२०. कुमारांशी हितगूज

Parent Category: मराठी पुस्तके Category: सेनानी साने गुरुजी Written by सौ. शुभांगी रानडे

-----------------------------------------------------------------
सेनानी सानेगुरुजी - राजा मंगळवेढेकर - अनुक्रमणिका
>-----------------------------------------------------------------

२०. कुमारांशी हितगूज

मुले म्हणजे देव मुले म्हणजे देव ।
मुले म्हणजे राष्ट्राची मोलाची ठेव ॥

असा श्रद्धायुक्त प्रेमभाव मुलांविषयी गुरुजींच्या मनीमानसी नित्य नांदत असे. हसरी- नाचरी मुले हे त्यांच्या सौख्याचे निधान होते. मुलांच्या मनोरंजनात साऱ्या वृत्तींसह ते तन्मय होऊन जात असत. एका कवितेत ते म्हणतात -


वारा वदे कानामधे
गीत गाईन तुला
ताप हरीन, शांति देईन
हस रे माझ्या मुला !

चिमणी येऊन, नाचून बागडून
काय म्हणे मला
चिवचिव करीन, चिंता हरीन
हस रे माझ्या मुला !

हिरवे हिरवे, डोले बरवे
झाड बोले मला
छाया देईन, फळ-फूल देईन.
हस रे माझ्या मुला !

अशा अंतरीच्या वात्सल्य-उमाळ्यामुळेच गुरुजींनी कुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद स्वीकारले होते. एरवी ते साहित्य संमेलनांपासून दूर रहात असत. मोठमोठ्या साहित्यिकांमध्ये मिसळण्यास त्यांना भारी संकोच वाटे. इतके विविध प्रकारचे आणि विपुल लिहूनही त्यांनी स्वत:ला कधी साहित्यिक म्हणवून घेतले नाही, कलादृष्ट्या त्यांच्या साहित्याचे मूल्यमापन कोणी विद्वान समीक्षक करू लागले, तर ते नम्रपणाने म्हणत असत, “कला मला समजत नाही.” राष्ट्र, समाज, व्यक्ती यांच्या सेवेच्या साधनेसाठी म्हणून जी काही माध्यमे गुरुजींनी वापरली, त्यात लेखणी आणि वाणी ही दोन माध्यमे त्यांनी त्यांच्या उद्दिष्टांच्या संदर्भात अत्यंत प्रभावीपणे वापरली. ध्येयासाठी राष्ट्र उठवण्याचे, समाज जागरणाचे जे कार्य कार्यकर्त्यांनी अंगीकारलेले होते, त्याच कार्याचा एक भाग म्हणजे त्यांचे साहित्य होते.

पण मोठ्यांच्या साहित्य संमेलनापासून ते दूर राहिले, तरी छोट्यांवरील प्रेमाने ते अध्यक्ष बनले. हे 'कुमार साहित्य संमेलन' पुणे येथे २४ डिसेंबर १९४६ रोजी भरले होते. गुरुजींचा ४७ वा वाढदिवसही त्या दिवशी होता. गुरुजींना मुलांविषयी जसे मातृवात्सल्य वाटे, तसेच मुलांनाही गुरुजीविषयी मातृभक्ती वाटे. ते "कुमारांचे गांधी'च होते! कुमारांनीही या वेळी गुरुजींचा सत्कार करून एक हजार रुपयांची गुरुदक्षिणा दिली.

या संमेलनाच्या अध्यक्षपदावरून बोलताना आपले सगळे अंत:करण गुरुजींनी कुमार साहित्यिकांच्या पुढे मोकळे केले; आपल्या साहित्यनिर्मितीचा अनुभव सांगताना ते प्रारंभीच म्हणाले,

“माझे हृदय रिते करीत असताना मला अपार आनंद होई. मी भावनांवर नाचत लिहिले. लिहिताना रडे, संतापे, रोमांचित होई. अनेक वेळा असा अनुभव आला आहे की, लिहून झाल्यावर गळून गेल्याप्रमाणे होई. अपार भूक लागे. जणू मी माझ्या लिहिण्यात रक्त ओतत होतो. सारे प्राण ओतत होतो. माझे वाड्मय कसेही असो, त्यात मी रक्त ओतलेले आहे. ते रद्दड असले तरी त्यात प्राण आहे. तेथे रक्त आहे, अश्रू आहेत. माझ्या वाड्मयाला हात लावाल तर माझ्या हृदयाला हात लावाल. माझे वाड्मय माझी वाड्मयीन मूर्ती आहे.

यानंतर गुरुजींनी कुमारांना “सभोवतीच्या मानवी जीवनाशी एकरूप व्हा. प्राचीन, त्याचप्रमाणे अर्वाचीन--आजचाही -इतिहास अभ्यासा, निसर्गाशी एकरूप व्हा, थोर थोर देशी-विदेशी, प्राचीन-अर्वाचीन ग्रंथकारांचा अभ्यास करा”. असा उपदेश करून कुमार साहित्याबद्दल ते म्हणाले, “कुमारांसाठी अनेक विषयांवरची हजार हजार तरी पुस्तके तयार करायला हवीत. जर्मनीत १९१४ पूर्वी मुलांसाठी एकेका शास्त्रीय विषयावरची पाऊणशे पाऊणशे छोटी पुस्तके तयार केली गेली होती. वनस्पतींवरची, ताऱ्यांवरची, इंजिनावरची, मोठमोठी चित्रे, त्यात नाना भाग रंगीत. मुलांची जिज्ञासा वाढवायला हवी.

कुमारांना प्रत्यक्ष कार्यांची कल्पना देताना गुरुजी म्हणाले, “महाराष्ट्रभर हिंडून सारे परंपरागत वाड्मय गोळा करा. सर्व प्रकारच्या गोष्टी, आख्यायिका, दंतकथा गोळा करा. जर्मनीतील ग्रिमबंधूंनी बारा वर्षे हिंडून अशा गोष्टी गोळा केल्या. त्या गोष्टी जगातील मुलांना आनंदवीत आहेत. आपल्या महाराष्ट्रात ग्रिमबंधू केव्हा निर्माण होणार? मुलांनी आपल्या आयुष्यातील मार्मिक आठवणी, प्रसंग लिहून काढावे... जुने वाड्मय गोळा करा. सुंदर अनुवाद करून .नवीन निर्मितीही करा. साहित्याचे तुम्ही थोर उपासक व्हा आणि साहित्याद्वारा जीवनाचे उपासक व्हा !”

गुरुजींनी कुमारांशी कळकळीने हितगूजच केले होते.

-----------------------------------------------------------------
सेनानी सानेगुरुजी - राजा मंगळवेढेकर - अनुक्रमणिका
>-----------------------------------------------------------------

Hits: 75
X

Right Click

No right click