१८. वैयक्तिक सत्याग्रह
-----------------------------------------------------------------
सेनानी सानेगुरुजी - राजा मंगळवेढेकर - अनुक्रमणिका
>-----------------------------------------------------------------
१८. वैयक्तिक सत्याग्रह
गुरुजी धुळ्याच्या कारागृहात गेले, त्या वेळी राजकीयदृष्ट्या एका विमनस्क मनःस्थितीतच होते. कामगार चळवळीत गुरुजींचा कम्युनिस्ट मंडळींशी निकटचा संबंध आलेला होता. दुसरे महायुद्ध सुरू झाल्यानंतर ज्या घडामोडी झाल्या, त्यात
भारतीय कम्युनिस्टांचे दुटप्पी धोरण लक्षात आल्यावर तर ते अस्वस्थ बनले होते. युद्धाच्या सुरुवातीला त्यांचे काँग्रेसप्रमाणेच युद्धविरोधाचे थोरण होते. परंतु जर्मनीने रशियावर हल्ला केला आणि रशियाला ब्रिटनशी दोस्ती करणे भाग पडले. रशियाने असा पवित्रा बदलताच रशियाकडेच डोळे लावून वागणाऱ्या येथल्या कम्युनिस्टांनीही लगेच ब्रिटिशांशी मैत्री जाहीर केली. कालपरवापावेतो जे युद्ध साम्राज्यशाही बळकट करणारे आहे म्हणून त्याविरुद्ध सामुदायिक लढा पुकारला पाहिजे, क्रांती केली पाहिजे, अशी गर्जना करणारे आणि स्वत:ला आजन्म क्रांतिकारक म्हणवून घेणारे हिंदी कम्युनिस्ट महात्मा गांधींना प्रतिक्रांतिवादी ठरवून युद्ध सहकार्याची भाषा बोलू लागले! रशियावरील हिटलरच्या हल्ल्यामुळे साम्राज्यवादी युद्ध हे त्यांच्या दृष्टीने ताबडतोब 'लोकयुद्ध' झाले! या घटनांनी गुरुजींचा हिंदी कम्युनिस्टांविषयी फार भ्रमनिरास झाला होता आणि याचवेळी काही समाजवादी मित्रांची संगतसोबत त्यांना कारावासात लाभलेली होती.
राष्ट्रभक्ती, आर्थिक समता आणि बहुजन समाजाचे कल्याण या समाजवाद्यांच्या तत्त्वामुळे गुरुजींनीही समाजवादाची वाट धरली. त्या वेळी काँग्रेसअंतर्गतच समाजवादी पक्ष होता. गुरुजी समाजवादी मंडळींबरोबर काम करू लागले. पण पक्षाचे कधी सभासद झाले नव्हते. कम्युनिस्ट पक्षाचेही सभासद झालेले नव्हते. खरे तर असे आहे की, गुरुजी निखळ मानवतावादी, प्रेमधर्मी होते. त्यांच्यासारख्या मानवतावाद्यांना काँग्रेस, कम्युनिस्ट, सोशालिस्ट आदी पक्षांची चौकट मानवणारीच नव्हतो. गोरगरिबांकरिता जे कोणी झटतील त्यांच्याबरोबर रहायचे, काम करायचे, बहुजनांचे हित साधायचे ही त्यांची वृत्ती होती. रंजलेल्यांना, गांजलेल्यांना आपले म्हणणारे ते साधुवृत्तीचे सत्पुरुष होते! परपीडा जाणून ती दूर करण्यासाठी धडपडणारे ते खरे वैष्णव होते!
धुळ्याच्या या वेळच्या कारावासातही गुरुजींचा लेखन-यज्ञ चालूच होता. या कालावधीत त्यांनी डॉ. राधाकृष्णन् यांच्या दोन पुस्तकांचा अनुवाद केला. 'महात्मा' , गौतम बुद्ध' आणि 'संस्कृतीचे भवितव्य' या नावाने ती पुस्तके प्रसिद्ध झाली.
टेनिसनच्या 'हनॉक ऑर्डन'चे 'तीन मुले' या नावाने कादंबरीत रूपांतर केले. के, के. मेनन यांच्या 'चिल्ड्रेन ऑफ काली' या कादंबरीचा अनुवादही 'कालीमातेची मुले' या नावाने केला. तो पुढे पुस्तकरूपाने प्रसिद्धही झाला. याशिवाय 'संध्या',
'गोड शेवट', 'चित्रकार रंगा' ह्या स्वतंत्र कादंब-याही लिहिल्या.
या अवधीत देशातले वातावरण पुनश्च लढ्याच्या ईर्ष्येने तापू लागलेले होते. १९३९ साली युद्ध सुरू झाल्यावर प्रांतात काँग्रेस मंत्रिमंडळे असतानाही सरकारने त्यांना न विचारता हिंदुस्थानचे युद्धसहकार्व जाहीर करून टाकले. महात्मा गांधींना
व काँग्रेसला हे पसंत पडणे शक्यच नव्हते. म्हणून काँग्रेसच्या मंत्रिमंडळांनी राजीनामे दिले. गांधीजींनी वैयक्तिक सत्याग्रह सुरू केला. पहिले सत्याग्रही म्हणून विनोबांची व दुसरे सत्याग्रही म्हणून जवाहरलाल नेहरूंची निवड गांधीजींनी केलो
होती. युद्धविरोधी भाषण करून ठिकठिकाणी देशभर सत्याग्रही तुरुंगात गेले.
१९४१च्या अखेरीस गांधीजींनी ही चळवळ मागे घेतली. त्याच्या आधी १९४१च्या जानेवारीतच सुभाषबाबू गुप्तपणे अकस्मात देशाबाहेर गेले होते आणि जर्मनीत बर्लिनला पोहोचले होते. देशाबाहेर जाऊन जर्मन-जपानच्या साहाय्याने त्यांनी भारतीय स्वातंत्र्य संग्रामाची जुळवाजुळव सुरू केली होती. त्यांच्या या प्रयत्नातूनच पुढे 'आझाद हिंद सेना' निर्माण झाली आणि तिच्याद्वारा सुभाषबाबूंनी एक तेजस्वी असा इतिहास घडविला.
१९४२ च्या मार्च महिन्यात स्वराज्याच्या वाटाघाटी करण्यासाठी म्हणून एक योजना घेऊन क्रिप्स् कमिशन भारतात आले होते. परतु क्रिप्स् योजनेने कोणाचेच समाधान झाले नाही. गांधीजींसह सर्व नेत्यांनी क्रिप्स् फेटाळली. त्यानंतर भारतीय स्वातंत्र्य मिळविण्यासाठी हीच वेळ योग्य आहे, अशा आशयाचे लिखाण गांधीजींनी 'हरिजन' पत्रातून सुरू केले होते. देशभर लढ्याचे वारे पुनरपि संचारू लागले होते. पुढील काही महिन्यांतच काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक झाली आणि तिच्यात 'इंग्रज सत्तेने हिंदुस्थानातील सत्ता सोडून जावे' असा ठरावच पास केला. ७ ऑगस्ट १९४२ ऐेजी मुंबईत अत्यंत प्रभावी असे भाषण झाले. ते म्हणाले, “आता अधिक उशीर करून चालणार नाही. सरकारने एक तर अविलंब स्वराज्य
आम्हास देऊन टाकावे, नाही तर निरुपाय म्हणून आम्हाला आंदोलन सुरू करावे लागेल.”
८ ऑगस्ट रोजी गांधीजींनी ब्रिटिशांना 'चले जाव-क्विट इंडिया - भारत छोडो' असे त्रिवार सांगितले आणि जनतेलाही या लढ्यात “सर्व शक्तीनिशी लढा' असा आदेश दिला. 'डू ऑर डाय'-'करेंगे या मरेंगे' असे शब्द गांधीजींनी वापरले होते.
त्याच रात्री सरकारने गांधीजींसह सर्व वरिष्ठ नेत्यांना अटक करून गुप्तस्थळी नेऊन ठेवले होते. लढा सुरूच झाला होता. ९ ऑगस्टला सकाळी ही वार्ता सर्व देशभर पसरली. गावोगावी सरकारने धरपकड सुरू केली. जनताही प्रतिकारासाठी
सज्ज झाली. अनेक कार्यकर्ते भूमिगत होऊन चळवळ चालवू लागले. या दिवशी गुरुजी धुळ्याच्या तुरुंगात होते. पण दुसऱ्याच दिवशी म्हणजे १०ऑगस्टला त्यांच्या शिक्षेची मुदत संपून सुटका होणार होती. गावोगावी या वेळी धरपकड सुरू झाली असताना गुरुजींना कोण मोकळे ठेवणार होते? पण विलक्षण किंवा आश्चर्यजनक वाटावी अशी घटना घडली.
धुळ्याच्या कारावासात असताना गुरुजींना ब्लेक नावाचा एक मित्र मिळाला. मि. ब्लेक हे धुळे जेलचे जेलर होते. गुरुजींच्या सौजन्यपूर्ण, शांत व साधुवृत्तीच्या वागणुकीचा ब्लेक यांच्यावर खूपच प्रभाव पडलेला होता. ब्लेक यांनी गुरुजींचे
'श्यामची आई' हे पुस्तकही वाचले होते. 'फायनेस्ट मॅन आय मेट इन माय लाईफ' जसे उद्गार मि. ब्लेक यांनी पुढे प्रस्तुत लेखकाजवळ गुरुजींबद्दल बोलताना काढले
१० ऑगस्ट ही गुरुजींच्या सुटकेची तारीख, पण बाहेर तर धरपकड सुरू झालेली. ब्लेक यांनाही फोनवरून गुरुजींना न सोडण्याविषयी सूचना मिळाली होती. परंतु ब्लेक वांना गुरुजींसारख्या संत माणसाला तुरुंगात ठेवणे बरे वाटेना. तेच
अस्वस्थ झाले आणि त्यांनी स्वत:शी 'एखाद्याला लेखी वॉरंटशिवाय जर अटक करता येत नाही, तर मग लेखी आज्ञेशिवाव एखाद्या राजबंद्याला आपण तुरुंगात तरी कसे ठेवून घ्यायचे? असा युक्तिवाद केला आणि गुरुजींना मुक्त करण्याचा निर्णय ९ ऑगस्टलाच केला. पण ब्लेक यांना अशीही शंका आली की, उद्या १० तारखेला सकाळी गुरुजींना आपण सोडले आणि जेलबाहेर पडताच धुळ्याच्या पोलिसांनी अटक केली तर? त्यांनाही तशी बाहेर सूचना गेली असेलच! मग ब्लेकनी त्यावरही तोडगा काढला तो असा : रात्री १२ नंतर ९ तारीख संपते आणि १० तारीख सुरू होते. गुरुजी त्याचवेळी झीरो अवरलाच--मुक्त होतात; त्यांना त्यानंतरच मुक्त करायचे त्याप्रमाणे पहाटेलाच त्यांनी गुरुजींना मुक्त करून अंमळनेरला पोहोचवले. गुरुजींच्या स्नेहशील, प्रेमळ व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव एका परकीय तुरुंगाधिकाऱ्यावरही
झाला, ही खरी थोरवी !
-----------------------------------------------------------------
सेनानी सानेगुरुजी - राजा मंगळवेढेकर - अनुक्रमणिका
>-----------------------------------------------------------------