अकौंटिंग भाग ९ - बँक रिकन्सायलेशन
कंपनी वा संस्थेच्या बँकविषयक आर्थिक व्यवहारांच्या नोंदी आणि बँक स्टेटमेंट (बँकेत झालेल्या व्यवहाराच्या नोंदी) यात बर्याच वेळा फरक आढळतो. याचे कारण संस्थेने बँकेत बाहेरच्या पार्टीचा चेक भरला व चेक मिळाल्याची तशी नोंद आपल्या अकौंटिंगमध्ये रेसिट व्हाउचरला केली तरी तो चेक पास झाल्यावरच तो संस्थेच्या खात्यावर जमा होतो. त्यामुळे बँकेतील खात्यावर रक्कम जमा होण्याची तारीख वेगळी असते.
तसेच संस्थेने दुसर्या पार्टीला चेक दिला व तशी पेमेंट व्हाउचरला नोंद केली तरी प्रत्यक्षात त्या पार्टीने तो बँकेत भरून पास झाल्यावरच संस्थेच्या खात्यावरील रकमेतून चेकची रक्कम वजा केली जाते ( दुसर्या पार्टीच्या खात्याकडे वर्ग केली जाते.)
संस्थेच्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला मागील वर्षातील चेक जमा व नावे होऊ शकतात तसेच वर्षाच्या शेवटी काही चेक जमा वा नावे होण्याचे राहतात.
संस्थेच्या अकौंट स्टेटमेंटमध्ये बँकस्टेटमेंटच्या आधारे योग्य त्या दुरुस्त्या करून अकौंट अपडेट करावे लागते. यालाच बँक रिकन्सायलेशन असे म्हणतात.