जुमला वेबसाईटचे डिझाईन - २

Parent Category: मराठी साहित्य Category: माहिती तंत्रज्ञान Written by सौ. शुभांगी रानडे
जुमला प्रणालीची रचना समजण्यासाठी आपण एखाद्या हॉटेलचे उदाहरण घेऊ. हॉटेलच्या दर्शनी भागात ग्राहकांसाठी टेबलखुर्च्यांची आकर्षक मांडणी केलेली असते. ग्राहकाला हवे असणारे खाद्यपदार्थ बनविण्याचे स्वयंपाकघर ग्राहकांना पाहता येत नाही. ग्राहकाची मागणी नोंदवून हवे ते पदार्थ ग्राहकाच्या टेबलवर नेऊन देण्यासाठी वेटर असतात. ग्राहक आणि स्वयंपाकघर यांच्यातला तो एक दुवा असतो.

जुमला वेबसाईटमध्येही वेबसाईटवरील माहिती पाहणारे ग्राहक वा युजर  यांच्यासाठी   दर्शनी भाग (Front end ) आणि माहितीचा साठा ठेवण्यासाठी डाटाबेस व त्यावर प्रक्रिया करून आवश्यक तसे वेबपेज बनविण्यासाठी व्यवस्थापक कक्ष असे दोन भाग असतात.इंटरनेट हा वेटर म्हणून काम करतो व  वेबसाईटचे केवळ नाव ब्राऊजरमध्ये घातले ( उदा. http://www.dnyandeep.com) की कोणालाही वेबपेज पाहता येते

 जसे विमानात विमान चालविणा-या वैमानिकासाठी वेगळी केबिन असते त्याप्रमाणे वेबसाईटचे संचालन करणा-यासाठी वेगळा व्यवस्थापन (Administrator) विभाग असतो. तेथे प्रवेश काण्यासाठी वेबसाईटचे नाव आणि पुढे /administrator  (http://www.dnyandeep.com/administrator) लिहावे लागते. तेथे व्यवस्थापक युजरनेम आणि पासवर्ड घातल्यावरच केल्यावर वेबसाईटमध्ये कोणतेही बदल करणे, त्यात माहिती घालणे किंवा नव्या सुविधा जोडणे शक्य होते.

हे सर्व करण्यासाठी तेथेही वेगवेगळे विभागवार मेनू तसेच वेबसाईटच्या दर्शनी भागात दाखविण्यासाठी अनेक पर्याय निवडण्याची सोय उपलब्ध असते. म्हणजे वेबसाईट व्यवस्थापकालाही त्यासाठी कोणतेही वेगळे कोडिंग करावे लागत नाही. वेबसाईटच्या दर्शनी भागात असणा-या सर्व विभागाचे संचालन येथून करता येते. दर्शनी भागातही लॉगिन नोंद केलेल्या सदस्यांच्ची ओळख पटविणे व त्यांच्या वर्गवारीप्रमाणे माहितीत बदल करण्याचे काम येथून केले जाते.

दर्शनी भाग ( Front End)
जुमला वेबप्रणालीच्या दर्शनी भागामध्ये खालील फाईल व फोलडर असतात. अर्थात युजरला यातील काहीच दिसत नाही. त्याला फक्त वेबपेज पाहता येते.

खालील फोल्डर व फाईल पहाण्यासाठी व्यवस्थापकाला सर्व्हरवरील  सीपॅनेल दालनाचा उपयोग करावा लागतो.

फाईल

इंडेक्स पीएचपी(index.php), कॉंफिगरेशन पीएचपी(configuration.php), रोबोटस् (robots.txt), एचटीअॅक्सेस(htaccess.txt), लायसेन्स (license.txt)

फोल्डर्स 
स्मृतीसाठा(tmp),मांडणीप्रकार(templates),जोड(plugins),
छोटे भाग(modules), मिडिया(media), संदर्भ(libraries), लेआऊट्स(layouts), भाषा(language), समावेशक(includes), चित्रे(images), मुख्य विभाग(components),
तरल स्मृतीसाठा(cache), इतर(bin) ही फोल्डर्स असतात.

याशिवाय व्यवस्थापन (Administrator) या वेगळ्या फोल्डरमध्ये व्यवस्थापन कक्षातील सर्व फाईल आणि फोल्डर असतात.

दर्शनी भागातील फाईलचे कार्य

 १) इंडेक्स पीएचपी(index.php) हे वेबसाईटचे प्रवेशद्वार. येथे  युजरच्या ब्राऊजर आणि डिव्हाईसची माहिती घेऊन युजरकडून आलेली प्रत्येक विनंती तपासून योग्य ते वेबपेज बनवून देणाचे 'एक खिडकी' योजनेसारखे काम चालते. युजरला दुस-या कोणत्याही मार्गाने वेबसाईट प्रणालीत प्रवेश करता येत नाही. या फाईलमधील कोड पाहिले तर प्रत्यक्षात कोणतीही कृती न होता वेगवेगळ्या विभागांची जुळणी व अॅप्लिकेशन फाईलला कृती करण्याचे आदेश दिले जातात. विनंती स्वीकारणे आणि उत्तर देणे  वा एकाच फाईलमार्फत केले जाते.

२)कॉंफिगरेशन (configuration.php)फाईलमध्ये वेबसाईट डिझाईन ज्या मूलभूत गोष्टींवर अवलंबून आहे ते पॅरॅमीटर्स, डाटाबेस, लॉग, एफटीपीविषयी सर्व माहिती नोंदविलेली असते.यातील बरीच माहिती व्यवस्थापन कक्षातूनही बदलता येते.

३)रोबोट्स (robots.txt)नावाची फाईल म्हणजे जुमला वेबसाईट अॉफिसची न्यूजरूम. गुगलसारख्या शोधयंत्रणांचे पत्रकार याठिकाणी वेबसाईटची माहिती घेण्यासाठी जमतात. त्यांना कोणती माहिती पुरवायची आणि कोणती माहिती मिळविण्यास प्तिबंध घालायचा हे या फाईलमधील प्रोग्रॅम ठरवितो.

४)एचटीअॅक्सेस (htaccess.txt)फाईल व वेब कॉंफिग फाईल web.config.txt या दोन्ही फाईलचे कार्य एकसारखेच आहे. अपाचे सर्व्हरसाठी एचटीअॅक्सेस आणि मायक्रोसॉफ्ट सर्व्हरसाठी (Microsoft IIS) वेब कॉंफिग फाईल वापरली जाते. यात वेबसाईटचे नाव तपासले जाते. जुमला वेबसाईट पाहताना अॅड्रेसबारमध्ये वेबसाईटच्या नावानंतर   index.php व त्यानंतर वेबपेजचा पत्ता दिसतो. यातून index.php काढून टाकून सहज समजेल असा पत्ता करण्याची किमया या फाईलमधून करता येते. जोपर्यंत  फाईलच्या नावात .txt असते तोपर्यंत या फाईल वाचल्या जात नाहीत मात्र .txt  काढून .htaccess असे नाव करावे लागते व व्यवस्थापन कक्षातून असे करता येते. मात्र कारयान्वित झालेल्या या फाईलचे नाव अदृष्य होते.

५)लायसेन्स (license.txt)फाईलमध्ये जुमला लायसेन्सविक्षयी माहिती असते त्याचा वेबसाईटच्या कार्यात काहीही सहभाग नसतो.
Hits: 135
X

Right Click

No right click