सवय
माणूस हा जसा घड्याळाचा गुलाम असतो तसाच तो सवयीचाही गुलाम असतो, होय गुलामच असतो. कोणत्याही गोष्टीची एकदा का सवय लागली की ती मोडून काढणे भारी अवघड काम होऊन बसते. आता चहाचंच बघाना. चहा पिणार्या लोकांना सकाळी उठल्याबरोबर तोंड धुताक्षणीच चहा लागतो. काहीजण तर चहाचं आधण चुलीवर ठेवून मगच तोंड धुवायला जातात. म्हणजे एकदा का कपभर चहाचं इंधन पोटात गेलं की शरीराची गाडी बिनतक्रार सुरू होते. तीच गोष्ट दुपारच्या चहाची. दुपारी अडीच-तीनला चहा मिळाला नाही तर डोक्याच्या आस्तित्वाची जाणीव होऊन ते दुखायला लागते.
एखाद्या गोष्टीची सवय लावून घेणे म्हणजे वर्तनात बदल घडविणे. नुसते तोंडी बोलायला वा लिहायला सोपे आहे पण प्रत्यक्ष अंमलात आणणे ही गोष्ट थोडी कठीणच आहे. तो बदल अंगवळणी पडावा लागतो. चार दिवस व्यायाम अगदी जोरात, जोशात केला जातो. पाचव्या दिवशी थोडी चालढकल केली जाते. आणि एकदा का चालढकल केली गेली की ‘आज राहू दे. उद्यापासून नक्की करू हं’ असे सारवासारवीचे उत्तर देऊन मनाला गप्प केले जाते.
सवय ही चांगली व वाईट अशी दोन प्रकारची असते. आमच्या माहितीचे एक प्रसिद्ध डॉक्टर होते. अत्यंत हुशार, कुशल, प्रवीण, पारंगत अशी त्यांची ख्याती होती. पण एक भारी वाईट सवय होती त्यांना. अगदी पेशंटशी सुद्धा बोलबोलता चटकन् त्यांचा डावा, उजवा हात तोंडाशी जाई आणि नकळत दाताने नखे कुरतडण्याचे (खाण्याचे) काम सुरू होई. समोर बसलेल्या माणसाला त्यांचे ते वागणे गैर दिसे. पण बोलणार कसे? एवढे मोठे डॉक्टर त्यांना कोण सांगणार? तसेच सातत्याने सिगारेट शिलगावणारे लोकही आपणास ठाऊक आहेत.
यावर उपाय काय? तर बक्षिस किंवा शिक्षा हा यावरचा जालीम उपाय आहे. एकतर गोड बोलून काहीतरी बक्षिस मिळेल या आशेने ती सवय बदलता येते किंवा सवय बदलली नाही तर शिक्षा केली जाईल ही भीती तरी मनात असावी लागते. आपल्याला ठाऊक आहे की कॅल्शियमचे प्रमाण शरीरात कमी असले की मुले खडू, पेन्सिल इत्यादी खातात. आमच्या माहितीचा एक लहान मुलगा तर आईला म्हणायचा, ‘आई, एकदाच भिंत चाटू का?’ त्याची ही सवय मोडण्यासाठी नाना उपाय केले. भिंतीला तिखट किंवा कडू रस लावून ठेवला. पण ते किती ठिकाणी लावणार? शेवटी जेव्हा त्याला समज आली तेव्हा स्वतःहोऊनच त्याचे भिंत चाटणे कमी झाले.
चांगल्या सवयी असणारी मंडळीही अनेक आहेत. किंबहुना आपण फक्त त्यांच्याकडेच बघावे. उदा. बाहेरून घरात आल्यानंतर हातपाय धुतल्याशिवाय स्वयंपाकघरात येऊ नये. मग हातपाय धुतल्याशिवाय काही खाणेपिणे तर दूरच. तसेच संध्याकाळी फिरून वगैरे आल्यावर देवाला दिवा लावून ‘शुभं करोति’ म्हणणे. घरातील मोठी माणसेच असे वागत असतील तर लहान मुले अनुकरणाने आपोआप शिकतातच. मचमच न करता खाणे, शिंकताना, खोकताना तोंडावर रुमाल धरणे. घेतलेली वस्तू जागेवर ठेवणे. अशा एक ना दोन! अनेक चांगल्या गोष्टी आपण अंगी बाणवू शकतो व आदर्श जीवन जगू शकतो.
Hits: 225