मनाचे श्लोक १११-१२०

Parent Category: मराठी संस्कृती Category: मनाचे श्लोक Written by सौ. शुभांगी रानडे

हिताकारणे बोलणे सत्य आहे ।
हिताकारणे सर्व शोधूनि पाहे ॥

हिताकारणे बंड पाखांड वारी ।
तुटे वाद संवाद तो हीतकारी ॥१११॥

जनी सांगता ऐकता जन्म गेला ।
परी वादवेवाद तैसाचि ठेला ॥

उठे संशयो वाद हा दंभधारी ।
तुटे वाद संवाद तो हीतकारी ॥११२॥

जनी हीत पंडीत सांडीत गेले ।
अहंतागुणे ब्रह्मराक्षस जाले ॥

तयाहून व्युत्पन्न तो कोण आहे ।
मना सर्व जाणीव सांडूनि राहे ॥११३॥

फुकाचे मुखी बोलता काय वेचे ।
दिसेंदीस अभ्यंतरी गर्व सांचे ॥

क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे ।
विचारे तुझा तूंचि शोधून पाहे ॥११४॥

तुटे वाद संवाद तेथे करावा ।
विवेके अहंभाव हा पालटावा ॥
जनी बोलण्यासारिखे आचरावे ।
क्रियापालटे भक्तिपंथेचि जावे ॥११५॥

बहू श्रापिता कष्टला अंबऋषी।
तयाचे स्वये श्रीहरी जन्म सोशी ॥

दिला क्षीरसिंधू तया ऊपमानी ।
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥११६॥

धुरू लेकरू बापुडे दैन्यवाणे ।
कृपा भाकिता दीधली भेटि जेणे ॥

चिरंजीव तारांगणी प्रेमखाणी ।
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥११७॥

गजेंद्रू महासंकटी वाट पाहे ।
तयाकारणे श्रीहरी धांवताहे ॥

उडी घातली जाहला जीवदानी ।
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥११८॥

अजामेळ पापी तया अंत आला ।
कृपाळूपणे तो जनी मुक्त केला ॥

अनाथासि आधार हा चक्रपाणी ।
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥११९॥

विधीकारणे जाहला मत्स्य वेगी ।
धरी कूर्मरूपे धरा पृष्ठभागी ॥
जना रक्षणाकारणे नीच योनी ।
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥१२०॥

Hits: 590
X

Right Click

No right click