शैक्षणिक संस्थेची वेबसाईट
महाराष्ट्र शासनाच्या, शिक्षण विभागाच्या वा विद्यापीठ/मंडळाच्या निर्बंधामुळे शाळा, महाविद्यालय वा शिक्षणसंस्था यांना स्वतःची वेबसाईट करण्याची आवश्यकता भासू लागली आहे. मात्र वेबसाईट म्हणजे काय व त्याचा काय उपयोग होऊ शकतो याची माहिती नसल्याने विशेष पूर्वतयारी न करता केवळ अटींची पूर्तता करण्यासाठी घाईगडबडीत अननुभवी व्यक्तींकडून कमी खर्चात वेबसाईट करून घेतली जाते. अशा वेबसाईटचा संस्थेला फायदा न होता त्यावरील चुकीच्या वा अपुर्या माहितीमुळे संस्थेविषयीची प्रतिमा खालावण्याचा धोका उद्भवतो.
ज्ञानदीपने आतापर्यंत अनेक महाविद्यालये, शाळा व शिक्षण संस्थांच्या वेबसाईट डिझाईन केल्या असून त्या करीत असताना आलेल्या बर्यावाईट अनुभवांवर आधारित निष्कर्ष व चांगल्या वेबसाईटसाठी काय करता येईल याविषयी मार्गदर्शनपर माहिती खाली दिली आहे.
सर्वसाधारणपणे कोणत्याही शिक्षणसंस्थेची वेबसाईट तयार करताना त्यात खालील माहितीचा समावेश करावा लागतो.
१. संस्थेचे बोधवाक्य व लोगो
२. संस्थेच्या अध्यक्षांचा फोटो व संदेश
३. मुख्याध्यापक वा प्राचार्य यांचा फोटो व संदेश
४. संस्थेच्या स्थापनेपासूनचा इतिहास
५. संस्थेच्या कार्यकारिणीतील सदस्यांची नावे, फोटो व परिचय
६. शाळा / महाविद्यालयाच्या इमारतीचा फोटो
७. व्हिजन, मिशन
८. संस्थेची वैशिष्ठ्ये व गुणवत्ता निदर्शक प्रमाणपत्रे
९. स्थानदर्शक नकाशा
१०. विविध विभागांची माहिती - फोटो व माहिती
११. शिक्षक यादी, पद, शिक्षण, अनुभव, फोटो
१२. फोटोगॅलरी - कार्यक्रमांचे फोटो
१३. वाचनालय, क्रीडांगण, प्रयोगशाळा, छंदग्रह व इतर सुविधांची माहिती
१४. प्रवेशप्रक्रिया - अर्ज, अटी, तारखा
१५. अभ्यासक्रम
१६. वेळापत्रक, सुट्ट्यांची यादी, नियम व सूचना
१७. स्पर्धा व कार्यक्रम
१८. पारितोषिके, विद्यार्थी परिक्षा निकाल, गुणवत्ता यादी, पारितोषिकप्राप्त विद्यार्थ्यांचे फोटो
१९. गुणवंत माजी विद्यार्थी - यादी, परिचय
२०. स्थानदर्शक नकाशा
२१. संपर्क पत्ता, फोन, इ-मेल ( विभागवार वा इतर आवश्यक पदांसाठी)
२२. सूचनाफलक विद्यार्थ्यांसाठी/पालकांसाठी/इतर लोकांसाठी
२३. शिक्षकांची विद्यार्थ्यांसाठी पाने
२४. संस्थेच्या भविष्यकालीन विस्तार योजना
वरील सर्व माहिती ( आवश्यकतेनुसार निवड वा फेरफार करून) संकलित करण्याचे काम फार वेळ घेणारे असते. शिवाय ही सर्व माहिती तपासून अधिकृत व बिनचूक आहे याची खात्री करणे जरूर असते. बर्याच वेळा वेबसाईट करण्याचे काम वेबडिझाईन करणार्या संस्थेवर सोपविल्यावर अशी माहिती गोळा करण्याचे काम सुरू होते. अर्धवट माहिती व नियोजनातील त्रुटी यामुळे वेबडिझाईनच्या कामात विलंब होतो. वेबसाईट लवकर होण्यासाठी संस्थेकडून छापील प्रसिद्धी पत्रके, जुने फोटो व छापील संदर्भ माहिती दिली जाते. यांचा वापर करताना टायपिंगच्या चुका होऊ शकतात. स्कॅनिंग केलेले फोटो नीट दिसत नाहीत. कामातील चुका व काम वेळेत पूर्ण न झाल्याचा ठपका वेबडिझाईन संस्थेवर येतो. वेळेत वेबडिझाईन सुरू न झाल्याने शिक्षण संस्थेचेही नुकसान होते.
या गोष्टी टाळण्यासाठी वेबसाईट करावयाचे निश्चित झाल्यावर वेबसाईटचा मुख्य उद्देश काय आहे ते लेखी नमूद करावे त्यानुसार वेबसाईटवर काय काय माहिती घालावी लागेल याची यादी करावी. ह्या सर्व माहिती संकलनाचे योग्य नियोजन करावे. जबाबदार्या वाटून द्याव्यात. वेळेचे बंधन घालावे. वेबसाईट डिझाईन करणारी संस्था व शिक्षणसंस्था यात दुवा म्हणून शिक्षणसंस्थेने वेबसाईटचे ज्ञान असणार्या एका समन्वयकाची नेमणूक करावी. वेबसाईट डिझाईनमध्ये रंग, आराखडा याविषयी व्यक्तिव्यक्तिनुसार आवडी बदलत असल्याने वेबसाईटच्या डिझाईन संबंधी सूचना देण्याचे वा निर्णय घेण्याचे अधिकार त्याला द्यावेत. अन्यथा वेबसाईट डिझाईनला निश्चित दिशा मिळत नाहीत. तसेच डिझाईन झाल्यावर त्यात रंग वा इतर बाबी बदलण्याचा प्रयत्न केल्यास सर्व वेबसाईटचे डिझाईनच पुन्हा करावे लागते. खर्च वाढतो. वेळही वाया जातो.
वेबसाईटवर घालायची सर्व माहिती शक्यतो सॉफ्टकॉपी स्वरुपात (कॉम्प्युटरवर टाईप करून) द्यावी म्हणजे त्यात चुका होत नाहीत.प्रसिद्ध करावयाचे फोटो हे चांगल्या कॅमेर्याने काढलेले व डिजिटल स्वरुपात असावेत व इ मेलने, पेन ड्राईव्हच्या साहाय्याने वा सीडीवर द्यावेत. फोटोप्रिंटवरील फोटो स्कॅन करून वापरल्यास ते एवढे उठावदार दिसत नाहीत.
शिक्षण खात्याच्या निर्बंधानुसार प्रसिद्ध करावयाची माहिती, शिक्षण शुल्क समिती व अनिवार्य प्रसिद्धीचा मजकूर (Mandatory Disclosures) पीडीएफ स्वरूपात द्यावी.
वेबडिझाईन करताना पहिले दर्शनी पान सर्वात महत्वाचे असते. या पानावरील रंगसंगती, आकृत्या व मजकूर मांडणी समन्वयकाच्या इच्छेनुसार तयार केली जाते. त्यास थोडा वेळ लागतो. त्याचे डिझाईन मान्य झाल्यावर मगच इतर माहितीची पानांचे डिझाईन करता येते. सर्वसाधारणपणे वेबडिझाईनला एक महिन्याचा कालावधी लागतो. मात्र माहिती मिळाली नाही तर यात विलंब होतो.
वरील सर्व माहिती फक्त स्टॅटिक प्रकारच्या वेबसाईटलाच लागू आहे. डायनॅमिक वेबसाईटसाठी लागणार्या माहितीचा यात उल्लेख केलेला नाही. डायनॅमिक वेबसाईटमध्ये डाटाबेस व सॉफ्ट्वेअर वापरून आवश्यक ती माहिती देणारी वेबपेजेस आपोआप तयार होण्याची सोय करता येते. संस्थेच्या अनेक शाळांच्या व्यवस्थापनासाठी, माजी विद्यार्थी माहिट कक्षासाठी वा ऑनलाईन शिक्षण व परिक्षा घेण्याची सोय अशा वेबसाईटवर करणे शक्य असते.
Hits: 149