८. स्व-तंत्र शिक्षक - २

Parent Category: मराठी पुस्तके Category: सेनानी साने गुरुजी Written by सौ. शुभांगी रानडे

-----------------------------------------------------------------
सेनानी सानेगुरुजी - राजा मंगळवेढेकर - अनुक्रमणिका
>-----------------------------------------------------------------

८. स्व-तंत्र शिक्षक - २

“खरा शिक्षक होता होईतो मुलांना शारीरिक शिक्षा करणार नाही. त्यांना दमदाटी करणार नाही. त्यांच्यावर दात-ओठ खाणार नाही. पुस्तक फेकून मारणार नाही. खरा शिक्षक मुलांना भ्याड बनवणार नाही. मलीन होऊ देणार नाही. खरा
शिक्षक हसत-खेळत शिकवील. तो मुलांच्या आत्म्याचं वैभव ओळखील व त्यावर दृष्टी ठेवून सदैव वागेल, बोलेल, चालेल. मुलं म्हणजे राष्ट्राचं खरंखुरं भांडवल!मुलं म्हणजे उद्याचं भव्य भविष्य! मुलं म्हणजे देवाघरचा संदेश आणणारा प्रेषित!
मुलं म्हणजे मोदमूर्ती! आनंदाचे माहेरघर! मुलं म्हणजे चैतन्याचे कोंभ! स्फूर्तीच्या कळ्या! देवाला सर्वात जास्त प्रिय कोणी असेल, तर ती मुलं होत. मुलांजवळ राहण्याची, हसण्या-खेळण्याची, बोलण्या-चालण्याची संधी येणं म्हणजे सोन्याची
संधी मिळणं. जो मुलांशी असहकार्य करतो, रडवितो तो प्रभूला मारतो, रडवितो...

“परंतु अशा पवित्र भावनेनं रंगलेले, या थोर दृष्टीनं बघणारे कितीसे शिक्षक आपणास आढळून येतील? ए गद्ध्या, ए बैला, ए शुंभा, ए मूर्खा, ए टोणग्या अशा शेलक्या संबोधनांनीच मुलांची पावलोपावली संभावना घरी-दारी, शाळेत सगळीकडे होत असते. वर्षानुवर्षे ज्या मुलांच्या कानावर या शिव्याशापांचा वर्षाव होत असेल तो मुलं गद्धे व बैल, मूर्ख व टोणगी न झाली तरच आश्चर्य!”

गुरुजींची शैक्षणिक दृष्टी शाळेच्या भिंतीपुरतीच मर्यादित नव्हती. ती फार व्यापक होती.

गुरुजींचे शिक्षणविचार असे मूलभूत स्वरूपाचे मौलिक आहेत. लिहिणे, वाचणे, घोकणे आणि परीक्षा देणे एवढ्या संकुचित अर्थाचे शिक्षण गुरुजींना कधीच अभिप्रेत नव्हते. जीवन फुलविणाऱ्या, खुलविणाऱ्या व आनंदमय करणाऱ्या साऱ्या प्रवृत्ती आणि कला यांचाही त्यांच्या शिक्षणविचारात समावेश होता. उघड्या सृष्टीत मुलांनी फुलपाखरासारखे स्वच्छंदपणे बागडावे, विहरावे, लहरावे आणि झाडेझुडे, लताफुले, पशुपक्षी, नदीनाले, डोंगरदरी, शेतमळे, समुद्रआकाश या सर्व सृष्टोशी
त्यांचा परिचय व्हावा आणि मैत्र जुळावे, निसर्गाशी मुलांना हृदयसंवाद साधता यावा, गुजगोष्टी करता याव्यात, अशी त्यांची शिक्षणदृष्टी होती!

गुरुजी म्हणत असत, “मुले ज्याच्याभोवती पिंगा घालतात तो शिक्षक चांगला!” अंमळनेरच्या शाळेत काय किंवा पुढे महाराष्ट्रात काय, गुरुजींच्या भोवती शेकडो मुलं गुळाच्या ढेपीभोवती मुंगळे जमावेत तशी जमत असत आणि मग प्रभूशी नातं जोडण्याच्या भक्तीनं गुरुजी त्या मुलांना गोष्टी सांगत असत. त्यांना रिझवीत असत. हसवीत असत. त्यांच्या हृदयातील करुणा जागवीत असत. त्यांना आनंदविभोर करून टाकत असत! गोष्ट लहान, पण तिची शक्ती महान! हे गोष्टीतलं मर्म गुरुजींनी पूर्णपणानं जाणलेलं होतं. शिक्षण, संस्कार, शुभदृष्टी, भलं वळण, एकूण व्यक्तिमत्त्व विकासातील गोष्टींचं साधन किंवा माध्यम केवढं प्रभावी आहे, हे त्यांनी चांगलं ओळखलं होतं. हसत-खेळत सांगितलेल्या गोष्टींतून मूल जेवढं शिकतं, तेवढं उपदेशाचे घुटके देणाऱ्या उपदेशपर व्याख्यानातून आणि तात्पर्य सांगणाऱ्या धड्यांतून शिकत नाही. बालांची ही आनंद-प्रवृत्ती त्यांनी हेरलेली होती. गोष्टींप्रमाणेच गाणी, खेळ, संगीत, नृत्य, नाट्य, चित्र इत्यादी बालांना प्रिय असणाऱ्या आनंद-प्रवृत्तींवरही शिक्षणात भर असायला हवा, असं त्यांचं मत होतं. त्यांनी लिहिलेल्या एका सुंदर पत्रात एके ठिकाणी ते म्हणतात, “शाळांतून असे नाट्यप्रवेश वरचवेर व्हावेत. त्यामुळे भावना वाढतात. कलासंवर्धन होते. शिक्षकांनीदेखील त्यात सामील व्हावे. महान शिक्षणशास्रज्ञ गिजुभाई बधेका मुलांबरोबर नाटकात काम करायचे. रवींद्रनाथही करीत. मुलांमध्ये मिळून-मिसळून पुन्हा एक प्रकारे अलिप्त शहण्याची कला खऱ्या शिक्षकाजवळ असायला हवी.”

निसर्गाचा आणि मुलांचा सतत संबंध, सतत सानिध्य, याला साने गुरुजी फार महत्त्व देत असत. निसर्गप्रेम, मानवेतर सृष्टीशी मैत्री व मानवतेच्या प्रेमधर्माची शिकवण या गोष्टींचा त्यांनी रवींद्रनाथांप्रमाणेच सतत उद्घोष केलेला आहे. सदैव
पुरस्कार केलेला आहे. रवींद्रनाथांनी आपल्या 'शांतिनिकेतन'मध्ये निसर्गाच्या उघड्या शाळेत मुलांना सर्व विषयांबरोबरच कला साधनेचेदेखील पाठ स्वच्छंदपणे घेण्याची उपलब्धता निर्माण केली होती. गुरुजींचीसुद्धा शैक्षणिक दृष्टी अशीच
होती. शिक्षण, शिक्षक व शाळा या विषयी त्यांची कल्पनाही अशीच होती.

Toungs in Trees
Books in Brooks
Sermon in Stories...

वाहत्या झऱ्यातील पुस्तकं, पाषाणातील प्रवचनं, झाडांमधील संगीतसुद्धा मुलांना कळलं पाहिजे, असं शेक्सपिअरनं म्हटल्याप्रमाणेच गुरुजींनाही वाटत होतं. तसंच व्हिक्टर ह्युगोनं म्हटल्याप्रमाणे त्यांनाही वाटत असे,

To grow Flowers by Day
to see Stars at Night

दिवसा आपण फुलं फुलवावीत आणि रात्री आकाशाच्या बागेतील देवाची फुलबाग बघावी!

गुरुजींचं निसर्गशिक्षण असं होतं. त्यांच्या दृष्टीने सृष्टीतील महाकाव्य म्हणजे समुद्र! ह्या सृष्टिवैभवानं वैभवी बनविणारं शिक्षण त्यांना प्रिय होतं.

पण या सौंदर्यसक्त मनाला श्रमाची श्रेष्ठता, महत्ता कळली पाहिजे व श्रमशिक्षणाचीही जोड शिक्षणात असली पाहिजे, असं गुरुजींना वाटे. ते म्हणत असत, “शिक्षण विशाल हवं, जीवनाशी संबद्ध हवं, डेन्मार्क वर्गैरै देशातील प्राथमिक शाळा शेतीशी जोडल्या आहेत. आपल्या देशातही शेती, विणकाम वगेरे खेड्यातील प्रमुख धंद्यांशी शाळा जोडलेल्या असल्या पाहिजेत. गांधीजींची शिक्षणदृष्टीदेखील अशीच होती आणि तिच्या आधरावरच नई-तालीम-- नवीन शिक्षणाचा विचार उभारलेला होता.”

-----------------------------------------------------------------
सेनानी सानेगुरुजी - राजा मंगळवेढेकर - अनुक्रमणिका
>-----------------------------------------------------------------

Hits: 70
X

Right Click

No right click