कळप

Parent Category: मराठी साहित्य Category: डॉ. सु. वि. रानडे यांचे लेख Written by सौ. शुभांगी रानडे

माणूस हा कळप करून राहणारा प्राणी आहे.जात, धर्म, पंथ, राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, संस्था, वसाहत, गाव, राज्य, देश म्हणजे जन्म, आचार, विचार, साहचर्य, स्थान, नोकरी, ध्येय, उद्योग यापरत्वे निर्माण झालेले माणसांचे कळपच आहेत.

कळपाचे काही नियम असतात. काही फायदे असतात. एका कळपातील लोक स्वत:ला श्रेष्ठत्वाचा मान घेतात व इतर कळपांबाबत कनिष्ठता बाळगतात. हा एक आत्मप्रौढीचा सार्वत्रिक आविष्कार आहे.कळपाच्या चालीरीती त्याचे नियम बनतात. कळपाच्या बाहेर गेल्यास कळपातील लोक त्याचा तिरस्कार करतात. कळपातील पक्षी बाहेर पडल्यावर त्याला कळपातील पक्षीच चोचींनी घायाळ करतात तीच तऱ्हा माणसांच्या अशा कळपात होते.

समाजातून बहिष्कृत होणे व त्यांचा रोष ओढवून घेणे इत्यादी धोक्यांना अशा माणसाला सामोरे जावे लागते. त्यामुळे सर्वसाधारणत: माणसे कळपात राहणे पसंत करतात. कळपात राहिल्यास माणसास सुरक्षितता लाभते. एकटेपणाचे भय रहात नाही. स्वत:चे स्वतंत्र अस्तित्व विसरून माणूस कळपालाच स्वत:चे प्रतीक समजू लगतो. कळपातील माणसे कळपाचे नियम पाळतात एवढेच नव्हे तर कळपाच्या रक्षणासाठी व वाढीसाठी तन, मन, धनही अर्पण करतात. म्हणजेच ती माणसे कळपाचा एक अविभाज्य अंग बनतात आणि तो कळपच एक स्वतंत्र प्राणी बनतो.कळप किती घट्ट विणीचा, किती चिवट आणि जाज्वल्य यावर त्याचे अस्तित्व वा वाढ अवलंबून असते.

मात्र असा कळप शिरजोर झाला तर इतर कळपांवर आक्रमण करून स्वत: मोठा होण्याचा प्रयत्न करतो.यातून नवे प्रश्न निर्माण होतात. सर्व कळप एकाच प्रकारे विभागले नसल्याने एकच माणूस एकाच वेळी अनेक कळपांचा सदस्य असतो. या सर्व कळपांचे नियम पाळणे त्यात समरस होणे त्याला शक्य नसते. त्यामुळे त्याची ओढाताण होते. माणूस व कळप किंवा दोन कळप यात संघर्ष होतो.असा संघर्ष टाळण्यासाठी प्रत्येक प्रकारच्या कळपांसाठी आदर्श नियमावली केली जाते. पण तरीही कळपांवे एकमेकांशी संघर्ष चालू असतात. या संघर्षात यशस्वी होण्यासाठी प्रत्येक कळप आपली ताकत वाढविण्याचा प्रयत्न करतो वा अनेक छोटे कळप एकत्र येऊन मोठ्या कळपाचे रूप घेतात.

एकंदरीत मानवी समाजव्यवस्था कळप करून राहणाऱ्या इतर प्राण्यांप्रमाणेच असते. त्यांच्या वर्तनात विलक्षण साम्य आढळते. समाजातील अनेक घटनांचा आणि मानसिक ताणतणावांचा कार्यकारणभाव शोधण्यासाठी मानवसमूहाची प्राण्याशी व अशा प्राण्यांच्या कळपातील संघर्षाशी तुलना करणे अधिक उपयुक्त ठरेल असे वाटते

.या संकल्पनेचा अधिक विस्तार केल्यास निसर्गातील पदार्थ हे देखील एकप्रकारचे कळपच असतात व ऊर्जा म्हणजे त्यांच्यातील संघर्षाचे दृष्य स्वरूप असते असे म्हणता येईल.

Hits: 146
X

Right Click

No right click