पेठा
साहित्य :- |
अर्धा किलो जून कोहाळा, सव्वा किलो साखर, चुन्याची निवळी. |
|
कृती : |
कोहाळयाची साल काढून त्याच्या जाड जाड चौकोनी फोडी कराव्यात. फोडींच्या सर्व बांजूनी मोरावळयाकरिता आवळे टोचतात त्याप्रमाणे टोचण्याने टोचे मारून घ्यावेत. नंतर दोन-तीन चमचे चुन्याची निवळी घेऊन ती पाण्यात घालावी व त्या पाण्यात कोहाळयाच्या फोडी घालाव्यात. फोडी बुडेपर्यंत पाणी असावे. दुसऱ्या दिवशी त्या फोडी पाण्याने अगदी स्वच्छ धुऊन नंतर कुकरमध्ये अगर मोदकपात्रात ठेवून वाफ देऊन घ्यावी. वाफवून झाल्यावर त्या फोडी काढून घ्याव्यात. साखरेचा कच्चा पाक करावा व त्यात त्या फोडी घालून एक कढ आणावा. दुसऱ्या दिवशी तो पाक फोडींसह पुन्हा थोडा शिजवून एक कढ आणावा. याप्रमाणे चार-पाच दिवस रोज एक कढ आणून घ्यावा व नंतर पाक अगदी पक्का झाला म्हणजे फोडी पाकातून काढून ताटात पसरून सुकवाव्यात. हा पेठा खावयंास देताना आवडत असेल तर त्यावर थोडे गुलाबपाणी टाकून खावयास द्यावा. |