मराठी टंकलेखनासाठी इन्स्क्रीप्ट कीबोर्ड
सांगलीतील राजमती कन्या महाविद्यालयात आदर्श माता पुरस्कार सोहळा, सांगलीच्या माजी जिल्हाधिकारी लीना मेहेंदळे यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक २ जानेवारी २०२० रोजी पार पडला.
त्यावेळी मराठी विज्ञान प्रबोधिनी आणि ज्ञानदीप फौंडेशनच्या कार्यकर्त्यांबरोबर एक बैठक झाली. डॉ. रविंद्र व्होरा, मा. तानाजीराव मोरे, विलिंग्डनच्या संस्कृत प्राध्यापिका डॉ. वाडेकर, अरविंद यादव, पीव्हीपीआयटीचे प्राचार्य डॉ. घेवडे,निरंजन सोवनी, ज्ञानदीपच्या तृप्ती रेवणकर व डॉ. रानडे ( मी) या बैठकीस उपस्थित होतो.
मा. लीना मेहेंदळे यांनी मराठी टंकलेखनासाठी इनस्क्रीप्ट कळफलक कसा सर्व दृष्टीने उपयुक्त आहे हे सांगितले. त्यांच्याच आवाजात हे ऐका,
यातील मराठी अक्षरांची माडणी वापराच्या दृष्टीकोनातून अधिक शास्त्रशुद्ध असून सर्व भारतीय भाषांसाठी हीच मांडणी असल्याने कोणत्याही भारतीय भाषेत टंकलेखन करताना तीच पद्धत वापरता येते. या सर्व भाषा ध्वनी आधारित असल्याने लिपी समजली नाही तरी केवळ आवाजावरून त्या भाषेत टाईप करता येते. उदा. मल्याळम लिपीमध्ये मराठीसारखे (डोळे मिटून) टाईप करता येते.
आपल्या कॉम्प्युटरवर मराठी इनस्क्रीप्ट प्रस्थापित करण्यासाठी कंट्रोल पॅनेलमध्ये रिजनल लॅंग्वेज विभागात जाऊन मराठी भाषा निवडावी. नंतर इन्स्क्रीप्ट देवनागरी कीबोर्ड पर्याय निवडावा.
ज्ञानदीप फौंडेशनने याबाबतीत सर्व शाळांत असे मराठी आणि संस्कृत टाईप करायला शिकविण्याचे अभियान सुरू केले आहे. मा. लीना मेहेंदळे यांच्या कौशलम् ट्रस्टचे मार्गदर्शन यास लाभणार आहे.