अनुस्वाराचे नियम

Parent Category: मराठी व्याकरण Category: शुद्धलेखन Written by सौ. शुभांगी रानडे

नियम १:

१.१ स्पष्टोच्चारित अनुनासिकाबद्दल शीर्षबिंदू द्यावा.

उदाहरणार्थ: गुलकंद, चिंच, तंटा, निबंध, आंबा.

१.२तत्सम शब्दातील (= संस्कृतातून मराठी जसेच्या तसे आलेले शब्द) अनुनासिकाबद्दल विकल्पाने पर-सवर्ण (म्हणजे पुढे येणाऱ्या व्यंजनांच्या वर्गातील पंचमवर्णाने) लिहिण्यास हरकत नाही. मात्र अशा वेळी अनुस्वारानंतर येणाऱ्या अक्षराच्या वर्गातील अनुनासिकच पर-सवर्ण म्हणून वापरावे.

उदाहरणार्थ: पंकज = पङ्कज, पंचानन = पञ्चानन, पंडित = पण्डित, अंतर्गत = अन्तर्गत, अंबुज = अंबुज

१.३ पर-सवर्ण लिहिण्याची सवलत फक्त तत्सम शब्दांपुरती मर्यादित आहे. संस्कृत नसलेले मराठी शब्द शीर्षबिंदू (अनुस्वार) देऊनच लिहावेत.

उदाहरणार्थ: 'दंगा, तांबे, खंत, संप' हे शब्द 'दङ्गा, ताम्बे, खन्त, सम्प' असे लिहू नयेत.

१.४ अर्थभेद स्पष्ट करण्यासाठी कधीकधी पर-सवर्ण जोडून शब्द लिहिणे योग्य ठरते. उदाहरणार्थ: वेदांत = वेदांमध्ये, वेदान्त = तत्त्वज्ञान; देहांत = शरीरांमध्ये, देहान्त = मृत्यू.

१.५ काही शब्दांमधील अनुस्वारांचा उच्चार अस्पष्ट असतो किंवा कधीकधी तो उच्चार होतही नाही. अशा शब्दांवर अनुस्वार देऊ नये.

उदाहरणार्थ: 'हंसणे, धांवणे, जेंव्हा, कोठें, कधीं, कांहीं' हे शब्द 'हसणे, धावणे, जेव्हा, कोठे, कधी, काही' असे लिहावेत.

नियम २ :

२.१ य्, र्, ल्, व्, श्, ष्, स्, ह् यांच्यापूर्वी येणाऱ्या अनुस्वारांबद्दल केवळ शीर्षबिंदू द्यावा.

उदाहरणार्थ: सिंह, संयम, मांस, संहार. हे शब्द 'सिंव्ह, संय्यम, मांव्स, संव्हार' असे लिहू नयेत.

२.२ 'ज्ञ' पूर्वीचा नासोच्चारही शीर्षबिंदूने दाखवावा. उदाहरणार्थ: संज्ञा.

नियम ३ :

३.१ नामांच्या आणि सर्वनामांच्या अनेकवचनी सामान्यरूपांवर विभक्तिप्रत्यय व शब्दयोगी अव्यय लावताना अनुस्वार द्यावा. उदाहरणार्थ: लोकांना, मुलांनी, तुम्हांस, लोकांसमोर, घरांपुढे.

३.२ आदरार्थी बहुवचनाच्या वेळीही असा अनुस्वार दिला पाहिजे. उदाहरणार्थ: राज्यपालांचे, मुख्यमंत्र्यांचा, तुम्हांला, आपणांस, शिक्षकांना, अध्यक्षांचे.

नियम ४: वरील नियमांव्यतिरिक्त कोणत्याही कारणांसाठी व्युत्पत्तीने सिद्ध होणारे व न होणारे अनुस्वार देऊ नयेत.या नियमानुसार 'घरें, पांच, करणें, काळीं, नांव, कां, कांच, जों, घरीं' हे शब्द 'घरे, पाच, करणे, काळी, नाव, का, काच, जो, घरी' असे लिहावेत.

Hits: 873
X

Right Click

No right click