१६. किसान-कामगारांचे कैवारी - ४
-----------------------------------------------------------------
सेनानी सानेगुरुजी - राजा मंगळवेढेकर - अनुक्रमणिका
>-----------------------------------------------------------------
'आता उठवू सारे रान' हे दुसरे स्फूर्तिगीतही या किसान मोर्चासाठीच गुरुजींनी रचले होते.
'आता उठवू सारे रान । आता पेटवू सारे रान
शेतकऱ्यांच्या राज्यासाठी लावु पणाला प्राण ॥
किसान मजूर उठतील ।
कंबर लढण्या कसतील ।
एकजुटीची मशाल घेउनि प्रेटवतिल हे रान ॥
कोण अम्हा अडवील?
कोण अम्हा रडवील?
अडवणूक करणार्यांची उडवू दाणादाण ॥
शेतकर्यांची फौज निघे ।
हातात त्यांच्या बेडी पडे ।
तिरंगी झेंडे घेती, गाती स्वातंत्र्याचे गान ॥
पडून ना राहू आता ।
खाऊ न आता लाथा ।
शेतकरी, कामकरी मांडणार हो ठाण ॥
ही गाणी त्या वेळी साऱ्या खानदेशात खेड्याखेड्यांत घुमत होती, तिथून पुढे ती महाराष्ट्रभर पसरली. सुमारे तीन आठवडे असा धुंवाधार प्रचार करीत गुरुजी सर्वत्र हिंडले. गावोगावचे लोक उठले. २३-२४ जानेवारीपासूनच गावोगावचे शेतकरी तिरंगी झेंडे फडकावीत जळगावच्या वाटेला लागले. वाटेतल्या गावात ते थांबत. प्रचार करीत. मग ती गावे त्यांच्यात मिसळत आणि किसानगंगेचा हा प्रवाह पुढे जाई. दाही दिशांनी. असे प्रवाह येऊ लागले. पंढरीला जाणाऱ्या वारकऱ्यांप्रमाणे भाकरी बांधून घेऊन, तशाच निष्ठेने क्रांतीची गाणी गात, घोषणा देत खानदेशचे शेतकरी जळगावला आले. इतस्तत: विखुरलेला शेतकरी औद्योगिक कामगारांप्रमाणे संघटित नव्हता, त्यांची संघटना बांधणेही अवघड होते; परंतु गुरुजींनी हे महान कार्य करून दाखवले. केवळ पुरुषच नाही, तर शेतकरी महिलाही या वेळी पुढे सरसावल्या होत्या. गुरुजींचे गाणे गात होत्या -
किसानांच्या बाया आम्ही शेतकरी बाया
नाही आम्ही रहाणार आता दीनवाणी गाया
दीनवाणी गाया ॥
सरकारला सांगू आम्ही
सावकाराला सांगू आम्ही
पोराबाळां हवे आमच्या पोटभर खाया
पोटभर खाया ॥
आजवरी खाल्ल्या लाथा
आता करू वर माथा
लुटारूंची दुनिया आता पडेल अमुच्या पाया
पडेल अमुच्या पाया ॥
अडाणी न राहू कोणी
सार्या आम्ही होऊ ज्ञानी
ज्ञान हवे जरी हवी दीनदशा जाया
दीनदशा जाया ॥
कडेवरी मुले घेऊ
क्रांतीमधी सामील होऊ |
लाठी खाऊ, गोळी खाऊ, अर्पू अमुची काया
अर्पू आमची काया ॥
किसान स्त्री-पुरुष आपल्या गाऱ्हाण्यांची दाद लावून घेण्यासाठी एवढ्या निर्भयपणाने असे संघटित यापूर्वी कधी झाले नसतील ! गुरुजींनी ही किमया करून दाखवली होती. मुक्यांना वाचा दिलो होती. स्वातंत्र्य मिळवण्याच्या वाटचालीत एक ठोस पाऊल पुढे टाकले होते. सच्चा देशभक्ताला याचा केवढा अभिमान वाटायला हवा होता! आनंदाचे भरते यायला हवे होते! परंतु राज्यातले तथाकथित काँग्रेस श्रेष्ठी गुरुजींवर मात्र नाराज झाले. “आपलेच मंत्रिमंडळ असताना हा मोर्चा? हा उठाव? शिव शिव ! अब्रह्मण्यम!” असे एखाद्या सनातन्यासारखे त्यांना वाटू लागले. 'पेटू दे देश, पेटू दे देश, येथून तेथून सारा पेटू दे देश' या स्फूर्तिगीताबद्दलही केवढे आक्षेप ! हिंसा-अहिंसेचे नसते प्रश्न उपस्थित केले आणि मोर्च्याला विरोध करण्यासाठी हे महाभाग सरसावले. केवढे दुर्दैव ! पक्षनिष्ठासुद्धा अशी आंधळी असते. आपल्या सत्तेने केलेला अन्यायदेखील न्याय्य वाटू लागतो. त्याच्या समर्थनार्थ विद्वता राबवली जाते.
गुरुजींची अमाप लोकप्रियता सहन होणे अहंकारी नेत्यांना शक्य नव्हते. त्यांनी त्यांच्या या कार्यात अडथळे आणले. ज्यांना निवडून देण्यासाठी गुरुजींनी जिवाचे रान केले होते, तेच आमदार वगैरे लोक विरोधासाठी पुढे सरसावले. गुरुजींना मिळवायचे काहीच नव्हते. त्यांना याचे फार वाईट वाटले. श्रेष्ठांनी मोर्चा रद्द ठरविला आणि जळगाव गावात किसान परिषद घेण्यात आली. शेतकऱ्यांच्या मागणीवरूनच गुरुजींना परिषदेत बोलू दिले. गुरुजींचे अत्यंत प्रभावी असे भाषण त्या वेळी झाले. खानदेशी हृदयात साने गुरुजींना एखाद्या मातृदेवतासारखे स्थान मिळाले होते.
-----------------------------------------------------------------
सेनानी सानेगुरुजी - राजा मंगळवेढेकर - अनुक्रमणिका
>-----------------------------------------------------------------