२२. 'कर्तव्य' आणि “साधना'

Parent Category: मराठी पुस्तके Category: सेनानी साने गुरुजी Written by सौ. शुभांगी रानडे

-----------------------------------------------------------------
सेनानी सानेगुरुजी - राजा मंगळवेढेकर - अनुक्रमणिका
>-----------------------------------------------------------------

२२. 'कर्तव्य' आणि “साधना'

पंढरपुराहून परतल्यावर गुरुजी एक-दोन महिने बंधूंकडे बोर्डीला राहिले. उपवासाने आलेली शारीरिक क्षीणता थोडी कमी झाली; परंतु उपवासाच्या-निमित्ताने जे काही भलेबुरे घडले होते, त्याने आलेली मानसिक खिन्नता गेलेली नव्हती. म्हणून
गुरुजी कुठे जात-येत नव्हते.

१५ ऑगस्ट १९४७ रोजी देश स्वतंत्र झाला. त्या वेळी गुरुजी पुण्यात आपल्या प्रसूत वहिनींची सेवा करीत होते. त्या दिवशी त्यांनी राहत्या खोलीवर राष्ट्रीय झेंडा लावला. तोरण बांधले. संध्याकाळी मेणबत्त्या लावून आरास केली. मन:पूर्वक
आनंदाने, पण साधेपणाने, गंभीरपणाने, मूकपणाने त्यांनी स्वातंत्र्याचे स्वागत केले होते. गांधीजींनीही त्या दिवशी नौखालीच्या वाटेवर कलकत्त्याला उपोषण केले.

मित्रांच्या आग्रहाने पुढे गुरुजींनी मुंबईत 'कर्तव्य' नावाचे सायंदैनिक काढावयाचे ठरवले. त्याची जुळवाजुळव सुरू झाली होती. परंतु ३० जानेवारी १९४८ रोजीच महात्माजींचा दिल्लीत वध झाला. गुरुजींवर दु:खाचे आकाशच कोसळले.
गुरुजींच्या जीवनात गांधीजींना अनन्यसाधारण असे स्थान होते.

“एक पराधांश गांधी, एक पराधांश रवींद्रनाथ, एक पराधांश रामकृष्ण हा माझा आदर्श आहे. गांधीजींची सेवावृत्ती, रवीद्रांची कवित्ववृत्ती आणि रामकृष्णांची भक्ती यांचे मिश्रण माझ्यात आहे. हात थोडेफार सेवेत राबावेत, ओठ एखादे गोड गाणे
गुणगुणत असावेत आणि भक्तीने सर्वांविषयीच्या प्रेमाने हदय भरलेले असावे ह्या तीन माझ्या क्षुधा आहेत. ह्या तीन वृत्ती समाधान पावल्या की मी समाधानी राहीन.” असे गुरुजी म्हणत असत. गांधीजींवर त्यांची अपार भक्ती होतो. गांधीजींना
गुरुजींच्या जीवनात सूर्यासारखे स्थान होते. म्हणूनच त्यांनी गांधीहत्येनंतर “माझ्या जीवनातील सूर्य मावळला!” असे दु:खोदगार काढले होते.

गांधीजींचा खुनी महाराष्ट्रीय आहे हे कळल्यावर तर गुरुजींना फारच वाईट वाटले. ते व्यथित बनले. महाराष्ट्रावरचा हा कलंक अंशत: तरी दूर व्हावा, त्या पापाचे प्रायश्चित्त घ्यावे, महाराष्ट्राच्या जीवनातून जातीयता नष्ट व्हावी, या हेतूंनी
एक महाराष्ट्रीय म्हणून गुरुजींनी १ फेब्रुवारी १९४८ पासून २१ दिवसांचे उपोषण आरंभिले होते. याच उपोषण काळांत ११ फेब्रुवारीपासून गुरुजींनी 'कर्तव्य' सायंदैनिकाचे प्रकाशन सुरू केले होते. 'कर्तव्य' दैनिकाच्या मथळ्याच्या ठिकाणी गांधीजींच्या
रेखाचित्राखाली गुरुजींनी पुढील ब्रीदवचन छापले होते :

“स्मरुनी हृदयी तूंते । कर्तव्य निज चालवूं ।”

गुरुजींचे २१ दिवसांचे उपोषण पार पडले. या काळात महाराष्ट्रभर सेवादलाने जातीयताविरोधी प्रचार केला. 'कर्तव्य' दैनिकापासून गुरुजींनी “बापूजी'च्या गोड गोष्टी” प्रथम लिहिल्या.

पारतंत्र्यात परक्या सत्तेशी गुरुजींना झुंज घ्यावी लागली होती, पण स्वातंत्र्यातही हे टळले नव्हते. स्वातंत्र्य मिळून सात-आठ महिनेच झाले होते. पण गांधीवधाचे निमित्त करून गृहमंत्री मोरारजी देसाई यांनी जातीय संस्थेबरोबरच राष्ट्रसेवादलावरही बंदीचा वरवंटा फिरवला होता. गुरुजींनी 'कर्तव्य' दैनिकातून या अन्यायाचा कडाडून विरोध केला.

'कर्तव्य' सायंदैनिक जेमतेम चार महिने चालले आणि पुढे ते आर्थिक ओढाताणीमुळे बंद पडले. 'कर्तव्य' दैनिक बंद झाले, पण गुरुजींसारख्या समाज शिक्षकाला व सेवकाला असे कर्तव्यच्युत होऊन राहणे कसे आवडणार? त्यांची तगमग
चाललेलीच होती. स्वातंत्र्यानंतरचे प्रश्‍न पुढे ठाकले होते. त्यांना सामोरे जायचे होते. लेखणी हे गुरुजींचे एक अमोघ साधन होते. तिच्या उपासनेतच त्यांना पुढची साधना करावी अशी तळमळ वाटत होती. आणि या तळमळीतूनच १५ ऑगस्ट
१९४८ ग्रेजी दुसऱ्या स्वातंत्र्यदिनी 'साधना' साप्ताहिकाचा मुंबईत जन्म झाला.

गुरुजींच्या कुशल, चतुरस्र, साक्षेपी संपादनाखाली “साधना” साप्ताहिक लवकरच महाराष्ट्रात लोकप्रिय झाले. “लिहिणे हा माझा थोडासा स्वधर्म आहे. परंतु ती माझी जीवनव्यापी वृत्ती नाही. मी झाडूच्या लालित्याचा उपासक आहे. मी
'साधना' चालवितो काही विचार जनतेत जावे, अशी तहान वाटते म्हणून.” असे आपल्या लेखन प्रवृत्तीबद्दल गुरुजींनीच म्हटले आहे.

“साधना” साप्ताहिकाच्या प्रकाशनाबद्दल त्यांनी लिहिले होते, “वैरभाव नि विषमता नष्ट करण्याची थोर साधना आपणास करवयाची आहे, या ध्येयाने हे 'साधना' साप्ताहिक निघत आहे...”

'साधने'च्या प्रत्येक अंकात विविध विषयांवर गुरुजी लिहीत असत. गुरुजींच्या कामाच्या झपाटा और होता. अंकासाठी त्यांच्याकडे मजकुराला कधीच तोटा नसे.ते स्वत: तर पुष्कळ लिहीतच, पण अनेक वेळा दुसऱ्यांचे आलेले काही लेखही
अनेक वेळा लिहून काढीत असत. अग्रलेख, माहितीपर लेख, परिचय, व्याख्यानांचे सारांश, गोष्टी, चरित्रे, कितीतरी बहुमोल असे ललित व वैचारिक साहित्य गुरुजींनी 'साधने'तून भरभरून वाचकांना दिले. लोकशाही समाजवाद हेच स्वातंत्र्योत्तर ध्येय
ठरवून त्यांनी 'साधने'तून समाजवादी विचारांचा आणि आंदोलनांचा हिरिरीने पुरस्कार केला.

'साधने'च्या व्यापातून वेळ होत नसे, पण तरीही कधी कधी मित्रांच्या आग्रहावरून ते दौऱ्यावर जात असत. भाषणे, मेळावे करीत असत. अन्यायाचे तर ते दावेदारच होते. न्यायासाठी संघर्षाला ते माघारी रहात नसत. असाच एक समरप्रसंग स्वातंत्र्यातही उभा राहिला. १९४९च्या ऑक्टोबरमध्ये काँग्रेस मंत्रिमंडळाने शिक्षणखात्यामार्फत एक पत्रक काढून शिक्षक व विद्यार्थी यांना राजकारणात भाग घेण्यास बंदी घातली होती. या निर्बंधाने गुरुजी अस्वस्थ झाले. त्यांना जबर धक्काच बसला होता. स्वातंत्र्यात स्वातंत्र्यावर स्वतंत्र सरकारकडून असा काही घाला येईल, स्वातंत्र्याचा अशा प्रकारे संकोच केला जाईल, याची गुरुजींना स्वप्नातही कल्पना नव्हती. स्वातंत्र्याचे अतीव सुंदर, सुरेख रूप ते मनाशी वर्षे रंगवीत आले होते. परंतु स्वातंत्र्यानंतर घडत चाललेल्या एकेक घटनांनी त्यांचा मनोभंग होत चालला होता. सेवादलावर बंदी, त्यानंतर ही बंदी. गुरुजींनी 'साधने'तून कडक टीका केली, “सरकारच्या या हुकुमाचा माझ्या प्राणार्पणाच्या निर्धाराने निषेध करावयाचा असे मी ठरविले आहे. हे सरकार ठायी ठायी अन्याय करीत आहे. मी दु:खी होत आहे. यासाठी का राष्ट्र लढले? हे का स्वातंत्र्याचे फळ? मला वेदना होतात...”

मुंबईतील एका सभेत गुरुजींनी सरकारी हुकूम टरकावून जाहीर निषेध केला ! २४ ढिसेंबरपासून उपोषणाचा निर्णय जाहीर केला. महाराष्ट्रातील विचारवंत, वृत्तपत्रे आदींनीही या सरकारी हुकुमावर टीका केली होती.
चोहोकडून झालेल्या टीकेमुळे व गुरुजींच्या उपोषणाच्या निर्धाराने उशिरा का होईना, सरकारचे डोळे उघडले आणि ते लोकशाही व स्वातंत्र्यविरोधी काळे फर्मान सरकारने मागे घेतले.
गुरुजींचे २४ डिसेंबरपासूनचे संकल्पित उपोषण रद्द झाले आणि त्याच दिवशी शिवाजी पार्कवर सेनापती बापट यांच्या अध्यक्षतेखाली गुरुजींचा पन्नासावा वाढदिवस साजरा करण्यात आला.

-----------------------------------------------------------------
सेनानी सानेगुरुजी - राजा मंगळवेढेकर - अनुक्रमणिका
>-----------------------------------------------------------------

Hits: 79
X

Right Click

No right click