१४, भावनाशील छायाप्रकाश - १
-----------------------------------------------------------------
सेनानी सानेगुरुजी - राजा मंगळवेढेकर - अनुक्रमणिका
>-----------------------------------------------------------------
१४, भावनाशील छायाप्रकाश - १
गुरूजी परत खानदेशात आले. कामाला लागले. पायाची भिंगरी फिरू लागली. खेड्यापाड्यांतून वाणी घुमू लागली. याच सुमारास सरकारने कुप्रसिद्ध जातीय निवाडा जाहीर केला. तो जाहीर होताच गांधीजींना अपार वेदना झाल्या. त्यांनी
येरवड्याच्या कारागृहातच उपोषण आरंभले. सर्व खळबळ माजली. देशभरचे मोठमोठे नेते येरवड्याला आले. डॉ. आंबेडकरही आले. हिंदू समाजात फूट पाडणाऱ्या ह्या निवाड्याला विरोध केला पाहिजे, असे गांधीचे म्हणणे होते. डॉ. आंबेडकरांशी वाटाघाटी झाल्या. त्याही महापुरुषाने समजुतीने घेतले. ब्रिटिशांचा कुटिल डाव ओळखला आणि गांधी-आंबेडकर यांच्यात तडतोड झाली. 'पुणे करार' म्हणून तो ओळखला जाते. गांधीजींनी उपोषण सोडले.
गांधींजींनी “चळवळ चालू ठेवलीच पाहिजे, मात्र ती कायदेभंगाच्या स्वरूपात न ठेवता वैयक्तिक सत्याग्रहाच्या स्वरूपात चालावी, तरच सत्याग्रहाचा स्फुलिंग जिवंत राहील आणि तो जिवंत राहिला तरच पुढे काही पेटण्याची आशा आहे.”
असे चळवळीच्या संबंधाने आपले मत व्यक्त केले होते. गांधीजींचा हा सल्ला सर्वच देशभक्तांनी मानला. गुरुजींनीही असा सत्याग्रह २६ जानेवारी १९३४ रोजी केला. त्यांना चाळीसगाव तालुक्यात अटक झाली. मॅजिस्ट्रेटने त्यांना चार महिन्यांची शिक्षा दिली. दिलेला 'ब' वर्ग नाकारून गुरुजींनी धुळे तुरुंगात 'क' वर्ग स्वीकारला. या वेळीही तिथे चक्की पिसली.
या कारावासातही गुरुजींचे लेखन चालूच होते. महर्षी टॉलस्टॉय यांच्या 'What is Art?' या प्रसिद्ध ग्रंथाचा अनुवाद केला. काव्यलेखनही चालू होते.
विपत्ति ही चित्त-विकास माता ।
दुजा नसे सदगुरु बोध-दाता ॥
विपत्ति मानीन सदा पवित्र ।
विपत्ति माझे घडवी चरित ॥
विपत्ति मानीन मनी अमोल ।
विपत्ति माझे बनवील शील ॥
विपत्ति आकार मनास देई ।
विपत्ति खोटे भ्रम दूर नेई ॥
असे एक प्रकारचे 'विपत्ति-स्तोत्र'च त्यांनी या कवितेत गायलेले आहे. 'देवा, तुझी सदैव आठवण रहावी म्हणून आपदाच दे' असा जसा वर कुंतीने श्रीकृष्णाकडे मागितला होता, तशीच ही विपत्तीची मागणी विकासासाठी गुरुजी करीत आहेत.
देशभक्तीप्रमाणेच ईश्वरभक्तीचीही गाणी गुरुजींनी लिहिली आहेत. त्यांचे पुढील प्रसिद्ध गीत याचवेळी लिहिलेले आहे--
असो तुला देवा । माझा सदा नमस्कार ।
तुझ्या दया-दातृत्वाला अंत नाही पार ।
तुझ्या कृपेने रे होतिल फुले फत्थराची
तुझ्या कृपेने रे होतिल मोती मृत्तिकेची
तुझ्या कृपेने रे होतिल सर्व रम्य हार
असो तुला देवा । माझा सदा नमस्कार ॥
तुझ्या कृपेने रे होईल उषा त्या निशेची
तुझ्या कृपेने रे होईल सुथा त्या विषाची
तुझ्या कृपेने रे होईल पंगु सिंधुपार
असो तुला देवा । माझा सदा नमस्कार ॥
तुझ्या कृपासिंधुमधला बिंदु जरि मिळेल
तरी प्रभो! शतजन्माची मतृषा शमेल
तुझे म्हणुनि आलो रामा । बघत बघत दार
असो तुला देवा । माझा सदा नमस्कार ॥
-----------------------------------------------------------------
सेनानी सानेगुरुजी - राजा मंगळवेढेकर - अनुक्रमणिका
>-----------------------------------------------------------------