मनोगत - राजा मंगळवेढेकर

Parent Category: मराठी पुस्तके Category: सेनानी साने गुरुजी Written by सौ. शुभांगी रानडे

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने 'महाराष्ट्राचे शिल्पकार' या शीर्षकाखाली ग्रंथमालेची एक योजना हाती घेतली आहे. या योजनेत 'सानै गुरुजी' या थोर व्यक्तीच्या जीवनचरित्राचा व कार्याचा परिचय करून देणाऱ्या ग्रंथाचा समावेश करण्यात आला आहे. आणि हा ग्रंथ लिहिण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे, हे मी माझे भाग्य समजतो!
साने गुरुजींचे बृहद्‌ चरित्र लिहिण्याची जबाबदारी सुमारे ३० वर्षांपूर्वी साधना ट्रस्टचे अध्यक्ष श्री. एस. एम. जोशी यांनी माझ्यावर सोपवली होती. त्या वेळी मी सुमारे अडीच ते तीन वर्षें सर्व महाराष्ट्रभर हिंडून-फिरून गुरुजींच्या हयात
असलेल्या नातेवाईकांशी, त्यांच्या शाळेतील शिक्षकांशी, कारावासातील सत्याग्रहींशी, बेचाळीसच्या लढ्यातील क्रांतिकारक तरुणांशी व गुरुजींच्या अनेक चाहत्यांशी संपर्क व संवाद साधून माहिती काढली. तसेच गुरुजींनी लिहिलेली पत्रे, हस्तलिखिते, लेखांची कात्रणे, नियतकालिके इत्यादी चरित्रसाधने बरीच जमा केली होती.

त्याशिवाय सर्वश्री यदुनाथ थत्ते, मधू लिमये, ग. प्र. प्रधान, एस. एम. जोशी, ना. ग. गोरे, वसंत बापट या नामनिर्देशाव्यतिरिक्तही गुरुजींच्या परिवारातील अनेकांचे सक्रिय सहकार्य लाभले होते. आणि या सहकार्यामुळे “साने गुरुजींची जीवनगाथा? हा गुरुजींचा बृहद्‌ चरित्रग्रंथ साकार झाला तो ११ जून १९७५ रोजी गुरुजींच्या पंचविसाव्या स्मृतिदिनाच्या दिवशी पुण्यात मधू दंडवते यांच्या हस्ते आणि एस. एम. जोशींच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रात २०-३५ ठिकाणी प्रकाशित झाला. मराठी साहित्यात एखाद्या ग्रंथाचा प्रकाशन समारंभ एवढ्या उत्स्फूर्त उत्साहाने समारंभपूर्वक प्रकाशित झाला असे अन्य उदाहरण नसेल! अर्थात, ही सारी पुण्याई गुरुजींची आहे याची खोल जाणीव माझ्या मनात आहे!
साने गुरुजींच्या निधनालाहो आता ११ जून २००० रोजी ५० वर्षें पूर्ण झाली. त्या निमित्ताने या ग्रंथाची चौथी आवृत्ती साधना प्रकाशनातर्फे प्रकाशित झाली आहे. त्यावरून या ग्रंथाला वाचकप्रियताही लाभली आहे.

या चरित्र कहाणीला मी “सेनानी साने गुरुजी' असे म्हटले आहे. कारण गुरुजींच्या आत्यंतिक सेवाभावामुळे व अथांग करुणेमुळे त्यांच्या डोळ्यांतून येणाऱ्या प्रेमाश्रूंमळे आणि विशेषत: 'श्यामची आई' या त्यांच्या अमर अशा करुणरम्य
पुस्तकामुळे गुरुजींच्या व्यक्तित्वाबद्दल ते हळुवार, मुळूमुळू आहेत अशी कल्पना सर्वत्र दिसते. मराठीतले काही टीकाकार त्यांना 'रडके' म्हणूनच समजत होते. परंतु साने गुरुजींनी तुकारामांप्रमाणेच 'मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास । कठिण वज्रासी भेदु ऐसे' अशा बाण्याने व 'रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग' या जागृत जाणिवेने प्रत्येक क्षेत्रात क्रांतिकारकता प्रकट केली आहे. विद्यार्थी, महिला, किसान आणि कामगार यांच्या प्रश्‍नासाठी वेळोवेळी लढे दिले आहेत. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात अस्पृश्य बांधवांना दर्शनासाठी प्रवेश मिळावा म्हणून प्राणांतिक उपोषणाचे दिव्यही आरंभिले होते. त्यांच्या या प्रयत्नाने 'महाराष्ट्राचा बडा बंडवाला' ज्ञानेश्वर यांनी १३व्या शतकात सुरू केलेली सामाजिक क्रांती, परंतु जी पंढरपूरच्या वाळवंटात थबकली होती ती पाउले २०व्या शतकाच्या मध्यास गुरुजींनी प्रत्यक्ष पांडुरंगाच्या चरणापाशी नेऊन पोचवली.

त्या काळी देशाच्या स्वातंत्र्याला गांधीजींच्या नेतृत्वाखाली देशात भरास आला होता. साने गुरुजी हे त्या वेळी प्रत्येक लढ्यात मोठ्या हिरिरीने उतरले होते. आणि अनेक वेळा तुरुंगवासही भोगला होता. गुरुजींच्या व्यक्तिमत्वातच एक सर्वस्व
समर्पणाची भावना ज्वलंतपणाने वास करीत होती आणि म्हणूनच गिरणीकामगाराचा प्रश्न असो, स्त्री-कामगारांचा लढा असो, काँग्रेसची निवडणूक असो वा बेचाळीसच्या चळवळीसारखा स्वातंत्र्याचा अंतिम लढा असो गुरुजी हे वीर
पुरुषाप्रमाणे स्वत: उठले, देशातल्या तरुणांना उठवले, स्वत: पेटले आणि देशातल्या असंख्य तरुणांनाही पेटवले. त्यांनीच एके ठिकाणी म्हटले आहे, "एका अमेरिकन कवीच्या काव्यातील काव्यपंक्ती मला फार आवडते. "When I give, I give them all." “देताना मी सर्वस्वाने देतो. हात राखून देण्याची प्रवृत्ती मला मानवत नाही.” आणि याच भावनेने गुरुजी आयुष्यभर लढले, झुंजले आणि महाराष्ट्रातील तरुणांचे 'सेनानी' बनले. या क्रांतिकारक व्यक्तिमत्त्वावर या जीवनकहाणीमध्ये विशेषत: भर दिलेला आहे.

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने महाराष्ट्राच्या या नामवंत शिल्पकाराचे छोटे जीवनचरित्र लिहिण्याची जी संधी दिली आणि त्यामुळे साने गुरुजींच्या स्मृतिसहवासात पुनश्च काही काळ मला राहता आले त्याबद्दल मी
मंडळाच्या अध्यक्षांना मन:पूर्वक धन्यवाद देतो.

हे चरित्र लिहिण्याच्या कामी डॉ. सौ. शुभांगी कुलकर्णी यांनी जी बहुमोल मदत केली आहे त्याबद्दल त्यांचे 'आभार' या नुसत्या कोरड्या शब्दाने उपचार म्हणून उल्लेख करणे भागणार नाही, तर त्यांनी जे श्रम घेतले त्यालबद्दल मी त्यांच्या ऋणात राहणे पसंत करतो.

लेखक - राजा मंगळवेढेकर, सेनानी साने गुरुजी

Hits: 71
X

Right Click

No right click