खरे सुख
‘खरे सुख कशात आहे?’ असे विचारले तर प्रत्येकाचे उत्तर निरनिराळे येते. कुणी म्हणेल, ‘खाणे, पिणे व आराम करणे यातच खरे सुख आहे.’ तर कुणी म्हणेल, ‘उन्हातान्हात भरपूर काम करून नंतर झाडाच्या थंडगार सावलीत बसून अगदी साधी भाजी-भाकरी खाण्यात जे सुख आहे ते इतर कशात नाही.’ कुणाला ‘समुद्रकाठी बसून लाटांच्या भरती-ओहोटीचा खेळ बघण्यात सुख वाटेल’ तर कुणाला ‘डोंगर-दर्या पालथ्या घालून निसर्गसौंदर्य बघण्य़ात सुख वाटेल’. कुणाला ‘भल्या पहाटे उठून पायी पायी लांबवर फिरून आल्यावर वर्तमानपत्र वाचीत ताज्या वाफाळलेल्या चहाचे घोट घेण्यात सुख वाटेल.’ वारकरी मंडळींना वारीबरोबर पायी पायी पंढरीला जाण्यात खरे सुख मिळते व त्यातच त्यांना लाडक्या विठूरायाचे दर्शन घडते. कित्येक तास रांगेत तिष्ठत उभे राहून एक क्षणभर का होईना पण त्या विठूमाऊलीचे दर्शन झाले की त्या वारकर्यांचा सर्व शीण, थकवा निघून जातो आणि त्यांना परमावधीचे सुख मिळते. खरे म्हटले तर ती असते केवळ दगडाची मूर्ती. पण ‘पांडुरंग’, ‘पांडुरंग’ करीत आपल मन त्यात इतके रंगून जाते की त्यात सर्व दुःखंचा विसर पडून खर्या सुखाची प्राप्ती होते. अनंत वेदना सहन करून जेव्हा प्रत्येक ‘आई’ आपल्या ‘बाळाला’ डोळा भरून बघते तेव्हा ती तिच्या सर्व वेदना पार विसरून जाते. आनंदाश्रूंनी तिचे डोळे ओथंबून येतात व खरे सुख तिच्या डोळ्यातून वाहू लागते.
नमनालाच घडाभर तेल गेलं खरं पण सांगायचं तात्पर्य एवढंच की ‘दुःखानंतर मिळालेले सुख हे अधिक चांगले वाटते.’ म्हणजेच कष्टाचा, घामाचा पैसा हा अधिक आनंददायक असतो. आता असं बघा, ‘राजाला रोजच दिवाळी’ याप्रमाणे रोजच लाडू, चिवडा खाणार्यांना दिवाळीतील लाडू-चिवड्य़ाची गंमत ती काय वाटणार हो? आजकाल पैसा टाकला की कोणतीही गोष्ट विकत मिळते खरी पण ती मनाला पूर्ण आनंद देऊ शकत नाही. याउलट कष्ट करुन मिळालेली लहानशी गोष्ट मनाला मोठा आनंद देऊन जाते. जसे कुंडीतील गुलाबाचे फूल व विकत घेतलेले गुलाबाचे फूल यात फरकच आहे! भले ते कुंडीतले_आपल्या स्वतःच्या कुंडीतले गुलाबाचे फूल विकतच्या फुलापेक्षा लहान असेल, कदाचित त्याचा रंगही बेतास बात असेल. पण आपण त्या कुंडीतल्या झाडाला रोज आठवणीने पाणी घालतो, त्याची देखभाल करतो व मग त्याला आलेले फूल कसेही असले तरी आपल्याला अधिक मोलाचे वाटणारच!
म्हणजेच घेण्यापेक्षा देण्यातले सुख अधिक असते. स्वाभाविकच आहे हो. कारण देणार्याचा हात वर असतो व घेणार्याचा खाली. मग कुणी म्हणेल, ‘म्हणजे आपले सगाळे दुसर्यांना देऊन टाकायचे की काय?’ नाही, नाही. तसं नाही हो. सगळं नाही काही. पण आपल्या घासातला एक घास जरी दुसर्याला दिला तर त्यासारखे सुख सुख इतरत्र कुठेही मिळणार नाही. विशेषतः जो तहानलेला आहे त्याला पाणी प्यायला देण्यात किंवा भुकेल्याला घासभर अन्न देण्य़ातच खरे सुख आहे. यासाठीच अतिथीला एक घास अन्न देऊन मगच आपण जेवायचे ही आपल्या पूर्वजांनी घालून दिलेली पद्धत किती रास्त आहे हे समजून येते. अर्थात दरवेळी अतिथी असतोच असे नाही. पण ते घासभर अन्न निदान कावळे, चिमण्या, कुत्री, मांजरे अशा कुणाच्या तरी मुखात पडेलच ना? म्हणजेच दानात खरे सुख असते. दान मग ते कोणत्याही प्रकारचे असो - अन्नदान, धनदान, वस्त्रदान, नेत्रदान, कन्यादान किंवा असेच कोणतेही.
‘करिती दाना कुणी सुवर्णा कर्णापरि कवचा देती
परि कन्यादाना करी जो स्वकरी गरज न दूजा दानाची’
आपल्या पोटचा गोळा दुसर्याला देऊन टाकायचा म्हणजे साधीसुधी बाब नव्हे. त्यात आतड्याला पडणारा पीळ हा त्या जन्मदात्या मातापित्यांनाच ठाऊक! अर्थात कन्या हे दुसर्याचेच धन असते हे सर्वमान्य आहेच. आणि ते दुसर्याला देण्यातच त्या आईवडिलांचा मोठेपणा दडलेला असतो.
Hits: 249