पौष महिन्यात सुर्य मकर राशीत प्रवेश करतो व उत्तरायण सुरू होऊन उत्तर गोलार्धात राहणाऱ्या आपण भारतीयांना जास्त प्रकाश व उष्णता मिळण्यास सुरूवात होतो. हा दिवस मोठा होतो व रात्र लहान होत असते. म्हणून सर्वांना मकर संक्रमण दिवस हा उत्सवाच्या स्वरूपात स्वागतार्ह वाटतो.
संक्रांतीच्या दिवशी केले जाणारे तीर्थ स्नान व दान पुष्यदायी मानले आहे. या दिवशी प्रयाग, गंगासागर इत्यादी ठिकाणी भक्तांचे प्रचंड मेळे भरतात.
मकरसंक्रांतीची पुराणात अशी कथा सांगितली आहे की संकरासुर राक्षस जनतेचा फार छळ करीत असे यामुळे सर्व लोक हैराण झाले. या राक्षसाचा नि:पात करण्यासाठी परमेश्वराने संक्रांत देवीचा अवतार धारण करून त्या संकरासुराचा वध केला. लोकांचे संकट निवारण होउन सर्व जनता सुखी झाली.
या दिवशी महाराष्ट्रात स्त्रिया मातीच्या घटाचे दान देतात व देवाला तीळ व तांदूळ अर्पण करतात व संक्रांत निमित्य सौभाग्य वाण लुटतात. हा सण परस्परांमध्ये स्नेह व प्रेम असावे असा संदेश देत असल्यामुळे सामाजिक दृष्टीने महत्वाचा आहे. या दिवशी तीळगुळ देतांना ``तीळगुळ घ्या, गोड गोड बोला'' असे म्हणण्याची पध्दत आहे.
या दिवशी लहान थोर सर्व मंडळी विविध रंगाच्या पतंगी उडविण्याचा आनंद लुटतात. संध्याकाळच्या वेळी आकाश विविध रंगांच्या पतंगीने सुशोभित झालेले असते. हा सण परस्परांमध्ये प्रेम व सद्भाव वृध्दिंगत करीत असतो.
|