तुकारामाचे अभंग १-१०
समचरणदृष्टि विटेवरी साजिरी । तेथें माझी हरी वृत्ति राहो ॥१॥
आणीक न लगे मायिक पदार्थ । तेथें माझें आर्त्त नको देवा ॥ध्रु.॥
ब्रम्हादिक पदें दुःखाची शिराणी । तेथें दुश्चित झणी जडों देसी ॥२॥
तुका म्हणे त्याचें कळलें आम्हां वर्म । जे जे कर्मधर्म नाशवंत ॥३॥
--------------१
सुंदर तें ध्यान उभे विटेवरी । कर कटावरी ठेवूनियां ॥१॥
तुळसीचे हार गळां कासे पीतांबर । आवडे निरंतर तें चि रूप ॥ध्रु.॥
मकरकुंडलें तळपती श्रवणीं । कंठीं कौस्तुभमणि विराजित ॥२॥
तुका म्हणे माझें हें चि सर्व सुख । पाहीन श्रीमुख आवडीनें ॥३॥
--------------२
सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती । रखुमाईच्या पती सोयरिया ॥१॥
गोड तुझें रूप गोड तुझें नाम । देईं मज प्रेम सर्व काळ ॥ध्रु.॥
विठो माउलिये हा चि वर देईं । संचरोनि राहीं हृदयामाजी ॥२॥
तुका म्हणे कांहीं न मागे आणीक । तुझे पायीं सुख सर्व आहे ॥३॥
--------------३
राजस सुकुमार मदनाचा पुतळा । रविशशिकळा लोपलिया ॥१॥
कस्तुरीमळवट चंदनाची उटी । रुळे माळ कंठीं वैजयंती ॥ध्रु.॥
मुगुट कुंडले श्रीमुख शोभलें । सुखाचें ओतलें सकळ ही ॥२॥
कासे सोनसळा पांघरे पाटोळा । घननीळ सांवळा बाइयानो ॥३॥
सकळ ही तुम्ही व्हा गे एकीसवा । तुका म्हणे जीवा धीर नाहीं ॥४॥
--------------४
कर कटावरी तुळसीच्या माळा । ऐसें रूप डोळां दावीं हरी ॥१॥
ठेविले चरण दोन्ही विटेवरी । ऐसें रूप हरी दावीं डोळां ॥ध्रु.॥
कटीं पीतांबर कास मिरवली । दाखवीं वहिली ऐसी मूर्ती ॥२॥
गरुडपारावरी उभा राहिलासी । आठवें मानसीं तें चि रूप ॥३॥
झुरोनी पांजरा होऊं पाहें आतां । येईं पंढरीनाथा भेटावया ॥४॥
तुका म्हणे माझी पुरवावी आस । विनंती उदास करूं नये ॥५॥
--------------५
गरुडाचें वारिकें कासे पीतांबर । सांवळें मनोहर कैं देखेन ॥१॥
बरवया बरवंटा घनमेघ सांवळा । वैजयंतीमाळा गळां शोभे ॥ध्रु.॥
मुगुट माथां कोटि सूर्यांचा झळाळ । कौस्तुभ निर्मळ शोभे कंठीं ॥२॥
ओतींव श्रीमुख सुखाचें सकळ । वामांगीं वेल्हाळ रखुमादेवी ॥३॥
उद्धव अक्रूर उभे दोहींकडे । वर्णिती पवाडे सनकादिक ॥४॥
तुका म्हणे नव्हे आणिकांसारिखा । तो चि माझा सखा पांडुरंग ॥५॥
--------------६
वाळो जन मज म्हणोत शिंदळी । परि हा वनमाळी न विसंबें ॥१॥
सांडूनि लौकिक जालियें उदास । नाहीं भय आस जीवित्वाची ॥२॥
नाइकें वचन बोलतां या लोकां । म्हणे जालों तुका हरिरता ॥३॥
--------------७
आधिल्या भ्रतारें काम नव्हे पुरा । म्हणोनि व्यभिचारा टेकलियें ॥१॥
रात्रंदिस मज पाहिजे जवळी । क्षण त्यानिराळी न गमे घडी ॥२॥
नाम गोष्टी माझी सोय सांडा आतां । रातलें अनंता तुका म्हणे ॥३॥
--------------८
हाचि नेम आतां न फिरें माघारी । बैसलें शेजारीं गोविंदाचे ॥१॥
घररिघी जालें पट्टराणी बळें । वरिलें सांवळें परब्रम्ह ॥२॥
बळियाचा अंगसंग जाला आतां । नाहीं भय चिंता तुका म्हणे ॥३॥
--------------९
नाहीं काम माझें काज तुम्हांसवें । होतें गुप्त ठावें केलें आतां ॥१॥
व्यभिचार माझा पडिला ठाउका । न सर ती लोकांमाजी जालें ॥२॥
न धरावा लोभ कांहीं मजविशीं । जालें देवपिशी तुका म्हणे ॥३॥
--------------१०
Hits: 745