप्रमाणे गवताची पाने जशी त्या त्या दिशेने वाकतात तशीच सामान्य माणसाची स्थिती असते. पाने वाकली तरी मुळे भोवतालच्या समाजातील संस्कारात घट्ट रोवलेली व गुंतलेली असतात.वार्याला विरोध करणारी झाडे पडली तरी गवत तसेच राहते. कदाचित पाने खुडली गेली तरी मुळे शाबूत राहतात. समाज जीवनास हानी पोहोचत नाही. सत्यासाठी संघर्ष करणे आवश्यक असले तरी आपल्याला वाटणारे सत्य हॆ आपल्या आकलन शक्तीवर व पूर्वग्रहावर आधारित असते हे समजून घ्यावयास हवे. त्रयस्थपणाने खरे काय व खोटे काय याची शहानिशा करायला गेले की दोन्ही बाजूत काही तथ्य तर काही दोष आढळतात.त्यातील सत्य शोधून काढायला सामान्य माणसाला वेळ नसतो, धाडस नसते व त्याची ती कुवतही नसते.
सुदैवाने कबूल नाही केले तरी बहुतेक माणसे सामान्यच असतात. त्यांची निष्ठा, आशाआकांक्षा वैयक्तिकपणे बदलत्या असल्या तरी त्यांचा एकूण प्रभाव सत्य, अहिंसा, सर्वांभूती समभाव या चिरंतन गोष्टींचाच पाठपुरावा करतो. हेच लोकशाहीचे मुख्य यश आहे.
काळजी एवढीच वाटते की सत्ता, पैसा व अधिकारांचा वापर करून सामान्य जनसागरास आवश्यक त्या दिशेने वळविण्याचे व त्याच्य़ा प्रचंड ताकतीच्या लाटांनी हवे ते घडविण्याचे तंत्र मानवसमूहांनी विकसित केले आहे.हे मानवसमूह एखाद्या राजकीय पक्षाच्या स्वरुपात, सामाजिक चळवळीच्या स्वरुपा्त, बलाढ्य कार्पोरेट कंपनी वा सत्तापिपासू राष्ट्राच्या स्वरुपात कार्य करीत असतात. या सत्तासंघर्षात किती सामान्य माणसांचे जीवन व संसार उध्वस्त होतात याकडे कोणाचेच लक्ष जात नाही. इतर घटक सोडा पण त्यांच्यासारखी बाकी सर्व सामान्य माणसे अशा विध्वंसाकडॆ एक अपरिहार्य घटना म्हणून पाहतात व त्याची आपल्याला काही झळ बसत नाही ना याची काळजी घेतात.
प्रौढत्वी निज शैशवास जपणे बाणा कवीचा असे
या उक्तीप्रमाणे मला असे वाटते की माणसाने सामान्यच रहावे, सामान्यांविषयी आस्था ठेवावी. लोकशाही व कायदा दोहोंचे कसोशीने पालन करावे. असे झाले तर असामान्यांची समाजाला गरज उरणार नाही व पसायदानाचे उद्दीष्ट साध्य होईल.
सर्वे सुखिनः संतु ।
सर्वे संतु निरामयाः ॥
सर्वे भद्राणि पश्यंतु ।
मा कश्चित दुःखम् आप्नुयात ॥
हे सर्व ठीक असले तरी काही वेळा अशा सामान्य माणसांतूनच परिस्थितीचे चटके बसल्याने, अन्याय असह्य झाल्याने वा सात्विक संताप आल्याने अथवा केवळ स्वार्थापोटी काही माणसे असामान्य कृती करतात. त्यातील काही नेते तर काही गुन्हेगार बनतात. एरवी संथ असणारा जनसागर मग यांच्यामुळे जागृत होतो. त्यात प्रचंड लाटा उसळतात. त्याचे बरे वाईट परिणाम मग सर्वांना भोगावे लागतात.
याचवेळी काही राजकीय व सामाजिक संघटित गट अशा व्यक्तीला पाठिंबा देऊन आपला स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करतात. एवढेच नव्हे तर प्रसिद्धीच्या प्रलोभनातून त्याला अतिरेकी पावले उचलायला प्रवृत्त करतात. यात त्याचा जीव गेला तरी त्याचे भांडवल करायला मिळते. तो यशस्वी झाला तर त्याला मांडलिक बनवून आपला कार्यभाग साधण्याकडे या शक्तींचा प्रयत्न असतो. नव्या सत्तासंघर्षात अशावेळी सामान्य वा अपक्ष राहणे धोकादायक ठरू शकते. मग पापभिरू माणसे सुरक्षेसाठी वा आपल्या फायद्यासाठी बलवान पक्षाच्या गटात सामील होतात.